Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘शैक्षणिक क्षेत्रात आंध्र, गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे’
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र अनेक क्षेत्रात अग्रेसर असला तरी शिक्षणाच्या बाबतीत आंध्र प्रदेश आणि गुजरात ही राज्ये पुढे

 

आहेत. तेव्हा शासनाने शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी केले.
येथील वैभव एज्युकेशन अ‍ॅन्ड सोशल फाउंडेशनतर्फे अमृता बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन डॉ. बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिध्द कर सल्लागार सी.आर. दोशी होते. यावेळी राजकुमार शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शोभा शहा व अमृता शहा यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमास अ‍ॅड. जे.ए. कस्तुरे, रतनचंद शहा, प्रभाचंद शास्त्री, माणिक गोयल, सुभाष स्वामी आदी उपस्थित होते.
डॉ. बंडगर पुढे म्हणाले की, बालमनावर उत्तम संस्कार करून शिक्षण दिल्यास भारताला बलशाली होण्यापासून कोणीही रोखणार नाही.
मुलांना शिकविताना त्यांच्या बौध्दिक पातळीवर जाऊन शिकविणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात चांगल्या शिक्षकांसाठी चांगल्या प्रकारचे पॅकेजही उपलब्ध होणार असल्याने दर्जेदार शिक्षणाकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सी.आर. दोशी यांनी, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश महामुनी यांचेही भाषण झाले.