Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अनुसूचित जमातीत समावेशासाठी नंदीवाले समाजाचा सांगलीत मोर्चा
सांगली, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

नंदीवाले समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य अध्यक्ष हणमंतराव पवार यांनी केले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नंदीवाले समाज हा परंपरागत भटकंती करणारा अत्यंत दारिद्रय़ व भिक्षुकी करून चरितार्थ चालवणारा समाज असून, तो आजही शासकीय सवलती व शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज आहे. हा समाज मूळ भारतीय आदिवासी समाज असून, त्याच्याकडे स्थैर्यासाठी स्वतच्या मालकीची ना शेतजमीन, ना जागा, तसेच कोणताही अन्य पारंपरिक व्यवसायही नाही. त्यामुळे नंदीवाले समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व जात पडताळणी विनाअटी मिळाव्यात, नंदीवाले समाजातील निराधार, विधवा व वृद्ध यांना पेन्शन मिळावी, समाजातील गरजूंचा दारिद्रय़रेषेखालील यादीत समावेश करावा, समाजातील भूमिहीनांना भूमी मिळावी, घरे नसणाऱ्यांना घरकुल योजनेतून घरकुल बांधून द्यावे, उद्योगधंद्यासाठी विशेष अनुदानाची तरतूद करावी, त्यासाठी विनातारण कर्ज मिळावे, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव, खजिनदार सर्जेराव देशमुख, विलास मोकाशी, गिरमल कुलकर्णी यांच्यासह नंदीवाले समाजातील पुरुष व महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.