Leading International Marathi News Daily                                   शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

ओशोंची ओळख झाली आणि संगीताच्या गुणवत्तेत फरक पडला - यशवंत देव
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

संगीताची वाटचाल लहानपणापासूनच घरात होती. वडील वेदशास्त्रसंपन्न होते. त्यांना संगीताची जाण होती. बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर, हिराबाई बडोदेकर यांच्यासारखी मंडळी आमच्या घरी येत होती. त्यामुळे लहानपणापासूनच संगीत कानावर पडत गेले आणि संगीताचे संस्कार घरातूनच मिळाले. त्यानंतर ओशोंची ओळख झाली व माझ्या संगीताच्या गुणवत्तेत फरक पडत गेला..’’ ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्या शब्दातून त्यांच्या संगीतजीवनाचा प्रवास आज उलगडला.
निमित्त होते उत्कर्ष प्रकाशनतर्फे ‘मी, संगीत आणि ओशो’ या विषयावर देव यांच्या मुलाखतीचे.
प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी आपल्या शैलीत देव यांना बोलते केले. या वेळी लेखक सत्य निरंजन ऊर्फ पी. सी. बागमार यांनी लिहिलेले ‘प्रिय आत्मन- ओशो स्मृतिगंध’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ‘ओशो टाईम्स’च्या संपादिका अमृत साधना यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, चाकण येथील बजाज ऑटोचे उपमहाव्यवस्थापक श्रीराम शहाणे, संगीतकार मिलिंद जोशी, लेखक पी. सी. बागमार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
देव म्हणाले की, घरात संगीताचे संस्कार झाले असले तरी सुरुवातीला मला कळले ते भावसंगीत होते. नंतर ऐकून ऐकूनच मी संगीत शिकत गेलो आणि वाट मिळत गेली. ज्यांना चाल लावायची असेल त्यांनी प्रथम कवितेचा अभ्यास करावा. चाल लावताना भावनेला सूर द्यावेत. उच्चार, स्वर, शब्द एकत्र आल्याशिवाय गायिकी होऊ शकत नाही.
स्वर हा घटनेच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचवतो, परंतु घटनेचा अर्थ सांगू शकत नाही. त्यामुळे स्वर व शब्द वेगळे झाल्यास त्यांना काहीही किंमत नाही. तसेच गाताना नेहमी शब्द प्रधानतेकडे लक्ष द्यायला हवे. अध्यात्माबद्दल बोलताना देव म्हणाले की, अध्यात्म व विज्ञान हे वेगळे नसून अध्यात्म हेच विज्ञान आहे.
साधना म्हणाल्या की, ओशोंच्या कार्याच्या बाबतीत वाहून घेतलेली बागमार यांच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही. ओशोंचा सभोवताली असणाऱ्या व्यक्तींशी गुरु-शिष्यांचा संबंध होता. ते शिष्यांना पदोपदी आधार, सावली व मार्गदर्शन देत. बागमार यांनी एकाग्रतेने ओशोंचा एक एक शब्द साठवून ठेवून तो पुस्तकातून व्यक्त केला आहे. पुस्तकाची आवृत्ती एका महिन्यात खपली हे पाहून ओशोंचा काळ आला आहे, असे वाटते.
व्यक्तीची संपूर्ण जीवनशैली बदलण्याचे सामथ्र्य ओशोंच्या व्यक्तिमत्त्वात होते. ओशोंची अधुरी भेट घडवण्याचे काम बागमार यांनी केले आहे, असे मत दवणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले, तर सुधाकर जोशी यांनी प्रास्ताविक केले.