Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

त्रिकालवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांतनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनमोहन सिंग यांच्यावर आज बायपास सर्जरी
नवी दिल्ली, २३ जानेवारी/खास प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर आला असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांना उद्या शनिवारी, एम्स (अ. भा. आयुर्विज्ञान संस्था) इस्पितळात ह्रदय शल्यचिकित्सेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच प्रजासत्ताक दिन सोहळ्याला भारताचे पंतप्रधान अनुपस्थित राहण्याचा प्रसंग आला आहे. मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत लोकसभेतील नेते, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी हंगामी पंतप्रधान म्हणून काम करतील, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत. मनमोहन सिंग पूर्णपणे बरे होईपर्यंत मुखर्जी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकींचे अध्यक्षपद भूषवतील.

बाळासाहेबांना छगन भुजबळ यांच्याकडून ‘बर्थ डे गिफ्ट’ !
मुंबई, २३ जानेवारी/प्रतिनिधी

स्क्वोरोस्कीचे वाईन ग्लास, रिकोसा बरोला (इटली), सेबास्तिनी, पिनोत नोर रेड वाईन, मरसुल्त (फ्रेंच) व्हाईट वाईन, प्युलिग्नो मोन्ताशे (फ्रेंच) व्हाईट वाईन, केक, खजुर आणि डेरेदार फुलांचा गुच्छ ही खास गिफ्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज दिली आणि ते देणारे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ! बाळासाहेबांनी त्यांचा ८२ वा वाढदिवस त्यांचे कुटुंबिय, मित्र, चाहते यांच्या गर्दीत, डेरेदार फुलांच्या सुगंधी संगतीत आणि शुभेच्छांच्या वर्षांवात साजरा केला. मात्र यावेळी सर्वात चर्चेचा विषय ठरला ती पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते, मधल्या काळातील ठाकरे यांचे कट्टर विरोधक आणि आता वयपरत्वे थकलेल्या बाळासाहेबांशी दुश्मनी संपुष्टात आणण्याकरिता मैत्रीचा हात पुढे केलेल्या भुजबळ यांनी पाठविलेली भेट! भुजबळ यांनी बाळासाहेबांना दूरध्वनी करून भेटीचा स्वीकार करण्याची विनंती केली व शुभेच्छा दिल्या.

‘ गेट वे ’ लगतच्या सगळ्या लाँच हलविणार
अतिरेक्यांकडून गेट वे ऑफ इंडिया आणि एलिफंटा या दोन ऐतिहासिक ठिकाणांना धोका असल्याची सूचना केंद्रीय गुप्तचर खात्याने राज्य सरकारला दिली आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाला लागून असलेले पाचही धक्के बंद करून ते रेडिओ क्लबच्या शेजारी हलविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे गेट वेचा परिसर हा केवळ पादचारी पर्यटकांपुरता मर्यादित राहणार असून तेथील लॉन्चमध्ये बसणाऱ्यांची गर्दी आता इतिहासजमा होणार आहे.

नगरजवळ भीषण अपघातात १२ ठार
नगर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

नगरपासून २२ किलोमीटर अंतरावर जामखेड रस्त्यावर चिंचोडी पाटील गावालगत आज दुपारी मालमोटार व एसटी बसच्या भीषण अपघातात १२जण जागीच ठार, तर २९जण जखमी झाले. मालमोटारीच्या धडकेने बसची उजवी बाजू पूर्णपणे कापली गेली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ५-६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी तिघांची ओळख अजून पटलेली नाही.अपघात इतका भीषण होता की अनेकांचे हात-पाय तुटून इतस्तत पडले होते. मृतांचे चेहरे ओळखू येत नव्हते. अपघातातील बस कळंबहून पुण्याकडे चालली होती, तर मालमोटार घोडेगाव येथून कांदा घेऊन चेन्नईकडे जात होती. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार मालमोटारीचा वेग खूप होता. एसटी चिचोंडी पाटील येथे थांबून नगरला निघाली होती.

‘ऑस्कर’ म्हणजे सर्वस्व नाही - अमिताभ बच्चन
जयपूर, २३ जानेवारी/पी.टी.आय.

‘ऑस्कर’ पुरस्कार हा आपल्या जागी श्रेष्ठ असून आपण त्याला वेगळे करू शकत नाही. त्यांना भारतीय चित्रपटांना हा पुरस्कार द्यायचा असेल तरच तो आपल्याला मिळू शकेल, आणि द्यायचा नसेल तर नाही. तो मिळाला तर उत्तम आणि नाही मिळाला तरी काहीही फरक पडत नाही. तेव्हा ‘ऑस्कर’ मिळणे हेच सर्वस्व समजू नका, असे मत अमिताभ बच्चन यांनी येथे व्यक्त केले. मात्र पडद्यावर दिसणाऱ्या घटकांपेक्षा पडद्यामागे झटणाऱ्या कलाकारांना यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळाल्याबद्दल आनंद वाटतो, असेही ते म्हणाले. अमिताभ बच्चन यांच्यावर लिहिलेल्या ‘बचनालिया’ पुस्तकाच्या जयपूर साहित्य महोत्सवामधील प्रकाशन सोहळ्यात ‘बीग बी’ बोलत होते.

‘उपद्रवी’ भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास स्थगिती
मुंबई, २३ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील नगरपालिका व महापालिकांना सार्वजनिक उपद्रवकारी भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची मुभा देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गेल्या महिन्यातील निकालास सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे फक्त पिसाळलेल्या, असाध्य रोगाने जर्जर झालेल्या व प्राणघातक स्वरूपात जखमी झालेल्या भटक्या कुत्र्यांनाच ठार मारण्याचे गेली १० वर्षे लागू असलेले बंधन पालिकेस पाळावे लागणार आहे. प्राणी िहसा प्रतिबंधक कायद्यान्वये केंद्र सरकारने केलेल्या नियमांमध्ये फक्त पिसाळलेल्या, असाध्य रोगाने जर्जर व प्राणघातक स्वरूपात जखमी झालेल्या कुत्र्यांनाच ठार मारण्याची मुभा आहे.

जंतावरील औषध घेतल्यानंतर ४८ मुले अत्यवस्थ
सिन्नर, २३ जानेवारी / वार्ताहर

जंतावरील गोळ्या देण्यात आल्यानंतर सुमारे ४८ बालकांना तात्पुरते अंधत्व, मळमळ, शरीरातील पाणी कमी होण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागल्याची घटना आज तालुक्यातील उजनी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत गावातच अडवून ठेवले. अत्यवस्थ बालकांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृतीचा धोका टळला असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले.

दरोडेखोरांचे पलायन; ठाण्याचे १० पोलीस निलंबित
ठाणे , २३ जानेवारी/प्रतिनिधी

झाबुआ टोळीच्या पाच खतरनाक दरोडेखोरांच्या पलायनप्रकरणी ठाणे ग्रामीणच्या १० पोलिसांना आज निलंबित करण्यात आले आहे. सुनावणीनंतर वसई न्यायालयातून ठाणे कारागृहात आणताना पोलिसांवर गाडीत हल्ला करुन पाच कैद्यांनी १७ जानेवारीला पोबारा केला. या खतरनाक दरोडेखोरांना ठाणे आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मध्य प्रदेशातील झाबुआ गावातून अटक करण्यात आले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात आलेल्या १० पोलिसांवर प्राथमिक चौकशीत हलगर्जीपणाचा ठपका ठेवून निलंबत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक नवल बजाज यांनी दिली. अशा या खतरनाक दरोडेखोरांची मध्य प्रदेशातील झाबुआ गावात ४५ टोळ्या सक्रिय आहेत. त्यात ४०० ते ५०० जण सक्रिय आहेत. छोटय़ा-छोटय़ा टोळ्यांमध्ये राहून ते राजस्थान , महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सशस्त्र दरोडे घालत असतात.

जळगावातून सत्ता परिवर्तनाचा बिगुल वाजवा - मोदी
जळगाव, २३ जानेवारी / वार्ताहर

देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवादाच्या समूळ नाशासाठी विद्यमान केंद्र व राज्य सरकार बदला आणि हा परिवर्तनाचा बिगुल जळगावातूनच वाजवा, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे केले. एकनाथ खडसे यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. भाजप विधीमंडळ गटनेते खडसे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना एक कोटी रुपयांची थैली अर्पण करण्यासाठी मोदी येथे आले होते. या समारंभानिमित्त सागर पार्क मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर तसेच जिल्ह्य़ातील भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश जैन यांनीही या मंचावर उपस्थिती लावली, मात्र भाजप प्रवेशाबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. खडसे यांचा गौरव केल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम जैन यांचा नामोल्लेख करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या भाषणात मोदी यांनी विविध मुद्दय़ांना स्पर्श केला. जळगाव हा केळीचा जिल्हा म्हणून ओळख सांगत असला तरी केळीची रोपे गुजरातहून येथे आणली जायची असे सांगून मोदी यांनी दोन्ही प्रदेशातील संबंध दृढ असल्याचे सांगितले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८