Leading International Marathi News Daily                                   शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अतिक्रमणे हटविली तरच योजना यशस्वी
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

स्वारगेटच्या जेधे चौकामधील वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे या चौकातील वाहतूक काहीशी सुरळीत झाली असली, तरी या चौकातील वाहतुकीचा ताण थेट जमनालाल बजाज चौकावर आल्याने आता तेथे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याबाबत योग्य नियोजन करण्याबरोबरच नेहरू स्टेडियमसमोरील रस्ता व मित्रमंडळ चौक ते पूरम चौकापर्यंतच्या रस्त्यावरील विविध अतिक्रमणे व अडथळे काढल्याशिवाय वाहतुकीची ही नवी व्यवस्था यशस्वी ठरणार नसल्याचे दिसत आहे.
जेधे चौकामध्ये कालपासून वाहतूक शाखेच्या वतीने अचानक बदल करण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला वाहनचालकांचा गोंधळ उडाला होता. मात्र विविध ठिकाणी दिशादर्शक व स्थलदर्शक फलक लावून, त्याचप्रमाणे विविध चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी ठेवून वाहनचालकांना नव्या व्यवस्थेची माहिती देण्यात येत आहे. शंकरशेठ रस्त्याने हडपसरकडून येणारी वाहने व सातारा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना जेधे चौकातून थेट टिळक रस्त्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांना नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्याने बजाज चौकात येऊन उजव्या बाजूने पूरम चौकातून टिळक रस्त्यावर यावे लागते. त्याचप्रमाणे मित्रमंडळ चौकाकडून थेट जेधे चौकात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनाही पूरम चौकातून टिळक रस्त्यावर येऊन जेधे चौकाकडे यावे लागते. या वाहतूक व्यवस्थेमुळे नेहरू स्टेडियमसमोरील रस्ता व पूरम चौक ते जेधे चौकापर्यंतचा टिळक रस्त्याचा भाग हा एकेरी झाला आहे.
नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे जेधे चौकामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात नक्कीच कमी झाली आहे. चौकात आता चारऐवजी तीनच वाहतूक नियंत्रक दिवे राहिले असल्याने वाहने चौकात थांबण्याची वेळही कमी झाली आहे. सिग्नलजवळ वाहने जास्त वेळ थांबत नसल्याने प्रदूषणाची पातळीही कमी होऊ शकणार आहे. जेधे चौकातील समस्या काही प्रमाणात सुटली असली, तरी शेजारील इतर चौकांमध्ये व रस्त्यांवर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. शंकरशेठ रस्त्याने व सातारा रस्त्याने येणारी वाहने नेहरू स्टेडियमच्या रस्त्याने पुढे जातात. या रस्त्यावर हातगाडय़ांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे स्वारगेट पाणीपुरवठा विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पॅगो रिक्षांचा थांबा आहे. या अडथळ्यांमुळे रस्ता अरुंद होत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो.
बजाज चौकामध्ये सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. मित्रमंडळ चौकाकडून टिळक रस्त्याकडे जाणारी वाहने व शंकरशेठ रस्ता, तसेच सातारा रस्त्यावरून टिळक रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना बजाज चौकात यावे लागते. त्यामुळे या जेधे चौकातील कोंडी आता बजाज चौकामध्ये होत असल्याचे दिसत आहे. चौक मोठा असला तरी तेथे पुतळा व कारंजा असल्याने चौकातून जाणारे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या भागात वाहतुकीचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या भागातील अतिक्रमणे हटविली तरच योजना यशस्वी व काही अडथळेही काढणे गरजेचे असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
बसथांब्याचाच अडथळा
नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावरून टिळक रस्त्याकडे जाणारी वाहने बजाज चौकामध्ये उजवीकडे वळण घेतात. वळणाच्या जागेलगतच एक बसथांबा आहे. या थांब्यावर बस थांबलेली असल्यास एकही मोठे वाहन पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हिरवा दिवा सुरू असला तरी वाहतूक थांबलेली असते. थांब्यावरील बसच्या मागे वाहनांच्या रांगा लागतात. ही बस पुढे निघेपर्यंत लाल दिवा सुरू होतो. त्यावेळी मात्र रस्त्याच्या मधोमध अनेक वाहने अडकलेली असतात. अशा परिस्थितीत या चौकात कोंडी होते. हा थांबा चौकापासून दूर नेण्याची गरज आहे.