Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

समाजासाठी कायदा मोडणाऱ्या बापलेकांना समाजसेवेची शिक्षा !
मिरज, २३ जानेवारी/वार्ताहर

समाजासाठी कायदा मोडणाऱ्या बापलेकांना समाजसेवा करण्याची शिक्षा मिरज येथील न्यायालयाने

 

सुनावली आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोंडून मारहाण करणाऱ्या या बापलेकाविरोधात भोसे येथील तत्कालीन ग्रामसेवकाने फिर्याद दिली होती. समाजासाठी हातघाईवर येणाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरवून चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर गावातील मंदिरात सहा महिने स्वच्छता राखावी, असा आदेश दिला आहे.
भोसे येथील तुकाराम अंतू पवार व राजेंद्र तुकाराम पवार या दोघांनी दि. २९ एप्रिल २००४ रोजी आपल्या भागात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार करीत दाद मागण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन प्रतीकात्मक न राहता ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना मारहाण करीत कोंडून करण्यात आले. याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक नामदेव महानूर यांनी या पितापुत्राविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुर्गाप्रसाद देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायाधीशांनी या दोघांवरील आरोप सिद्ध होत असल्याचे सांगितले. मात्र या दोघांनीही केलेले कृत्य वैयक्तिक द्वेषातून झालेले नसून सामाजिक प्रश्नासाठी हे कृत्य झाले होते. त्यामुळे न्यायाधीशांनी या आरोपाबद्दल सामाजिक शिक्षा देण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. तुकाराम पवार याने गावच्या विठ्ठल मंदिराची स्वच्छता सहा महिने ठेवायची असून, दररोज पूजाही करायची आहे, तर त्यांचा मुलगा राजेंद्र पवार याने गावातीलच महादेव मंदिराची स्वच्छता सहा महिने करीत असताना दर सोमवारी पूजा करायची आहे.
या दोघांकडून न्यायालयाने केलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी यासंबंधी दरमहा अहवाल न्यायालयास सादर करावयाचा आहे. मात्र या निकालाबद्दल संपूर्ण गाव व तालुक्यात उत्कंठावर्धक चर्चा होत आहे.