Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

डबल डेकर पण बस नव्हे पार्किंग
शशिकांत कोठेकर

मुंबईतील बेस्टसेवा वाढविण्यासाठी ‘बेस्ट’ने केंद्र शासनाच्या मदतीने नवीन एक हजार बसेस घेण्याचा निर्णय घेतला असून या बसेसच्या पार्कीगची अडचण होऊ नये, यासाठी डबल डेकर पार्कीग व्यवस्था सध्याच्या बस आगारांच्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवा सक्षम केली तर, रिक्षा-टॅक्सी तसेच खाजगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. मुंबईतील प्रवासी वाहतूकीत रेल्वे व बेस्ट यांचा मोठा वाटा आहे. रेल्वेने रोज ६० लाखापेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात.

‘स्लमडॉग’फेम रसूल मराठी चित्रपटात
सुनील डिंगणकर

चित्रपट हे दृक् श्राव्य माध्यम आहे. पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तिरेखांच्या संवादांप्रमाणेच वातावरणातील विविध ध्वनींचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवत असतो. ‘स्लमडॉग..’च्या परिणामकारकतेत कथा, पटकथा, अभिनय याप्रमाणेच चित्रपटातील वेगवेगळे ध्वनी भर घालतात. कधी तो आवाज धारावीच्या झोपडपट्टीतील असतो, कधी ‘पीला हाऊस’मधील वातावरणाचा तर कधी ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या सेटवरचा. हा परिणाम घडवून आणणाऱ्या रसूल पुकूट्टी याला ‘साऊंड मिक्सिंग’साठी ऑस्कर नामांकन मिळाले आहे. हाच रसूल पुकूट्टी ‘स्वराज्य’ या मराठी चित्रपटासाठी काम करीत आहे. मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच वापरली जाणारी ‘सिन्क साऊंड’ ही यंत्रणा या चित्रपटासाठी वापरण्यात येणार आहे.‘स्प्लिट वाइड ओपन’, ‘ब्लॅक’, ‘मिथ्या’, ‘गझनी’ या चित्रपटांसाठी रसूल पुकूट्टीने ध्वनिसंयोजकाचे काम केले आहे. मराठी चित्रपटासाठी काम करण्याविषयी विचारणा केली असता रसूल म्हणाला की, चित्रपटाचे बजेट किती आहे, यापेक्षा चित्रपट तयार करण्यामागे कोणती भावना आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे असते. ‘स्लमडॉग..’च्या तुलनेत ‘स्वराज्य’चे बजेट कमी असले, तरी ‘स्लमडॉग..’साठी जेवढे कष्ट केले तेवढेच कष्ट मी स्वराज्य’साठी करणार आहे

जनतेकडून जनतेकडे : नगरसेवकाचा एक प्रयोग
बंधुराज लोणे

‘जनतेने जनतेसाठी चालविलेले राज्य’ म्हणजे लोकशाही असे आपल्याला शाळेत शिकविले जाते. मात्र प्रत्यक्षात सत्ता ही लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही यांच्या हातात असल्याचे वास्तव आपण अनुभवतो. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात जनतेचा थेट सहभाग असवा म्हणून एक नगरसेवक सध्या प्रयत्न करीत आहे. त्यांचे नाव आशिष शेलार. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचा सहभाग असावा असे अपेक्षित असते. ७४ व्या घटना दुरुस्तीने अशी तरतूद केली आहे. मात्र या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात लोकांचा सहभाग असावा म्हणून सत्ताधारी पक्षाने आपल्याच कार्यकर्त्यांची प्रभाग समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात घटना दुरुस्तीचा फायदा झालाच नाही.

‘बाबुल मोरा’ ला मिळाली सैगल यांच्या नातवाची दाद!
प्रतिनिधी

दिवंगत गायक आणि अभिनेते के. एस सैगल यांनी आपल्या आवाजात म्हटलेली ‘जब दिल ही टूट गया’, ‘दिया जिसने दिल’ ही आणि या सारखी अनेक गाणी आजही सैगलप्रेमी आणि गानरसिकांच्या ओठावर आहेत. गायक विनायक जोशी आणि त्यांचे सहकारी सैगल गाण्यांचा ‘बाबुल मोरा’ हा कार्यक्रम सादर करतात. आजपर्यंत या कार्यक्रमाचे चाळीस प्रयोग झाले असले तरी गेल्या रविवारी विलेपार्ले येथे झालेला ‘बाबुल मोरा’चा प्रयोग खास म्हणावा लागेल. कारण या कार्यक्रमास सैगल यांचे नातू सलीम र्मचट स्वत: उपस्थित होते. त्यांची खास कौतुकाची थाप ‘बाबुल मोरा’ला मिळाली.

जग काबीज करायचे असेल तर गांधीयन इंजिनीअरिंगची गरज -रघुनाथ माशेलकर
प्रतिनिधी

जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि समाजाच्या सर्व स्थरांपर्यंत जो उद्योजक पोहचतो त्याला मोठी बाजारपेठ मिळेतेच. समाजातील विषमता दूर व्हायला हवी हे गांधीजींच्या इंजिनीअरिंगमधील साधे तत्व अंमलात आणले तर, आपल्याला जागतिक बाजारपेठ जिंकणे कठीण नसल्याचे मत प्रख्यात संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. ‘उद्योगश्री प्रकाशन व म्हैसकर फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित सोळाव्या उद्योगश्री गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील १३ उदयोजकांना उदयोगश्री गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला 'लोकसत्ता'चे संपादक कुमार केतकर, अन्नपूर्णा महिला मंडळाच्या प्रेमा पुरव, कॅम्लीन उद्योगसमुहाचे सुभाष दांडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा मिनल मोहाडीकर, निमंत्रक भीमाशंकर कठारे व्यासपिठावर उपस्थित होते.

गोरेगाव येथे ‘दीनानाथ दलाल-एक स्मरणयात्रा’
प्रतिनिधी

प्रबोधन गोरेगाव या संस्थेतर्फे ‘चार दिवस मौजेचे’ या कार्यक्रमांतर्गत ‘दीनानाथ दलाल-एक स्मरणयात्रा’ या दलाल यांच्या निवडक चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रकार वसंत सरवटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले व त्यांनी उपस्थीतांबरोबर प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. प्रत्येक चित्राचे त्यांनी कौतुक केले. शिवदरबार या चित्रासंबंधी बोलताना ते म्हणाले की, या चित्राचा आस्वाद घेण्यासाठी हे चित्र दहा मिनिटे तरी न्याहाळले पाहीजे. या प्रदर्शनात दलाल यांनी रेखाटलेली विनोबा भावे, संत तुकाराम, गाडगेबाबा अशी व्यक्तीचित्रे आहेत. दीनानाथ दलाल यांनी अनेक मराठी पुस्तके, दिपावली, सत्यकथा अशा मासिकांच्या मुखपृष्ठावर चित्रे काढली आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावे आणि रसिकांनी मनमुराद आनंद घ्यावा असे बरेच काही येथे आहे, असे सरवटे यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी यावेळी उत्तरे दिली. हे प्रदर्शन रविवार २५ जानेवारीपर्यंत सकाळी १०.०० ते रात्री ९.०० या काळात रसिकांसाठी खुले आहे. ज्योत्सना प्रकाशनाने प्रकाशीत केलेले दीनानाथ दलाल हे पुस्तकही सवलतीत उपलब्ध आहे. पांडूरंगवाडी मैदान, मसुराश्रमासमोर, पांडूरंगवाडी चौथा रस्ता, गोरेगाव (पू.) येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

आज दादरमध्ये मोलकरणींचा मेळावा
घरेलू कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निर्धार

प्रतिनिधी: नुकत्याच सरलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रात मोलकरणींसाठी जिल्हावार कल्याण मंडळ तसेच मंडळामार्फत पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, मुलांसाठी शैक्षणिक भत्ता, आजारपणासाठी वैद्यकीय मदत आदी सुविधा निर्माण करणारा कायदा पास करण्यात आला. या मागणीसाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षांसाठी मोलकरणींना संघटित करणाऱ्या ‘सर्व श्रमिक संघटने’ने आता या कायद्याच्या ताबडतोबीने अंमलबजावणी करवून घेण्याचा निर्धार करण्यासाठी येत्या शनिवारी २४ जानेवारीला दुपारी ४ वाजता वनमाळी हॉल, दादर (प.) येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.
ग्रामीण भागातील अरिष्टामुळे शहरांकडे होणारे स्थलांतर आणि शहरातही बंद पडलेला रोजगार याच्या परिणामी तसेच वाढत्या शहरीकरणाची गरज म्हणून अलीकडे मोलकरणींच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. पण कामगार म्हणून दर्जा सोडाच, माणुसकीची वागणूकही मोलकरणींच्या वाटय़ाला येत नाही, असा कैक जणींचा अनुभव आहे. म्हणूनच मोलकरणींसाठी स्वतंत्र कायदा व कल्याण मंडळाची निर्मिती या प्रश्नावर सर्व श्रमिक संघटनेतर्फे आंदोलने केली जात होती. त्याचीच परिणती म्हणून नागपूर अधिवेशनात सरकारने ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम २००८’ला मंजूरी दिली. आता त्याला कायद्याचे रूप प्राप्त झाले असून, लवकरात लवकर मुंबईसह संपूर्ण राज्यात अंमलबजावणीसाठीही संघटनेला पुन्हा आंदोलनच करावे लागेल, असे मत कॉ. उदय भट यांनी व्यक्त केले. कामाचे निश्चित तास, कामाचा दर, साप्ताहिक रजेचा अधिकार या आपल्या आंदोलनाच्या कळीच्या मागण्यांना सरकारने स्पर्शच केला नसल्याचे भट यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला महिला मोलकरणींसह, पुरूष घरेलू कामगारांनाही मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

गोरेगावचा गुरांचा बाजार हटविण्याची मागणी
प्रतिनिधी

गोरेगाव पुर्व येथील स्टेशनजवळ सुरू असलेला गुरांचा बाजार हलवून न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वसई-पालघर येथे स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी गोरेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गोरेगाव पुर्व येथे गेल्या अनेक वर्षांपासून गुरांचा बाजार भरतो. मुंबईतील तबेले हटवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार वसई परिसरात अनेक तबेले हटवण्यात आले. गोरेगाव येथील गुरांचा बाजार पालघरला हलवण्याबाबत प्रस्ताव मंजूर होऊही गुरे व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हा बाजार अद्यापही गोरेगावलाच भरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गुरांच्या बाजारामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. तसेच अस्वच्छता पसरते. हा बाजार गोरेगाव येथून हटवू नये यासाठी व्यापारी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत गुरांचा बाजार मुंबईबाहेर हलवण्याचे आदेश दिले. या बाजारात ५१४ गुराना ठेवण्याची शेड आहे. तर २१२ व्यापाऱ्यांक डे गुरांचा व्यापार करण्याचा परवाना आहे. प्रत्यक्षात वर्षांचे बाराही महिने येथे गुरांचा व्यापार सुरू असतो. एक हजारावर गुरांचा वावर या परिसरात असतो. गुरे घेऊन येणाऱ्या गाडय़ा रस्त्यातच पार्क केल्या जातात. या सगळ्या त्रासाला गोरेगाववासिय कंटाळले असून पालिकेने कारवाई करून हा बाजार तेथून त्वरित हटवावा अशी मागणी त्यानी केली आहे. शिवसेनेने देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत हा बाजार तातडीने हलवण्याची मागणी केली आहे.

आतंकवाद विरोधात मानवता रॅली
प्रतिनिधी

समीप प्रतिष्ठान व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 'मिशन मानवता' या प्रकल्पाचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनापासून सिंधुदुर्ग जिल्हातून करण्यात येणार आहे. दहशतवादाचा विरोध करून आम्ही सारे भारतीय एक आहोत हा संदेश जगाला देण्यासाठी सावंतवाडी येथील एस.पी.के. महाविद्यालयापासून २६ जानेवारी रोजी नारायण राणे यांच्या हस्ते रॅलीला सुरूवात होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई जिल्हयातून ही रॅली कलिना विदयानगरी येथे ३० जानेवारी रोजी पोचणार आहे. रॅलीत सर्वधर्म समभाव दाखवणारे देखावे ट्रकमध्ये असणार आहेत. या ट्रकवर एक कलश ठेवण्यात येणार असून त्या कलशात विविध ठिकाणची मूठभर माती जमा करण्यात येणार आहे. या मातीत मानवता वृक्ष रोपण कुलगुरू विजय खोले यांच्या हस्ते विद्यानगरीत करण्यात येणार आहे. रॅलीत ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, समाजसेवक, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी यांनी या रॅलीत एक मुठ माती अर्पित करून राष्ट्रीय एकात्मतेचा आवाज बुलंद करण्यास सहकार्य करावे असे आवाहन समीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल सरिता भाऊदास व सचिव वर्षां वि.वि.यांनी केले आहे.

‘पायरसी’ग्रस्त म्यझिक कंपन्या आंदोलनाच्या पावित्र्यात
प्रतिनिधी

मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रभर होणाऱ्या पायरसीमुळे हिंदीप्रमाणेच मराठी संगीताच्या सीडी तयार करणाऱ्या कंपन्या बुडित खात्यात जाऊ लागल्या आहेत. पायरसीच्या वाढत्या प्रभावामुळे संगीताच्या अधिकृत उद्योगावर सुमारे ९० टक्के परिणाम झाला आहे. याबाबत शासनाने याबाबतीत ठोस उपाययोजना करावी यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर कृणाल, शेमारू, फाऊंटन, सुमीत, एव्हरेस्ट, प्रीझम इत्यादी म्युझिक कंपन्यांनी अलीकडेच एकदिवसीय उपोषण केले. पायरसीविरोधात शासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर येत्या १५ दिवसांत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
पायरसीमुळे शासनालाही या उत्पन्नाला मुकावे लागत असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. यावर उपाय म्हणजे पायरेटेड सीडी विकणे हा अजामिनपात्र गुन्हा व्हावा, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे