Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘वकिली व्यवसायात वाचन, चिंतनाने व्यासंग वाढवावा’
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

वकिली व्यवसाय करताना वाचन, चिंतन करून ज्ञानाचा व्यासंग वाढविणे गरजेचे आहे. नियमितपणा

 

आणि निष्ठा ठेवून हा व्यवसाय करून कामाला न्याय द्यावा. वकिली व्यवसाय हा फक्त लक्ष्मी संपादन करण्याचा व्यवसाय नसून तो सरस्वतीचा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार विश्वरूपे यांनी केले.
येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या महिला शाखेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अ‍ॅड. विश्वरूपे बोलत होते.
या वेळी विधी पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. व श्री. विश्वरूपे यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर व ज्येष्ठ सदस्य शंकरराव चिंचोळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला शाखेचे कार्यवाह हेमा चिंचोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मकरसंक्रांतीचे महत्त्व सांगताना पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, मकरसंक्रांतीला सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. येथून उत्तरायनाला म्हणजे देवांच्या दिवसाला प्रारंभ होतो. म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी, तरुणांनी नोकरी व व्यवसाय करताना ते कष्टाने आणि निष्ठेने केल्यास भविष्य उज्ज्वल ठरेल, असे सांगितले.
या वेळी प्राचार्य श्रीनिवास वडकबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास हरिभाऊ जतकर, ब.गो. अहंकारी, शंकर कुलकर्णी, आशालता तडवळकर, रंगनाथ जोशी, श्याम जोशी, रेवती चाफळकर आदी उपस्थित होते. मृदुला गोखले यांनी सर्वाचे आभार मानले.