Leading International Marathi News Daily                                   शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कालव्यालगतची जागा हॉटेलसाठी भाडय़ाने;
पालिकेच्या परवानगीविनाच बांधकाम सुरू
सुनील कडूसकर, पुणे, २३ जानेवारी

स्वारगेट येथे कालव्यालगतची जागा चक्क पाटबंधारे खात्यानेच हॉटेलसाठी भाडय़ाने दिल्याने कालवाच प्रदूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेची परवानगी मिळण्यापूर्वीच संबंधिताने तेथे घाईघाईने बांधकाम सुरू केल्याचे दिसून आले. ‘लोकसत्ता’ने याबाबत चौकशी सुरू करताच सरकारी यंत्रणेला जाग आली आणि महापालिके ने तातडीने त्यास नोटीस बजावली, तसेच पाटबंधारे खात्यानेही ‘या हॉटेलमुळे प्रदूषण झाल्यास आम्ही तातडीने कारवाई करू’ अशी भूमिका जाहीर केली.
अकरा महिन्यांच्या कराराने पाच वर्षेपर्यंत जागा भाडय़ाने देण्याच्या धोरणानुसार सुमारे वर्षभरापूर्वीच मुठा उजवा कालव्यावरील या जागेत व्यवसायासाठी ही परवानगी दिली गेली आहे. तथापि, अशा प्रकारच्या

 

परवानग्या देणे सध्या बंद करण्यात आले आहे. संबंधितांकडून कालव्याचे प्रदूषण होते आहे वा धोका निर्माण होतो असे आढळून आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असेही पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश सुर्वे व खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले. प्रदूषण होईपर्यंत वाट पाहणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
पाटबंधारे खात्याची जागा एखाद्याला व्यवसायासाठी भाडय़ाने दिलेली असली तरी तेथे व्यवसाय सुरू करण्याचे परवाने देण्याचे अधिकार महापालिकेकडेच आहेत. अन्नधान्य भेसळ प्रतिबंधक विभाग, आरोग्य विभाग आणि दुकाने विषयक कायद्यानुसारही संबंधिताला परवानगी घ्यावी लागते. या सर्व परवानग्या मिळविल्यानंतरच संबंधिताने प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करणे अपेक्षित आहे, असे स्पष्टीकरणही या खात्याच्या अधिकाऱ्यांनी या वेळी केले.
स्वारगेट एसटी स्थानक व मुठा उजवा कालव्यादरम्यानच्या जागेत हॉटेलसाठीचे हे बांधकाम सुरू आहे. पाटबंधारे खात्याचे कर्मचारी शेवाळे यांच्या मुलानेच येथे व्यवसायासाठी परवानगी मागितली असून, खात्याने त्यांना अकरा महिन्यासाठी २१ हजार ६०० रुपये भाडे घेऊन अडीचशे चौरस फुटाची जागा भाडय़ाने दिली. या जागेत हॉटेलसाठीची टपरी अडीचशे चौरस फुटाची असली तरी त्याभोवतालच्या सुमारे एक हजार फूट जागेवर त्यांनी कुंपणभिंत उभारली आहे. स्वारगेट एसटी आगाराचे अधिकारी व पोलिसांच्या सूचनेनुसार आपण ही कुंपणभिंत उभारली असल्याचा खुलासा त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केला आहे.
पालिकेच्या टिळक रोड विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी या बांधकामाची पाहणी केली. एक महिन्याच्या आत हे बेकायदा बांधकाम काढून टाकावे अन्यथा त्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधिताला दिले आहेत.