Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

अतिक्रमणे हटविली तरच योजना यशस्वी
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

स्वारगेटच्या जेधे चौकामधील वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे या चौकातील वाहतूक काहीशी सुरळीत झाली असली, तरी या चौकातील वाहतुकीचा ताण थेट जमनालाल बजाज चौकावर आल्याने आता तेथे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याबाबत योग्य नियोजन करण्याबरोबरच नेहरू स्टेडियमसमोरील रस्ता व मित्रमंडळ चौक ते पूरम चौकापर्यंतच्या रस्त्यावरील विविध अतिक्रमणे व अडथळे काढल्याशिवाय वाहतुकीची ही नवी व्यवस्था यशस्वी ठरणार नसल्याचे दिसत आहे.

कालव्यालगतची जागा हॉटेलसाठी भाडय़ाने;
पालिकेच्या परवानगीविनाच बांधकाम सुरू
सुनील कडूसकर, पुणे, २३ जानेवारी

स्वारगेट येथे कालव्यालगतची जागा चक्क पाटबंधारे खात्यानेच हॉटेलसाठी भाडय़ाने दिल्याने कालवाच प्रदूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेची परवानगी मिळण्यापूर्वीच संबंधिताने तेथे घाईघाईने बांधकाम सुरू केल्याचे दिसून आले. ‘लोकसत्ता’ने याबाबत चौकशी सुरू करताच सरकारी यंत्रणेला जाग आली आणि महापालिके ने तातडीने त्यास नोटीस बजावली, तसेच पाटबंधारे खात्यानेही ‘या हॉटेलमुळे प्रदूषण झाल्यास आम्ही तातडीने कारवाई करू’ अशी भूमिका जाहीर केली.

शमशाद बेगम यांना यंदाचा ओ. पी. नय्यर पुरस्कार
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

‘सैंय्या दिल मे आना रे. आके फिर ना जाना रे’
‘लेके पेहला पेहला प्यार.. भर के आखों मे खुमार..,
‘मेरे पिया गये रंगून किया है .. वहाँ से टेलिफून..
या गीतांना आपल्या सुमधूर आवाजात गाऊन अजरामर करणाऱ्या पाश्र्वगायिका शमशाद बेगम यांना या वर्षांचा ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
ओ. पी. नय्यर फाउंडेशनचे विश्वस्त नंदू बेलवलकर व रोहन पुसाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गुरुपाल शर्मा उपस्थित होते.

‘ऊर्मी’च्या निमित्ताने दिलखुलास गप्पा!
पुणे, २३ जानेवारी/खास प्रतिनिधी
‘ऊर्मी’ या युवक महोत्सवाच्या निमित्ताने कला-क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जल्लोष साजरा करतानाच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, क्रिकेटपटू सुनंदन लेले, पत्रकार समीरण वाळवेकर आणि रंगकर्मी किरण यज्ञोपवित यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी साधली.
‘ऊर्मी’च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जल्लोषाने वातावरण दणाणले. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवरील अनुभवकथनाचे दालन खुले करतानाच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आगळा आविष्कार सादर करण्यात आला. कालच्या स्पर्धामध्ये सायली बर्वे, संपदा रानडे, अनिश इनामदार, गार्गी सरखोत, विक्रमकुमार जगदाळे, आशुतोष तळवटकर, विवेक लोकूर आदींनी पारितोषिके पटकाविली. रमेश पाटणकर, डॉ. वीणा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. संयोजनाची जबाबदारी शशी निघोजकर, डॉ. संज्योत आपटे, वियन र. र., अरुंधती आगटे, प्रसन्न भिडे, वैशाली दाबके, सुभाष खंडागळे, उल्हास किवळकर, छाया आबनावे, सरोजा हिरेमठ, राघव अष्टेकर यांनी सांभाळली.

इंडियन काँक्रीट इन्स्टिटय़ूटतर्फे २० फेब्रुवारीला चर्चासत्र
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

इंडियन काँक्रीट इन्स्टिटय़ूटतर्फे २० व २१ फेब्रुवारी रोजी सिमेंट व काँक्रीट या विषयावर चर्चासत्र आणि अद्ययावत यंत्रसामग्रीचे प्रदर्शन यशदा येथे आयोजित केले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मुंबई येथील प्रसिद्ध वास्तुरचनाकार संजय पुरी यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डी. आर. घारपुरे यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक आर. टी. कुलकर्णी, उपाध्यक्ष व्ही. बी. पारसनीस, सचिव केदार जोशी उपस्थित होते.या चर्चासत्रात पुणे शहराशी संबंधित स्वयंपूर्ण नगरे आणि स्थानिक सोयीसुविधांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, या विषयावर चर्चा होणार आहे, तसेच बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश असलेले प्रदर्शन आयोजित केले असून, त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, अभियंते, वास्तुरचनाकार यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. नवीन घर विकत अथवा बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांना या चर्चासत्रातून चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रदर्शनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन घारपुरे यांनी केले. अधिक माहितीसाठी ०२०-२५६७४४५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन आघाडीवर
पुणे, २३ जानेवारी / विशेष प्रतिनिधी

मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना निश्चित करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखालील संघटनांनी देशभर आघाडी घेतली असून सव्वा लाखावर मते मिळविली आहेत. त्यामुळे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच बीएसएनएलमधील अधिकृत संघटना ठरणार आहे.पुण्यातही बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनला १७२४ मते मिळाली

पाटबंधारे कर्मचारी कल्याण केंद्रातर्फे होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य
पुणे, २३ जानेवारी/ विशेष प्रतिनिधी

पाटबंधारे खात्यातील कर्मचाऱ्यांच्या व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या ४१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र पाटबंधारे कर्मचारी कल्याण केंद्राचे अध्यक्ष व पाटबंधारे विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी त्यांना शिक्षणासाठी अर्थसाहाय्यही देण्यात आले. नुकत्याच झालेल्या तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेमध्ये विशेष नैपुण्य दाखवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भाग्यश्री शिर्के हिचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तर ग्रामीण भागातील पाच अपंग विद्यार्थ्यांनाही यावेळी साहाय्य देण्यात आले. शिक्षण, क्रीडा व विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून पाटबंधारे खात्याला अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी संस्था आणखीही विविध उपक्रम राबवेल, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

पैशाच्या वादातून एकाचे अपहरण; पोलिसांचे तपास पथक रवाना
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

पैशाच्या वादातून उत्तमनगर येथून एकाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, एक पथक निपाणी भागामध्ये रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले. तुकाराम ऊर्फ तात्या सोपान इंगळे (वय ४२, रा. इंगळे कॉलनी, शिवणे, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणी गणेश नारायण किंडरे (वय ३०, रा. उत्तमनगर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इंगळे यांचे चुलतभाऊ आबा ऊर्फ निवृत्ती कोंडिबा इंगळे (वय ५८) यांचे अपहरण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निवृत्ती इंगळे यांच्याकडून गणेश किंडरे याने २५ लाख रुपये घेतले होते. हे पैसे त्याला परत करायचे नसल्याने इंगळे यांना साथीदाराच्या मदतीने पळवून नेले असावे व त्यांचे काही बरेवाईट केले असावे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये फिर्यादीमध्ये तथ्य आढळून आल्याने तातडीने पोलिसांनी इंगळे यांचा शोध सुरू केला आहे. त्या दृष्टीने पोलिसांचे एक तपास पथक निपाणी येथे दाखल झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या पथकाने केलेल्या करवाईबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

‘महावितरण’च्या कामगारांचा राज्यस्तरीय मेळावा
पुणे, २३ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती, पारेषण व वितरण कंपनीतील तांत्रिक कामगार युनियन संघटनेच्या वतीने रविवारी (दि. २५) मंचर येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युनियनचे राज्य सचिव मिलिंद मणेरीकर व एस. आर. कोले यांनी ही माहिती दिली. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार असून, यावेळी ऊर्जामंत्री सुनील तटकरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सोळंके उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सुमारे बारा हजार सभासद उपस्थित राहणार असून, मेळाव्यात कामगारांना निवृत्तिवेतन, स्वतंत्र वेतनश्रेणी, कामगार भरती, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्या त्या विभागात नियुक्ती देणे, ग्राहकाभिमुख सेवेसाठी ग्राहक संख्या, डीटीसी संख्या, लाईनचे अंतर, भौगोलिक रचना, महसूल याचा विचार करून व कामगार संरचना करून नव्याने कामगार भरती करणे आदी मुद्दय़ांवर विचारविमर्श होणार आहे, असे मणेरीकर म्हणाले. या मेळाव्यास आमदार दिलीप मोहिते, वल्लभ बेनके, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद लेंडे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती अनंत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत, असेही मणेरीकर यांनी यावेळी सांगितले.