Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

नवी मुंबईतील क्रीडापटूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे - गणेश नाईक
बेलापूर/वार्ताहर

नवी मुंबईने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली असून आता भविष्यकाळात येथील क्रीडापटूंनी उत्कृष्ट खेळाद्वारे देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानावर नवी मुंबई क्रीडा संकुलाच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते.भविष्यात नवी मुंबईचा क्रीडा क्षेत्रातील मौलिक सहभाग असेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी वैयक्तिक व सांघिक खेळातील ३५० विजेत्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नवी मुंबईतील राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला.

चिकू संशोधनासाठी केंद्र झाले उदार
राजीव कुळकर्णी

सबंध देशात प्रसिद्ध असलेल्या ‘घोलवड चिकू’कडे आता भारतीय कृषी अनुसंधान परिषद सोसायटीचेही लक्ष गेले असून, बंदरपट्टी भागात प्रचंड रोजगार निर्मिती देण्याची क्षमता असलेल्या चिकू फळावर सर्वंकष संशोधन व्हावे, यासाठी अद्ययावत केंद्र पालघर येथे उभारण्यास परिषदेने तत्वत: मंजुरी दिली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या या सोसायटीची वार्षिक सभा अलीकडेच नवी दिल्ली येथे झाली. डॉ. सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावात पवार यांनी विशेष रस दाखविल्याने चिकू संशोधन केंद्र अकराव्या पंचवार्षिक योजनेत सुरू होण्यात आडकाठी येणार नाही, असे मानले जाते.

‘आधुनिक विज्ञानात निसर्गाहाराचा विचार नाही’
पनवेल/प्रतिनिधी :
अन्नभक्षणाने केवळ शरीराचे पोषण होत नसून त्यामुळे पोटात विषनिर्मिती व विषसंचयही होतो. हा अतिरिक्त विषसंचय टाळण्यासाठी आयुर्वेद व निसर्गोपचारामध्ये निसर्गाहाराचे महत्त्व सांगण्यात आले आहे. परंतु आधुनिक विज्ञानात या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला गेला नसल्याने आज चुकीच्या आहारपद्धतीमुळे अनेक व्याधी उद्भवत आहेत, असे प्रतिपादन योग प्रशिक्षक दुर्गादास सावंत यांनी केले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ योग अ‍ॅड आयुर्वेद व आरोग्य सेवा समिती, पनवेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

..उशिरा का होईना, अखेर प्रशासनाला जाग आली!
प्राजक्ता कदम

नायगावच्या एलए-१ मध्ये २००१ साली पोलीस शिपाई म्हणून भरती झालेला प्रदीप निंबाळकर हा २८ वर्षांचा तरुण २६ जुलै २००५ साली मुंबईत आलेल्या महापुरामध्ये अनेकांचे जीव वाचविताना वाहून गेला. घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच २००७ साली त्याच्या या शौर्याची दखल घेत त्याला मरणोत्तर शौर्य पदक जाहीर झाले. पण हा गौरव मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागली. उद्या, २५ जानेवारी रोजी प्रदीपच्या कुटुंबियांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

परीक्षा विभाग सक्षम करणार
तुषार खरात

अनेकविध त्रुटी, गैरप्रकार आणि चुका यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कार्यपद्धतीत सुटसुटीतपणा आणण्यासाठी आता ठोस उपाययोजना करण्यात येणार आहे. विविध अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय अध्यक्ष व विषयनिहाय समन्वयक ही पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीतही प्रश्नपत्रिका अथवा उत्तरपत्रिका कमी पडू नयेत म्हणून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याबरोबरच उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना वाढीव मानधन देण्याचा व त्यांच्यासाठी निवासाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांनी ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांत विविध महाविद्यालयांमध्ये स्वयंअर्थहाय्यित अभ्यासक्रमांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यात बीएमएस, बीएमएम, बीएस्सी-आयटी, बीकॉम इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बीकॉम इन अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अशा अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून उत्तरपत्रिका तपासण्यापर्यंत परीक्षा विभागातील यंत्रणेच्या नाकीनऊ येतात. इतरही अनेक पारंपरिक अभ्यासक्रमांच्या बाबतीत हीच स्थिती आहे. या कार्यपद्धतीत सुटसुटीतपणा आणण्याबरोबरच निकाल वेळेत जाहीर करण्याच्या हेतूने आता महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. परीक्षा विभागात प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी अध्यक्ष असतील तर अभ्यासक्रमांतील विषयांसाठी समन्वयक असतील. समन्वयक आपल्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विविध महाविद्यालयात कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचा शोध घेतील. अशा शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बोलावून काम वेळेत पूर्ण करून घेण्यापर्यंतची जबाबदारी ते पार पाडतील. समन्वयकांमध्ये ज्येष्ठ असलेली व्यक्ती त्या अभ्यासक्रमासाठी अध्यक्ष म्हणून काम करेल. अध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली समन्वयकांची समिती काम करेल. ही समिती कामकाजातील उणिवांचा आढावा घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याबाबतचा निर्णय घेईल. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका बनविण्यासाठीही ही समिती कोणत्या तज्ज्ञ शिक्षकांकडे जबाबदारी सोपवायची याबाबतचा निर्णय घेईल. ही यंत्रणा यापूर्वी काही अंशी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आली होती. पण आता जवळपास सर्वच अभ्यासक्रमांसाठी तिची अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय, परीक्षा देत असताना उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना कमी पडू नयेत, यासाठी गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अत्यल्प मानधन देण्यात येत होते. त्यामुळे गेल्यावर्षी मानधन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक दहा दिवसांपूर्वीच विद्यापीठाने जारी केले आहे. त्यानुसार मुंबईतील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ८० रूपयांऐवजी १७५ रूपये व मुंबईबाहेरील शिक्षकांना ११० ऐवजी २२५ रूपये भत्ता मिळेल. हा भत्ता मार्च२००८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. शिवाय, बाहेरच्या शिक्षकांच्या निवासाचीही सोय करण्यात येणार आहे. कलिना व चर्चगेट परिसरात राहण्याची सोय केली जाईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

अपना बाजारतर्फे उद्या मोफत तपासणी शिबीर
वाशी
: येथील अपना बाजार डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या एच.एन. पाटील आरोग्य केंद्रातर्फे रविवार, २५ जानेवारी रोजी एकदिवसीय मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत रुग्णांची तपासणी करण्यात येईल. एच. एन. पाटील आरोग्य केंद्र, पहिला मजला, अपना बाजार बिल्डिंग, सेक्टर १७, वाशी येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराबरोबर अपना बाजारचे संचालक शिवाजी पवार यांनी अपना बाजारच्या कार्यपद्धतींवर लिहिलेल्या संग्रह पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. नवी मुंबईचे उपमहापौर शशिकांत बिराजदार हे या दोन्ही कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अपना बाजारचे अध्यक्ष प्रभाकर माने हे या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.