Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘ गेट वे ’ लगतच्या सगळ्या लाँच हलविणार
समर खडस, मुंबई, २३ जानेवारी

अतिरेक्यांकडून गेट वे ऑफ इंडिया आणि एलिफंटा या दोन ऐतिहासिक ठिकाणांना धोका असल्याची

 

सूचना केंद्रीय गुप्तचर खात्याने राज्य सरकारला दिली आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाला लागून असलेले पाचही धक्के बंद करून ते रेडिओ क्लबच्या शेजारी हलविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे गेट वेचा परिसर हा केवळ पादचारी पर्यटकांपुरता मर्यादित राहणार असून तेथील लॉन्चमध्ये बसणाऱ्यांची गर्दी आता इतिहासजमा होणार आहे.
गेट वे ऑफ इंडियाची वास्तू अतिरेक्यांकडून बॉम्बद्वारे उडविण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पंचम जॉर्जच्या आगमनासाठी इंग्रजांनी बांधलेल्या या वास्तूला भारतीय पुरातन वास्तूंमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या वास्तूच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. त्यादृष्टीने गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणाबरोबरच त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी बोलाविलेल्या बैठकीत गेट वे ऑफ इंडियाला लागून असलेले छोटय़ा बोटींसाठीचे धक्के बंद करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
गेट वे ऑफ इंडियाला लागून एकंदर पाच धक्के आहेत. यापैकी गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला लागून असलेला धक्का क्रमांक चार गेले अनेक महिने बंद आला आहे.
मात्र धक्का क्रमांक १, २ व ३ तसेच श्रीमंतांच्या यॉटसाठी असलेला धक्का क्रमांक पाच हे चार धक्के सुरू असून तेथे एलिफंटा, रेवस, अलिबाग - मांडवा येथे जाणारे पर्यटक, समुद्रातून फेरफटका मारणारे पर्यटक आदींची गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा घातपात घडविला जाण्याची शक्यताही अधिक आहे.
त्यामुळेच रेडिओ क्लबच्या शेजारील बीपीटीच्या एका धक्क्याच्या शेजारी आणखी दोन नवे धक्के बांधण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
तसेच गोव्याच्या धर्तीवर येथे लॉन्च, फेरीबोटींच्या तिकीटांची दुकाने, छोटी रेस्टॉरंटस् आदी सोयी करण्यात येणार आहेत. याचा आराखडा तयार करण्याचे काम राज्याच्या मेरीटाइम बोर्डाला सांगण्यात आले आहे. तसेच गेट वेचा परिसर मोकळा झाल्यावर तेथे सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून गेटवेच्या शेजारील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका चौकीत त्याचा नियंत्रणकक्ष ठेवण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हींमध्ये एकच व्यक्ती अनेकदा इकडून तिकडे जाताना दिसली की त्या व्यक्तीच्या प्रतिमेचे संकेत सातत्याने पडद्यावर ठळकपणे दिसू लागतात. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसराची सुरक्षा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्यास मदत मिळेल.
तसेच रेडिओ क्लबच्या शेजारील नव्या दोन व पूर्वीची एक अशा तिन्ही धक्क्यांवरून जाणाऱ्या पर्यटकांचीही व्यवस्थित सुरक्षा चाचणी होऊन एलिफंटाला जाणाऱ्या पर्यटकांचीही आपोआपच प्राथमिक पूर्वचाचणी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.