Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
प्रादेशिक

‘ट्रायडण्ट’मधून हल्ल्यापूर्वी थोडाच वेळ रॉबर्ट वडेरांनी केले होते ‘चेक आऊट’!
केदार दामले, मुंबई, २३ जानेवारी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यापूर्वीच दोन तास अगोदर दिल्लीतील एका बडय़ा राजकीय प्रस्थाने ‘ट्रायडण्ट’ या पंचतारांकित हॉटेलमधून ‘चेक-आऊट’ केले होते, त्यामुळे ते बचावले, अशी सर्रास चर्चा त्यावेळी सुरू होती. ते बडे राजकीय प्रस्थ म्हणजे उद्योगपती रॉबर्ट वडेरा असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. वडेरा हे सोनिया गांधी यांचे जावई असून ते या हल्ल्यातून सुदैवाने बचावले असूनही पोलीस आणि अन्य संबंधित सुरक्षायंत्रणा त्याबाबत कमालीची गुप्तता का पाळत आहेत, असा सवाल निर्माण झाला आहे.

चिनी कम्युनिस्टांच्या धगधगत्या राष्ट्रवादाने संघ-भाजप प्रभावित!
संदीप प्रधान, मुंबई, २३ जानेवारी

भारतातील कम्युनिस्ट (डावे) आणि रा. स्व. संघ, भाजप, शिवसेना (उजवे) यांच्यातील अंतर १८० अंशांचे. परस्परांमध्ये राजकीय एकमत अशक्य मग सोबत बसून चहापान, चर्चा यातर दूरच्या गोष्टी. मात्र कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांच्या निमंत्रणावरून चीनला गेलेल्या संघ व भाजपच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने तेथील कम्युनिस्टांशी ‘फाइव्ह टी’ विषयावर ‘टी’चे घुटके घेत चर्चा केली. चीनच्या विकासाकरिता केली जाणारी सक्ती (हुकुमशाही नव्हे), प्रत्येक चिनी माणसाच्या अंतकरणातील धगधगता राष्ट्रवाद, आर्थिक प्रगती आणि मार्क्सवाद, माओवाद हा आमचा इतिहास आहे. मात्र आम्ही त्याचा अभ्यास जरूर करतो, अशी कबुली देण्याची तेथील कम्युनिस्टांमधील धमक याला संघ परिवाराच्या शिष्टमंडळाने वंदन केले आहे.

अशोक पत्की आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांचा ‘अंतर्नाद’ ‘मी मराठी’वर
मुंबई, २३ जानेवारी/ प्रतिनिधी

मराठी चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या ‘अंतर्नाद’ या राष्ट्रीय पुरस्काराने गेल्या वर्षी अशोक पत्की आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांना गौरविण्यात आले. या दोन दिग्गजांनी केलेल्या भरीव योगदानाची पोचपावती म्हणून ‘मी मराठी’ वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणाऱ्या ‘अंतर्नाद’ या कार्यक्रमात मुलाखतीच्या रूपात अशोक पत्की आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या काही लोकप्रिय गाण्यांवरील नृत्ये, गाण्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटक्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगणार आहेत. येत्या २६ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम ‘मी मराठी’ वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर २३० कोटींची ‘इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टिम’
‘बूट’ तत्वामुळे वादंग उठण्याची शक्यता

मुंबई, २३ जानेवारी / प्रतिनिधी

कुर्ला-ठाणेदरम्यान टाकण्यात येणारा पाचवा व सहावा मार्ग आणि ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम (टीएमएस) या प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम अनुक्रमे डिसेंबर २००९ आणि जून २०१० पर्यंत पूर्ण होईल. याखेरीज प्रवासी सुरक्षा अधिक सुसज्ज करण्यासाठी २३० कोटी रुपये खर्चून ‘इंटिग्रेटेड सुरक्षा यंत्रणा’ उभारण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेकडून आज सांगण्यात आले. मात्र ही सुरक्षा यंत्रणा ‘बीओओटी’ (बूट) तत्वावर उभारण्यात येणार असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मंगळवारपासून ३८ नव्या फेऱ्या
मुंबई, २३ जानेवारी / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आज मध्य रेल्वेनेही मंगळवार, २७ जानेवारीपासून उपनगरी लोकलच्या ३८ नव्या फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली. त्यामध्ये ठाणे-नेरूळ लोकलच्या २२ फेऱ्यांचा समावेश असला तरी, ठाणे-पनवेल लोकलच्या फेऱ्यांत वाढ न झाल्याने, या मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महाव्यवस्थापक बी. बी. मोडगीळ यांनी आज ही घोषणा केली.

शिरुरबाबत पवारांचे मौन; पुण्यातील नेत्यांची मात्र आग्रही मागणी
मुंबई, २३ जानेवारी / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याने त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पुणे जिल्ह्य़ातील व विशेषत: शिरुर मतदारसंघातील नेतेमंडळींनी आज केली. मात्र पवारांनी याबाबत मौन बाळगून कोणतेही आश्वासन दिले नाही. राज्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा सध्या पवार हे राष्ट्रवादीच्या मुख्यालयात घेत आहेत. पुणे जिल्हातील बारामती, मावळ व शिरुर, ठाणे जिल्हयातील चार, जालना, हिंगोलीसह १५ लोकसभा मतदारसंघांचा आज दुसऱ्या दिवशी पवारांनी आढावा घेतला. उद्या मुंबई व कोकणातील मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

अभिनव भारत संघटनेत रॉ, आयबीचे माजी अधिकारीही!
कुतुब मिनारजवळ स्फोट घडविण्याचा कट फसला

निशांत सरवणकर, मुंबई, २३ जानेवारी
मालेगाव येथे बॉम्बस्फोट घडविण्यामागे प्रमुख भूमिका बजावणाऱ्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्या ‘अभिनव भारत संघटने’मध्ये रॉ, आयबीचे माजी अधिकारी होते, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘रॉ’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या जबानीवरून हे स्पष्ट झाले असून या अधिकाऱ्याची जबानी आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आल्याचेही या सूत्रांनी सांगितले. या संघटनेची पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दिल्लीतील प्रसिद्ध कुतुब मिनारजवळ स्फोट घडवून आणण्याची योजना होती, असेही तपासात उघड झाले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेवर गुप्तचर यंत्रणेची करडी नजर
ठाणे,२३ जानेवारी/प्रतिनिधी

'मी कुठल्याही चुका केल्या नाहीत. भडकाऊ भाषण केलेले नाही, मुंबई-ठाण्याप्रकरणात न्यायालयाने यापूर्वीच मला क्लिनचिट दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा घेण्यात आली आहे.' या लेखी उत्तरानंतर सेंट्रल मैदानातील उद्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पोलिसांच्या बंधनानंतर कोणावर संक्रांत आणणार याबद्दलचे कमालीचे कुतूहल राजकीय पक्षांसह गुप्तचर यंत्रणेला लागले आहे. कमांडो, एसआरपीचा कडक बंदोबस्त असून मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह समाजकंटकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.

सहाव्या वेतन आयोगाबरोबरच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी; वित्तमंत्र्यांची अपेक्षा
मुंबई, २३ जानेवारी / प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग १ जानेवारी २००६ पासून पूर्वलक्षीस्वरूपात लागू करण्याचे आज राज्य सरकारच्या वतीने मान्य करण्यात आले. मात्र त्याच वेळी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे अशी अपेक्षा वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज व्यक्त केली. सहाव्या वेतन आयोगाचा निर्णय पुढील आठवडय़ात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. या पाश्र्वभूमीवर अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने वित्तमंत्री वळसे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर १ जानेवारी २००६ पासूनच सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आहे. या तारखेपासून हा सहावा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे वळसे-पाटील यांनी मान्य केल्याचे अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांनी सांगितले. थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली. मात्र याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे अशी सरकारची भूमिका अधिकारी महासंघाने मान्य केली.

विकासात काँग्रेस राजकारण आणत नाही- सुरेश शेट्टी
मुंबई, २३ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाची सत्ता असतानाही केंद्र व राज्य सरकारच्या मदतीतून मुंबई व आजूबाजूच्या परिसराचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. जनजागरण विकास यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस सरकार राबवित असलेल्या विकास योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम स्तूत्य आहे, असे उद्गार वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी काढले.मिरा-भाईंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली १८ ते २२ जानेवारी दरम्यान काढण्यात आलेल्या जनजागरण विकास यात्रेचा समारोप शेट्टी यांच्या उपस्थितीत झाला. काँग्रेस पक्ष सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा व विकासाकरिता सतत प्रयत्नशील असलेला पक्ष असल्याचे शेट्टी म्हणाले. मुझफ्फर हुसेन म्हणाले की, केंद्र सरकारने जेएनयुआरएमच्या माध्यमातून देशातील छोटय़ा-मोठया शहरांना नागरी सुविधा व विकास कामांकरिता ३१ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा देशावरील हल्ला असून दहशतवादा मुकाबला करण्याकरिता केंद्रातील काँग्रेस शासन कटीबद्ध आहे. जिल्हाध्यक्ष तुळशीदास म्हात्रे, विरोधी पक्षनेते चंद्रकांत वैती, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रथीन दत्ता, सेवादल अध्यक्ष हुसुकुमार पोडे, जिल्हा सरचिटणीस सुरेश दळवी यांची यावेळी भाषणे झाली.

कॅनरा बँकेने दाभोळ प्रकल्पासाठी दिलेले ४०० कोटी थकित खात्यात वर्ग
मुंबई, २३ जानेवारी/व्यापार प्रतिनिधी

कॅनरा बँकेने ‘रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रोजेक्ट’साठी (पूर्वाश्रमीचा दाभोळ प्रकल्प) दिलेले ४०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड न झाल्याने थकित (एनपीए) खात्यात वर्ग केले आहे. कॅनरा बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. सी. महाजन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २,१५० मेगाव्ॉट वीजनिर्मिती क्षमतेच्या रत्नागिरी प्रकल्पासाठी एकंदर ४०० कोटी रुपयांचे कर्ज बँकेने मंजूर केले आहे. परंतु ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेला गॅसचा पुरवठा लवकरच सुरू होणे अपेक्षित असून, तसे झाल्यास हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य बनेल, असे मत महाजन यांनी व्यक्त केले. त्यामुळे सध्या एनपीए असलेले हे खाते पुन्हा नियमित कर्ज खाते म्हणून वर्गीकृत होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने रत्नागिरी प्रकल्पासाठी पेट्रोनेट एलएनजी या कंपनीला आवश्यक तेवढय़ा गॅसचा पुरवठय़ाची तात्पुरती सोय करण्यास सांगितले आहे.