Leading International Marathi News Daily                                   शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मराठी चित्रपट ‘हाऊस फुल’ न होण्यास मराठी प्रेक्षकच जबाबदार- गजेंद्र अहिरे
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट ‘हाऊस फुल’ होत नाहीत याला प्रेक्षकच जबाबदार आहेत. आम्ही चित्रपट निर्माण करतो, पण प्रेक्षक पाहायचे काम करत नाहीत, असे मत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आज व्यक्त केले.
आशय फिल्म क्लबतर्फे गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला ‘गुलमोहोर’ हा चित्रपट आशयच्या सभासदांना प्रदर्शनपूर्व दाखविण्यात आला. या वेळी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व दिग्दर्शक अहिरे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. या प्रसंगी ते बोलत होते.
अहिरे यांनी सांगितले, की प्रत्येकाच्या मनात एक गुलमोहोर असतो आणि प्रत्येक जण त्याला फुलविण्याचे काम करत असतो. ‘गुलमोहोर’ म्हणजे आपल्याला आवडणारे, समाधानी करणारे काम व जीवन. या चित्रपटातील नायिका त्या गुलमोहोरास शोधते आणि समाधानाने जीवन जगते.
या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनाच आपण ‘भगवान’ या पात्राची भूमिका का दिली’ या प्रश्नाचे उत्तर देताना अहिरे म्हणाले, की जितेंद्र हा खूप मोठय़ा ताकदीचा नट आहे. तो फार कष्टाळू आणि जिद्दी आहे. पुढील पाच वर्षांत तो खूप मोठा अभिनेता झालेला दिसेल. जितेंद्र हा ‘भगवान’ या पात्राच्या भूमिकेला योग्य न्याय देईल असे मला वाटते म्हणून मी त्याची निवड केली.
‘‘तू कोणतीही ‘भूमिका’ स्वीकारताना फार विचार करतेस; मग ‘गुलमोहोर’ या चित्रपटातील विद्या या पात्राची भूमिका स्वीकारताना तू काय विचार केलास’’ या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाली कुलकर्णी हिने सांगितले, की चित्रपटाचा विषय मला आवडला होता, पण चित्रपटाच्या पटकथेत विद्या या पात्राला खूप वेदनांमधून जावे लागते. विद्याच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, की जे आपल्या आजूबाजूला घडतात. तिच्या जीवनात येणाऱ्या दु:खद प्रसंगांचा विचार करणेही नकोसे वाटते. अशा पात्राला मी न्याय देऊ शकेल का? असा विचार मी करत होते. प्रथमत: या पात्राची भूमिका मी नाकारली होती. पण गजेंद्रच्या आग्रहावरून मी ही भूमिका स्वीकारली.
वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना तुला काय अनुभव येतात, या प्रश्नाला उत्तर देताना सोनाली कुलकर्णी म्हणाली, की अनेक दिग्दर्शक हे माझे मित्र आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. अशा मित्रांना समजावून घेताना मीच प्रगल्भ होत चालले आहे, असे मला वाटते. आजचे दिग्दर्शकही महत्त्वाचे आणि वेगवेगळे विषय निर्भीडपणे मांडताना मला दिसत आहे.या चित्रपटातील नायकाने म्हणजे रजीत कपूरने देखील त्याच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. रजीत कपूर कलाकार म्हणून मला फार आवडतो. कलाकाराकडे जी शिस्त असावी लागते, ती शिस्त त्याच्याकडे आहे. लहानमोठय़ा प्रत्येक गोष्टीत तो रस घेतो आणि रस घेणारे कलाकार असतील तर काम करायला ही मजा येते. असे सोनालीने प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
अहिरे यांनी दिग्दर्शित केलेला व स्वत:च पटकथा लिहिलेला ‘गुलमोहोर’ हा चित्रपट उपस्थित प्रेक्षकांना आवडला. सोनाली कुलकर्णी हिने केलेला अभिनय पाहून आम्हाला स्मिता पाटील हिची आठवण होते, असेही अनेक प्रेक्षकांनी सांगितले. परस्परांच्या प्रेमात असलेल्या मात्र बेकारी व शहरी वातावरणातल्या अस्वस्थतेमुळे दूर जाणाऱ्या नायक-नायिकेची उत्कृष्ट कथा साकारताना आरक्षण, बेकारी आणि स्त्री प्रश्न योग्य रीतीने हाताळणाऱ्या दिग्दर्शकाची प्रेक्षकांनी स्तुती केली.
या वेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अध्यक्ष विजय जाधव, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, निर्माते सुनील फडतरे आदी उपस्थित होते.