Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जंतावरील औषध घेतल्यानंतर ४८ मुले अत्यवस्थ
सिन्नर, २३ जानेवारी / वार्ताहर

जंतावरील गोळ्या देण्यात आल्यानंतर सुमारे ४८ बालकांना तात्पुरते अंधत्व, मळमळ, शरीरातील पाणी

 

कमी होण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागल्याची घटना आज तालुक्यातील उजनी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत गावातच अडवून ठेवले. अत्यवस्थ बालकांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृतीचा धोका टळला असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यामध्ये जंतावरील औषध देण्याची मोहीम सध्या सुरू आहे. शून्य ते तीन वयोगटातील बालकांना द्रवरूप औषध तर तीन ते सहा वयाच्या बालकांना गोळ्या दिल्या जात आहेत. आरोग्य विभागाने सकाळी उजनीतील एकूण ८३ बालकांना औषध दिले असता ज्यांना गोळ्या दिल्या, त्यातील अनेकांना दुपारी त्रास जाणवू लागला. काही बालकांनी आपल्याला दिसत नसल्याचे सांगितल्यावर पालक हादरले. मळमळ व शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी झाल्याने काहींना अशक्तपणा जाणवू लागला. अनेक घरांमधील मुलांना कमी-अधिक प्रमाणात सारखाच त्रास जाणवू लागल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अत्यवस्थ बालकांना सिन्नरला हलविण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उजनी गावाकडे धाव घेतली.