Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
नवनीत

बौद्ध धर्मात ईश्वराची संकल्पना नाही. तो एक ‘अनिश्वरवादी धर्म’ आहे. ईश्वर हा सृष्टीचा निर्माणकर्ता व नियंत्रक आहे, असे तो मानीत नाही. हे विश्व स्वयंभू आहे. तो कार्यकारणभावाच्या नियमाप्रमाणे चालते. त्याच्या धारणेसाठी कोणत्याही अदृश्य व अचिंतनीय अशा

 

विश्वव्यापी चैतन्यशक्तीची आवश्यकता नाही, असे गौतम बुद्धाचे सांगणे होते. बौद्ध धर्मातील निर्मिकाच्या कल्पनेपेक्षा विज्ञानाशी अधिक जवळ आहे.
बौद्ध धर्मात जातीभेदाला थारा नाही. ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांना शिकवण नैतिक आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे, याबद्दलचे नियम त्यांनी घालून दिले आहेत. प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री ही त्यांनी धर्माची मूलतत्त्वे मानली. दु:ख, नाहीसे करण्यासाठी सम्यक संकल्प, सम्यक विचार, सम्यक भावना असा अष्टांगमार्ग त्यांनी दाखवून दिला. बौद्ध धर्मातील ‘निर्वाण’ ही मृत्यूनंतर प्राप्त होणारी अवस्था नाही, निर्वाण याचा अर्थ दु:खापासून मुक्तता. दु:खाचे मूळ कारण तृष्णा म्हणजे लोभ व वासना हे होय. माणसाने आपल्या वासनेवर विजय मिळविला तर त्याला दु:खापासून स्वत:ची मुक्तता करून घेता येते. सुखोपभोगाच्या मागे चालणारा मनुष्य स्वत:च्या आयुष्यात अधिकाधिक दु:खच निर्माण करतो. मात्र इंद्रियांना लगाम घालण्यासाठी कायाक्लेशाची आवश्यकता नाही. उपभोग आणि कायाक्लेश या दोघांनाही त्याज्य मानून निर्वाण प्राप्तीच्या उद्देशाने वैराग्याचा मध्यममार्ग अनुसरण्याचा बुद्धाने आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे.
नलिनी पंडित
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव मंच)

स्पंदक तारा (पल्सार) म्हणजे काय? स्पंदक ताऱ्यांचा शोध कसा लागला?
स्पंदक ताऱ्याचे स्वरुप त्याच्या पूर्ण इंग्रजी नावावरून अधिक स्पष्ट होते. ‘पल्सेटिंग रेडिओ सोर्सेस’ असे हे नाव आहे. असे तारे रेडिओ लहरी उत्सर्जित करतात. या लहरी सतत येत नाहीत. दोन लगतच्या रेडिओ संदेशांमध्ये अल्पवेळ जातो. म्हणूनच या ताऱ्यांना ‘स्पंदक तारे’ म्हणतात. शास्त्रज्ञांना या ताऱ्यांबद्दल आता बरीच माहिती मिळाली आहे. १० ते १५ कि.मी. व्यासाच्या ताऱ्याची कल्पनाही तुम्ही केलेली नसेल. इतके लहान तारे न्यूट्रॉनचे बनलेले असतात. सूर्यापेक्षा खूप जास्त वस्तुमान असलेल्या ताऱ्याच्या जीवनक्रमात शेवटी त्याचा स्फोट होतो. या स्फोटातून जो गाभा उरतो तोच हा न्यूट्रॉन तारा. या ताऱ्याचे चुंबकीय क्षेत्र सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या कित्येक लक्षपट असते. हे तारे अतिशय वेगाने गिरकी घेत असतात. त्यांचे वेगाने होणारे परिवलन व प्रखर चुंबकीय बल यामुळे रेडिओ लहरी निर्माण होतात. हा झोत आपली रेडिओ दुर्बीण ग्रहण करते. एकाद्या बॅटरीचा दिवा लागलेला आहे आणि ती बॅटरी जोराने गरगर फिरते आहे अशी कल्पना करा. या बॅटरीचा प्रकाशझोत आपल्याकडे सतत राहणार नाही. झोताची दिशा आपल्याकडे वळली म्हणजेच आपल्याला प्रकाश दिसेल. तसेच या ताऱ्यांकडून येणाऱ्या रेडिओ लहरींचे आहे. इथे येणारा झोत प्रकाशाचा नसून रेडिओ लहरींचा आहे.
हे तारे स्वत:भोवती किती जोराने फिरत असतात याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. सर्वात कमी वेगाने फिरणारा असा तर फक्त चार सेकंदात एक गिरकी घेतो. काही तारे एका सेकंदात हजारो गिरक्या घेतात. म्हणूनच य ताऱ्यांना स्पंदमान तारे (पल्सार) म्हणतात.
१९६७ साली पहिला स्पंदक इंग्लंडमधील रेडिओ दुर्बिणीद्वारे जोसलिन बेल आणि अँथनी हुइश यांनी शोधला. आजमितीस सुमारे ६५० स्पंदमान तारे शोधण्यात आले आहेत.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

महमद पैगंबरांनी निवडलेल्या चार खलिफांमधले चौथे खलिफा अली इब्ज तालीब हे पैगंबरांच्या फातिमाबिबी या कन्येचे पती. अत्यंत विश्वासू, अत्यंत धाडसी. इस्लामी कालगणना (हिजरी सन) रूढ करण्याची शिफारस त्यांचीच. ६५६ मध्ये खिलाफतीवर आले, पण पैगंबरांच्या विधवा पत्नीनेच त्यांच्याविरुद्ध बंड केले. हे बंड अलींनी मोडून काढले, परंतु क्षीण ताकद झालेल्या खिलाफतीचे मर्मस्थान ओळखत अब्द अल रहमान बिन मुल्जमने अलींची हत्या केली, ती २४ जानेवारी ६६१ रोजी.
संजय शा. वझरेकर

संध्या, मीना, राघव यांना त्यांचे आजोबा फार आवडायचे. ते त्यांना फिरायला कधी टेकडीवर, कधी नदीकाठी न्यायचे. पक्षी दाखवायचे. झाडे ओळखायला शिकवायचे. गोष्टी सांगायचे. त्यांच्याबरोबर बसून कार्टून फिल्म्स पाहायचे. बाबा शेतीच्या कामासाठी गावी गेले होते. ते चार दिवसांनी येणार होते. शाळेला शनिवार- रविवार धरून सुट्टी होती. त्यामुळे तीन दिवस हुंदडायला मिळणार होतं. संध्याकाळी शेजारच्या ग्राउंडवर तिघांची बैठक जमली.
राघव : बाबा इथे नाहीत. तीन दिवसांनी आजोबांचा वाढदिवस. कसा साजरा करायचा?
मीना : अरे त्यात काय एवढं विचार करण्यासारखं आहे? आई पुरणपोळ्या करेलच.
संध्या : वाग ग वा! पुरणपोळ्या खाल्ल्या की झाला वाढदिवस? मग तू वाढदिवसाला बूट का घेतले.
राघव : माझ्या फार मनात आहे की आजोबांना वाढदिवसाला मफलर किंवा कानटोपी घ्यावी.
संध्या : नको, नको चष्मा कुठे ठेवला ते सारखा विसरतात. आपण त्यांना चष्म्याची चेन देऊ.
काहीही भेट आणायची तर पैसे लागणार. बाबा इथे नाहीत. आईकडे मागणं बरं नव्हे. मग काय बरं करायचे? पैशाचा प्रश्न कसा सोडवायचा यावर विचार सुरू झाला.
राघव : आपण कष्ट करून पैसे मिळवू. आजोबांना त्याचं जास्त कौतुक वाटेल.
मीना : डुंबरेकाकांच्या पेरूच्या बागेत पेरू तोडायला जाऊया? मजुरी छान मिळते.
संध्या : त्यापेक्षा इंदिरा वसाहतीतल्या रात्रीच्या शाळेत शिकवायला जाऊया?
राघव : फक्त तीनच दिवस आहेत. तेवढय़ाचे काय पैसे मिळणार?
ग्राउंडवर फिरायला येणाऱ्या बेंद्रेकाकांनी तिघांचे बोलणे ऐकले होते. त्यांना मुलांना आजोबांबद्दल वाटणारे प्रेम आणि श्रम करण्याची तयारी याचं कौतुक वाटलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी राघव ब्रेड आणायला सायकलवरून बेकरीत निघाला होता. तेव्हा त्याला बेंद्रेकाका बागेत झाडांना पाणी घालताना दिसले. थांबून त्याने विचारलं, ‘‘काका, आज तुम्ही का पाणी घालताय?’’ ‘‘अरे माळी तीन दिवस येणार नाही. कुंडय़ा लगेच कोमेजतात. शिवाय पाचोळाही पडलाय खूप.’’ राघवला वाईट वाटलं. बेंद्रेकाकांना कसं झेपणार हे काम या वयात? विचार करून तो म्हणाला, ‘‘काका, मी घालतो पाणी आणि बागही झाडतो.’’ बेंद्रेकाका म्हणाले, ‘‘तीन दिवस बाग सांभाळा त्याचं बक्षीस देईन मी तुम्हाला आणि पोरांना आता आजोबांचा वाढदिवस करता येईल म्हणून ते हळूच मिशीत हसले. ब्रेड घेऊन घरी जाताना राघवला पैशाचा प्रश्न सुटल्याचे संध्या, मीनाला कधी सांगतो असं झालं.
इतरांचा विचार करा. त्यांना मदत करा. चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते.
आजचा संकल्प - मी दुसऱ्याला नेहमी मदत करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com