Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘ऑस्कर’ म्हणजे सर्वस्व नाही - अमिताभ बच्चन
जयपूर, २३ जानेवारी/पी.टी.आय.

‘ऑस्कर’ पुरस्कार हा आपल्या जागी श्रेष्ठ असून आपण त्याला वेगळे करू शकत नाही. त्यांना भारतीय

 

चित्रपटांना हा पुरस्कार द्यायचा असेल तरच तो आपल्याला मिळू शकेल, आणि द्यायचा नसेल तर नाही. तो मिळाला तर उत्तम आणि नाही मिळाला तरी काहीही फरक पडत नाही. तेव्हा ‘ऑस्कर’ मिळणे हेच सर्वस्व समजू नका, असे मत अमिताभ बच्चन यांनी येथे व्यक्त केले. मात्र पडद्यावर दिसणाऱ्या घटकांपेक्षा पडद्यामागे झटणाऱ्या कलाकारांना यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळाल्याबद्दल आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.
अमिताभ बच्चन यांच्यावर लिहिलेल्या ‘बचनालिया’ पुस्तकाच्या जयपूर साहित्य महोत्सवामधील प्रकाशन सोहळ्यात ‘बीग बी’ बोलत होते. चांगले भारतीय चित्रपट मोठय़ा संख्येने निघत असून देखील फारच थोडे चित्रपट ‘ऑस्कर’ च्या स्पर्धेत टिकून कसे राहतात, याबाबत विचारले असता बच्चन यांनी सांगितले की, ऑस्करला आपण सर्वाधिक प्रतिष्ठा निर्माण करून देणारा पुरस्कार म्हणून पाहतो. ऑस्कर मिळविणारे परदेशातील चित्रपट हे त्यांच्याजागी श्रेष्ठ असून आपल्याकडील सिनेमेदेखील भारताच्या दृष्टीने सर्वोत्तम आहेत. म्हणून आपल्या चित्रपटांना ऑस्कर मिळणे म्हणजेच सर्वस्व समजू नका, असे बच्चन म्हणाले. तथापि, पडद्यामागच्या कलावंतांना ऑस्करला नामांकन मिळाल्याचा आनंद त्यांना लपवता आला नाही. रेहमान किंवा गुलझार यांना ऑस्करला नामांकन मिळण्याच्या आनंदापेक्षा ध्वनी दिग्दर्शक रसूल पुकुट्टी याला मिळालेलं नामांकन मला सर्वात महत्त्वाचं वाटते असे त्यांनी सांगितले. देशाचे नाव अभिमानाने उंचावणाऱ्या रेहमान भारताला दुसरे ऑस्कर मिळवून देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
डॅनी बॉयल यांच्या ‘स्लमडॉग मिलिनियर’ चित्रपटाला ऑस्करची १० नामांकने मिळाल्याबद्दल बच्चन म्हणाले की, भारतीय सिनेमा भारतासाठी सर्वश्रेष्ठ असून ‘ऑस्कर’ साठी नामांकित होणारे परदेशी चित्रपट हे त्या त्या जागी उत्तम आहेत चित्रपट ही कलाकाराची कलात्मक अभिव्यक्ती असल्याचे मला मान्य असून त्यावर मतप्रदर्शन करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. ‘स्लमडॉग मिलिनियर’मध्ये भारताच्या दारिद्य्राचे नकारात्मक चित्रण केले आहे, असे आपण ब्लॉगवर म्हटले नव्हते,असेही बच्चन यावेळी म्हणाले. माझ्या ‘ब्लॉग’वर मी काही वाचकांच्या प्रतिक्रिया जोडल्या होत्या. ज्यात चित्रपटावर मते व्यक्त केली गेली होती. याबाबत खुद्द डॅनी बॉयल आणि अनिल कपूर यांना आपण आपले स्पष्टीकरण दिल्याचे बच्चन यांनी सांगितले.