Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मौलाना आझाद तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रजासत्ताकदिनी सोलापुरात भूमिपूजन
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

येथील दि ग्रेट मौलाना अबुल कलाम आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक ट्रस्टच्यावतीने होटगी येथे येत्या जूनपासून इंडियन पॉलिटेक्निक हे तंत्रशिक्षण महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कय्युम बुऱ्हाण यांनी दिली.
हा प्रकल्प सुमारे आठ कोटींचा असून येत्या तीन वर्षांत टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. होटगी येथे कुंभारी रस्त्यावर पाच एकर चार गुंठे जागा खरेदी करण्यात आली असून तेथे महाविद्यालयाची इमारत, वसतिगृह, सेवकांचे निवासस्थान असे एकूण एक लाख चौरस फुटाचे बांधकाम येत्या तीन वर्षांत टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी चाळीस हजार चौरस फुटाचे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी तीस हजार चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या तंत्रशिक्षण महाविद्यालयात सिव्हील, मेकॅनिकल, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जाणार आहे. पुढच्या वर्षीपासून शासकीय नियमानुसार बारावी शास्त्र परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयात प्रत्येक वर्षी प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक आणि फर्निचरसाठी सुमारे पन्नास लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. या महाविद्यालयात ५१ टक्के अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आणि ४९ टक्के अन्य जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियोजित तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन येत्या २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते आणि माजी पाटबंधारेमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, महापौर अरुणा वाकसे, उपमहापौर राजेंद्र कलंत्री, जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बाबासाहेब बंडगर हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव सलीम सुबहान शेख, सहसचिव एम.सी. शेख, जाबीर अल्लोळी, अमीरोद्दीन शेख, प्रा. एम.ए. दलाल, शकील चिडगुंपी आदी उपस्थित होते.