Leading International Marathi News Daily                                   शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शमशाद बेगम यांना यंदाचा ओ. पी. नय्यर पुरस्कार
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

‘सैंय्या दिल मे आना रे. आके फिर ना जाना रे’
‘लेके पेहला पेहला प्यार.. भर के आखों मे खुमार..,
‘मेरे पिया गये रंगून किया है .. वहाँ से टेलिफून..
या गीतांना आपल्या सुमधूर आवाजात गाऊन अजरामर करणाऱ्या पाश्र्वगायिका शमशाद बेगम यांना या वर्षांचा ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
ओ. पी. नय्यर फाउंडेशनचे विश्वस्त नंदू बेलवलकर व रोहन पुसाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गुरुपाल शर्मा उपस्थित होते.
बेलवलकर यांनी सांगितले की, संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त शमशाद बेगम यांना येत्या २९ जानेवारी रोजी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी पुरस्कार देण्यात येणार आहे. चित्रपट संगीत क्षेत्रात प्रदीर्घ कालावधीसाठी आपले योगदान देऊनही चित्रपटसृष्टीने शमशाद बेगम यांना कोणत्याही पुरस्काराने गौरविलेले नाही. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांना ‘ओ. पी. नय्यर’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत गुलाम हैदर यांच्यापासून ओ. पी. नय्यर यांच्यापर्यंत बहुतेक सर्व संगीतकारांसाठी आपला आवाज दिला. हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरेल.
मी संगीतबद्ध केलेले ‘कभी आर कभी पार लागा तिरे नजर.. सय्या घायल किया रे तुने मेरा जिगर..’ हे गीत शमशाद बेगम यांनी गायले. त्यामुळे माझ्या संगीत क्षेत्रास योग्य वळण मिळाले असे ओ. पी. नय्यर सांगत असतं. शमशाद बेगम यांनी गायलेल्या अनेक गीतांचे आज ‘रीमिक्स’ होत आहे. अशी गीते नव्या पिढीला आवडत आहेत. माझ्या संपत्तीचा वापर चित्रपटसृष्टीतील गरजू कलावंतांसाठी करावा, असे ओ. पी. नय्यर यांनी आपल्या इच्छापत्रात लिहून ठेवले आहे. त्यानुसार शमशाद बेगम यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असताना त्यांनी पुरस्काराची रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असेही बेलवलकर यांनी सांगितले.
पुसाळकर यांनी सांगितले की, एक किलो चांदीच्या वजनाचे स्मृतिचिन्ह व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम शमशाद बेगम यांच्या इच्छेनुसार रेणुताई गावस्कर संचालित पुण्यातील एकलव्य चाईल्ड एज्युकेशन अँड हेल्थ फाउंडेशन या संस्थेस मदत म्हणून देण्यात येणार आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात शमशाद बेगम यांनी गायलेली व संगीतकार नौशाद, सी. रामचंद्र, श्यामसुंदर, हंसराज बहल, राम गांगुली, ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे ओ. पी. नय्यर व शमशाद बेगम यांच्यावरील दुर्मिळ चित्रफितही दाखविली जाईल.