Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

कविता राऊतची एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी / नाशिक

मुंबई अर्धमॅरेथॉन मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला भारतीय धावपटू ठरलेल्या ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतने भिलाई येथील नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याने तिची एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. येथील भोसला मिलिटरी स्कूलतर्फे शुक्रवारी एका छोटेखानी सोहळ्यात तिच्या या कामगिरीचा गौरव करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या छोटय़ाशा आदिवासी पाडय़ातील कविता राऊतची धाव आज आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे.

फक्त बससेवेचाच अट्टाहास का?
नाशिक महानगरपालिकेने शहर वाहतूक बस सेवा ताब्यात घ्यावी की नाही यावरून सध्या वादंग सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही उडत आहे. पण, टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा काही पर्यायांचा विचार करून ते प्रत्यक्षात आणले तर सुवर्णमध्य निघू शकतो. संपूर्ण बस सेवा ताब्यात घेण्याचा अट्टाहास करण्याऐवजी पालिकेने सध्याच्या बस सेवेला पूरक ठरेल अशी सेवा शहराच्या विविध भागात सुरू करावी, त्यासाठी मिनी बसेस अथवा तत्सम लहान वाहनांचा उपयोग करावा, हा विचार ‘वृत्तान्त’च्या माध्यमातून मांडण्यात आला होता.

रूट शेअरिंगचा पर्याय अवलंबावा
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेने शहर वाहतूक बस सेवा ताब्यात घ्यावी असा आग्रह सत्ताधारी शिवसेनेचे महापौर विनायक पांडे यांनी धरला असताना त्यांच्याच पक्षाचे महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांनी याबाबत केलेल मतप्रदर्शन..
प्रश्न : महापालिकेने शहर बस सेवा ताब्यात घेण्याबाबत बहुतेक सर्व स्तरातून प्रतिकूल मत व्यक्त होत आहे. पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे स्थानिक पातळीवरील संघटनात्मक प्रमुख म्हणून आपल्याला काय वाटते ?
चव्हाण
: शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा प्रत्येक सर्वसामान्य नाशिककराच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याविषयी सर्व बाजुंचा विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा. ही लोकहिताची व्यवस्था आहे, हे लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टीने तोडगा काढायला हवा.

मतदार छायाचित्र प्रारूप याद्या प्रसिध्द
विशेष मोहीम ३१ जानेवारीपर्यंत
नाशिक / प्रतिनिधी

जिल्हयातील निवडणूक विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची प्रारूप याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून या संदर्भातील माहिती संबधित मतदान केंद्र, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक बाजार समितीला दिलेले कर्ज असुरक्षित
जिल्हा बँकेच्या संचालकांची तक्रार
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य बँकेकडून घेतलेल्या कोटय़वधी रुपयांच्या कर्जाची थकबाकी झाल्यामुळे त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या बाजार समितीस नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेले कर्ज असुरक्षित झाले असल्याची तक्रार बँकेच्या संचालकांनी कार्यकारी संचालकांकडे करतानाच थकीत कर्जाच्या वसुलीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.

बदनामी प्रकरणी दावा दाखल करणार - खा. पिंगळे
नाशिक / प्रतिनिधी

डी. ए. पिंगळे अ‍ॅण्ड ब्रदर्स या भागीदारी संस्थेतून ३१ मे २००० रोजी आपण कायमस्वरूपी निवृत्ती स्वीकारली असून बँकेने संबंधित संस्थेला २८ मार्च रोजी कर्ज वितरण केले आहे. असे असताना आपला या कर्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, तरी देखील पंडितराव कातड यांनी बदनामीचा कट रचल्याचा आरोप करीत याबाबत दोन कोटीचा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा खा. देवीदास पिंगळे यांनी दिला आहे.

चांदोरकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी पुरस्कार योजना
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक एज्युकेशन सोसायटीतील ज्येष्ठ शिक्षक विश्वनाथ चांदोरकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाला ज्योतिकलश सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चांदोरकर हे विद्यार्थ्यांना शिकवणे यापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्याच्या हेतुने कला, क्रीडा, साहित्य, इतिहास अशी चौफेर मुशाफिरी विद्यार्थ्यांना घडवून आणत. त्यांच्या कथाकथन शैलीमुळे ते विद्यार्थी वर्गात लोकप्रिय होते. या त्यांच्या निरपेक्ष वृत्तीने जगलेल्या शिक्षकी आयुष्याची स्मृती जपावी, या हेतुने त्यांची कन्या संध्या काळे आणि जावई तथा गायक अभिनेते चंद्रकांत काळे यांनी नाशिक शहरातील विद्यार्थ्यांसाठी पाच पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी त्यांच्या स्मृतिदिनी हे पुरस्कार दिले जातील. यावर्षी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील दहावीत मराठी आणि संस्कृत या विषयात प्रथम आलेले विद्यार्थी, मागासवर्गीय विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय क्रीडा आणि सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना गौरविले जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप एक हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह असे आहे. अधिक माहितीसाठी आमोद मेहता (९२२५१०८६०१), नवीन तांबट (९८२२७४८६५४) आणि नरेंद्र ताटके (९८६०५५७३२०) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची उद्या बैठक
नाशिक / प्रतिनिधी

अण्णा हजारे प्रणित नाशिक जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची महत्वपूर्ण बैठक २५ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जुना आग्रा रोडवरील कालिका मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष हेमंत कवडे यांनी दिली. बैठकीत तालुकावार कामकाजाचा आढाव्यासह माहितीचा अधिकार, ग्रामसभा, बदल्यांचा कायदा, दप्तर दिरंगाई, कार्यालयीन वेळा, अवैध दारू धंदे, अधिकारी मालमत्ता दायित्व प्रपत्र, कर्ज वसुली व ठेवी वाटप अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीस जनआंदोलनाच्या अधिकृत सदस्यांनी व तालुका अध्यक्षांनी उपस्थित रहावे असे आवाहन कवडे यांनी केले आहे.

महापालिकेतील पदोन्नतीचा अनुशेष भरून काढण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

महापालिकेतील सर्व पात्र चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देणेकामी १३२ पदांच्या पदोन्नतीचा अनुशेष भरून काढण्याची मागणी सेवास्तंभ कर्मचारी संघटनेने केली आहे.
या बाबतचे निवेदन संघटनेने पालिका आयुक्तांना दिले. पालिका प्रशासनाने भरती सेवाशर्तीनुसार पदोन्नती कोटय़ाबाबत १९९७ पासून प्रशासकीय कार्यवाही न केल्याने या प्रश्नी वारंवार निवेदन व पत्र देवून लक्ष वेधण्यात आले होते. पदोन्नती समितीचा पालिकेस प्राधिकृत सक्षम प्रशासकीय अधिकार असतानाही गेल्या १२ वर्षांत प्रत्येक भरती वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांची निवड सूची न बनविता केवळ शासनाच्या मार्गदर्शनाने पदोन्नती प्रक्रियेला प्रशासन चालना देत आहे. शासन नियमानुसार मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र नसला तरी पदोन्नतीच्या जागा व्यपगत होत नाही. त्या प्रत्येक भरती वर्षांमध्ये पुढे ओढल्या जातात. या पदोन्नती अनुशेष जागांचा पालिका प्रशासनाने कधी विचार केला नाही. पदोन्नतीसाठी कर्मचारी पात्र असले पण पदोन्नतीसाठी जागा रिक्त नसल्या तरी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार पदोन्नती नाकारता येत नाही, असा शासन निर्णय असताना गेल्या १२ वर्षांत केवळ तीन चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने पदोन्नतीबाबत पालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती मागविली आहे. गुणवत्तेवर सरळ सेवेने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची आरक्षण पदावर गणना करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असताना त्यांची नियुक्ती पदोन्नतीच्या आरक्षण बिंदूवर दर्शविण्यात आली आहे. यावरून शासन निर्णयाप्रमाणे कामकाज न करता त्या बाहेरील कृती नाशिक महापालिका सक्षमपणे पार पाडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कनिष्ठ लिपिक पदाच्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये गेल्या १२ वर्षांतील पदोन्नतीच्या अनुशेष भरण्याकामी सामाजिक प्रवर्गात मोडणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठराविक वार्षिक गणनेची तुलना न करता २००५ पर्यंत पात्रताधारक कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याच्या पदोन्नती समितीमध्ये निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. १३२ पदांवर सामाजिक आरक्षणानुसार पदोन्नतीनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवावी अशी मागणी माजी महापौर अशोक दिवे व संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी केली आहे.

देशभक्तीपर वेशभूषा स्पर्धा
नाशिक / प्रतिनिधी

लोकहितवादी मंडळ व अभिनव लेडीज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘रंग दे बसंती’ ही देशभक्तीपर वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या रविवारी दुपारी चार वाजता ज्योतीकलश सभागृह, राका कॉलनी, शरणपूररोड येथे ही स्पर्धा होणार आहे. वय वर्ष तीन ते पाच व सहा ते आठ असे दोन वयोगट असून स्पर्धकांनी वेशभूषे सोबत संवाद, समर्पक गाणे यांचे दोन मिनीटांत सादरीकरण करायचे आहे. स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. दोनही गटात प्रत्येकी तीन पारितोषिके ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर, कार्यवाह नवीन तांबट व अभिनव लेडीज ग्रुपच्या अध्यक्षा रजनी जातेगावकर यांनी केले आहे.