Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नगरजवळ भीषण अपघातात १२ ठार
नगर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

नगरपासून २२ किलोमीटर अंतरावर जामखेड रस्त्यावर चिंचोडी पाटील गावालगत आज दुपारी

 

मालमोटार व एसटी बसच्या भीषण अपघातात १२जण जागीच ठार, तर २९जण जखमी झाले. मालमोटारीच्या धडकेने बसची उजवी बाजू पूर्णपणे कापली गेली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ५-६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी तिघांची ओळख अजून पटलेली नाही.
अपघात इतका भीषण होता की अनेकांचे हात-पाय तुटून इतस्तत पडले होते. मृतांचे चेहरे ओळखू येत नव्हते. अपघातातील बस कळंबहून पुण्याकडे चालली होती, तर मालमोटार घोडेगाव येथून कांदा घेऊन चेन्नईकडे जात होती. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार मालमोटारीचा वेग खूप होता. एसटी चिचोंडी पाटील येथे थांबून नगरला निघाली होती.
गावाजवळील म्हसोबा मंदिराजवळील वळणापाशी भरधाव वेगात जाणाऱ्या मालमोटारीची बसला जोरदार धडक बसली. धडक बसल्यानंतर मालमोटार ४००-५०० फूट अंतरावरील एका घरात घुसली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून जवळचे ग्रामस्थ तिकडे धावले. त्यांनी तातडीने मृतांना व जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. मालमोटारीतील कांदे रस्त्यावर विखुरले होते. अपघात झाला तेव्हा मालमोटारीचा चालक बाळकृष्ण जिवरलम कडाप्पा हा झोपलेला होता, तर त्याचा क्लिनर कृष्णा कोडिंबा बालयोगी हा मालमोटार चालवत होता. दोघांनीही मद्यप्राशन केले होते, असे लोकांनी सांगितले.