Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन सोमवार दि. २६ व २७

 

जानेवारी रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य संघटनेचे संघटन सचिव विकास सूर्यवंशी व संचालक मारूती नवलाई यांनी दिली.
पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेने या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. सोमवार दि. २६ जानेवारी रोजी राज्यभरातून आलेल्या वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच रात्री आठ वाजता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते राज्यातील पहिल्या वृत्तपत्र विक्रेता भवनच्या बांधकामाचे भूमिपूजन व या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास पणनमंत्री मदन पाटील, ग्रामीण विकासमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गोपिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी योजना, घरकुल योजना यासह समान कमिशन व सुट्टय़ा याबाबत चर्चा करून ठराव करण्यात येणार आहेत. या अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांनी विकास सूर्यवंशी, मारूती नवलाई, दरिबा बंडगर, सचिन माळी, गजानन साळुंखे (सांगली), प्रशांत जगताप (मिरज), दत्तात्रय सलगर (कुपवाड) व अण्णा दौंडे (कुंडल) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.