Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बाळासाहेबांना छगन भुजबळ यांच्याकडून ‘बर्थ डे गिफ्ट’ !
मुंबई, २३ जानेवारी/प्रतिनिधी

स्क्वोरोस्कीचे वाईन ग्लास, रिकोसा बरोला (इटली), सेबास्तिनी, पिनोत नोर रेड वाईन, मरसुल्त

 

(फ्रेंच) व्हाईट वाईन, प्युलिग्नो मोन्ताशे (फ्रेंच) व्हाईट वाईन, केक, खजुर आणि डेरेदार फुलांचा गुच्छ ही खास गिफ्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज दिली आणि ते देणारे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ!
बाळासाहेबांनी त्यांचा ८२ वा वाढदिवस त्यांचे कुटुंबिय, मित्र, चाहते यांच्या गर्दीत, डेरेदार फुलांच्या सुगंधी संगतीत आणि शुभेच्छांच्या वर्षांवात साजरा केला. मात्र यावेळी सर्वात चर्चेचा विषय ठरला ती पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते, मधल्या काळातील ठाकरे यांचे कट्टर विरोधक आणि आता वयपरत्वे थकलेल्या बाळासाहेबांशी दुश्मनी संपुष्टात आणण्याकरिता मैत्रीचा हात पुढे केलेल्या भुजबळ यांनी पाठविलेली भेट! भुजबळ यांनी बाळासाहेबांना दूरध्वनी करून भेटीचा स्वीकार करण्याची विनंती केली व शुभेच्छा दिल्या. मागील वाढदिवसाला ठाकरे-भुजबळ यांच्यातील अबोला संपला. ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला अलीकडेच भुजबळ यांनी मागे घेतला. पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यावर भुजबळ यांनी ठाकरे यांना दूरध्वनी करून आशीर्वाद घेतले. आज भेट पाठवून दुरावा दूर करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही बाळासाहेबांना पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्या. राज यांच्या मातोश्री व बहिण यांनीही बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माधवी, रश्मी व स्मिता ठाकरे यांनी बाळासाहेबांना ओवाळले व पेढा भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेहा, निहार, राहुल, ऐश्वर्य, आदित्य, तेजस या नातवंडांच्या घोळक्यात त्यांचे आजोबा रमले. याच वेळी मनोहर जोशी, रामदास कदम, दत्ताजी नलावडे, चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, संजय राऊत, भारतकुमार राऊत, दगडु सकपाळ, नीलम गोऱ्हे, एकनाथ ठाकूर, वसंत डावखरे आदींनी ठाकरे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. शरद पवार, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सचिन तेंडुलकर, जया बच्चन, सुशीलकुमार शिंदे, सत्यपाल सिंग आदींनी दूरध्वनीवरून बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या. टीना अंबानी यांनी कालच ठाकरे यांची भेट घेतली होती.
रेखा व पूनम महाजन यांची बाळासाहेबांशी चर्चा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा व कन्या पूनम यांनीही मातोश्रीवर हजेरी लावली. आजच्या अत्यंत गर्दीच्या व गडबडीच्या दिवशीही रेखा व पूनम यांनी बाळासाहेबांशी १५ मिनिटे चर्चा केली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ पूनम महाजन यांच्याकरिता शिवसेनेने सोडावा याकरिता रेखा महाजन यांनी विनंती केल्याचे बोलले जात आहे.