Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मनमोहन सिंग यांच्यावर आज बायपास सर्जरी
नवी दिल्ली, २३ जानेवारी/खास प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर आला असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांना उद्या शनिवारी, एम्स (अ.

 

भा. आयुर्विज्ञान संस्था) इस्पितळात ह्रदय शल्यचिकित्सेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच प्रजासत्ताक दिन सोहळ्याला भारताचे पंतप्रधान अनुपस्थित राहण्याचा प्रसंग आला आहे. मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत लोकसभेतील नेते, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी हंगामी पंतप्रधान म्हणून काम करतील, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत. मनमोहन सिंग पूर्णपणे बरे होईपर्यंत मुखर्जी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकींचे अध्यक्षपद भूषवतील.
उद्या, एम्स इस्पितळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी करण्यात येईल, असे पंतप्रधान कार्यालाच्या प्रवक्त्या दीपक संधू यांनी आज सांगितले. छातीत किंचित दुखत असल्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी मनमोहन सिंग यांच्यावर एम्समध्ये एंजिओग्राफी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या एक्स-रे, विविध ब्लड केमिस्ट्री, सीटी स्कॅन आणि ईसीजी चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांमध्ये ह्रदयांपासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध निर्माण झाल्याचे आढळून आल्यामुळे त्यांची बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे उपाध्यक्ष रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वाखालील ह्रदयरोग तज्ज्ञ तसेच एम्सच्या विविध विभागांचे चिकित्सक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक ७६ वर्षीय मनमोहन सिंग यांच्या ह्रदयावरील शल्यचिकित्सेत गुंतलेले असतील, अशी माहिती दीपक संधू यांनी दिली. पंतप्रधानांचे खासगी चिकित्सक डॉ. के. श्रीधर रेड्डी यांनी आज डॉ. पांडा यांच्याशी दीर्घ चर्चा करून मनमोहन सिंग यांच्यावरील वैद्यकीय उपचारांची दिशा निश्चित केली. १९९४-९५ ते १९९८-९९ दरम्यान डॉ. पांडा यांनी सर्वाधिक प्राप्तिकर भरताना प्राप्तिकर खात्याकडून राष्ट्रीय सन्मान पटकाविला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने आजवर सुमारे १० हजार बायपास सर्जरी केल्या आहेत. सातशेवेळा पुन्हा बायपास सर्जरी करण्याचे तसेच १५०० अत्यंत जोखीमेच्या ह्रदयशस्त्रक्रिया करण्याचेही श्रेय त्यांच्या खात्यावर आहे.
मनमोहन सिंग यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी करण्याची आवश्यकता नसून स्थिती मुळीच गंभीर नसल्याचे एम्स तसेच एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पण दोन दिवसांनंतर होऊ घातलेल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडेपर्यंत प्रतीक्षा करण्याचाही स्थितीत मनमोहन सिंग नसल्याचे या तातडीच्या सर्जरीमुळे स्पष्ट झाले आहे. मनमोहन सिंग यांची ही दुसरी बायपास सर्जरी ठरणार आहे. यापूर्वी, १८ वर्षांंपूर्वी त्यांच्यावर ब्रिटनमध्ये कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी करण्यात आली होती. २००४ साली एंजिओप्लास्टी झाली होती.