Leading International Marathi News Daily                                   शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने आसमंत भारावतो तेव्हा..!
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान पुणेकरांच्या वतीने केला जात होता.. आणि हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार करत हजारो पुणेकर आज उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते, वंदे मातरम्, वंदे मातरम्!
उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी आयोजित केलेल्या ‘कोथरूड महोत्सवा’ची सांगता आज ‘क्रांतिसूर्य सावरकर’ या महानाटय़ाने झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकाच्या प्रयोगापूर्वी आयोजित एका विशेष कार्यक्रमात शहीद पोलीस अधिकारी विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. खासदार भारतकुमार राऊत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत, उपमहापौर मोकाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, माजी मंत्री शशिकांत सुतार, रा. स्व. संघाचे महानगर सहसंघचालक शरद घाटपांडे, सेनेचे शहरप्रमुख नाना वाडेकर आणि कोथरूड विभागप्रमुख बाळा टेमकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
साळसकर यांचा सन्मान त्यांचे बंधू दिलीप यांनी, तर कामटे यांचा सन्मान माजी महापौर अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी स्वीकारला. हा सन्मान प्रदान करताना उपस्थित हजारो पुणेकरांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या उत्स्फूर्त घोषणा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने या वेळी आसमंत भारून गेला होता.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे उपमहापौर मोकाटे यांनी प्रास्ताविकात सांगितले. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वत:लाच विचारायची वेळ आली आहे, असे मनोगत वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. मुंबई हल्ल्यातील पोलीस अधिकारी, जवान आणि सर्वसामान्य नागरिकांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसेल, तर आता घराघरात जवान तयार व्हावे लागतील, असे आमदार सावंत म्हणाले.
या देशात यापुढे पुन्हा कधीही ‘२६/११’ घडू नये अशी प्रतिज्ञा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण करणार का, हा खरा प्रश्न आहे. भारत सर्वार्थाने समर्थ होईल आणि कोणत्याही महासत्तेची आपल्याकडे वाकडय़ा डोळ्याने पाहण्याची हिंमत होणार नाही, त्या दिवशी त्या वीर हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली मिळेल, असे खासदार राऊत म्हणाले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
‘क्रांतिसूर्य’ला दाद
या कार्यक्रमानंतर मोहन शेटे दिग्दर्शित ‘क्रांतिसूर्य सावरकर’ हे महानाटय़ सादर झाले. शंभराहून अधिक कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकाला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग पाहताना आणि त्यांचे ओजस्वी विचार ऐकताना प्रेक्षक भारावून गेले होते.