Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
राज्य

देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि दहशतवादाच्या समूळ नाशासाठी विद्यमान केंद्र व राज्य सरकार बदला आणि हा परिवर्तनाचा बिगूल जळगावातूनच वाजवा, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथील जाहीर सभेत केले.

फेब्रुवारीमध्ये महाबळेश्वर येथे होणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला. या प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष बबनराव टेबे , कार्यवाह संजय दस्तुरे , खजिनदार विलास काळे , सहकार्यवाह अभिजित खुरासने , नगराध्यक्ष युसूफभाई शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

मातीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांनी देशाचे भान राखले पाहिजे - आनंद यादव
कळंब, २३ जानेवारी/वार्ताहर

आजपर्यंत ग्रामीण साहित्य वळचणीला होते. त्याला फारशी किंमत नव्हती. ग्रामीण साहित्यिकांनी याबद्दलची चळवळ सुरू केल्यानंतर त्याला यश येऊ लागले आहे. मातीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांनी या देशाने भान राखले पाहिजे. इंग्रजी साहित्याचे अनुकरण करून कादंबऱ्या लिहिण्यापेक्षा अस्सल ग्रामीण साहित्याला स्थान द्यावे. स्नेहसंमेलनामध्ये आजपर्यंत शहरी साहित्यिकांचाच वावर असायचा. आता यापुढील काळात मात्र ग्रामीण कथा चर्चिली जाणार असून हे सर्व ग्रामीण कथाकारांचे यश असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी व्यक्त केले.महाबळेश्वर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. यादव प्रथमच ते मराठवाडय़ात आले. त्यांच्या सत्काराचा पहिला मानही कळंबला मिळाला. नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

आश्रम शाळेतील उपाशी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयाला घेराव
शहापूर, २३ जानेवारी / वार्ताहर

गेले दोन दिवस अन्नाशिवाय उपाशी असलेल्या दहागाव (वासिंद) येथील एच. आर. मुकणे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज जेवणासाठी थाळी मोर्चा काढून शहापूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला घेराव घातला. साईप्रसाद आदिवासी सेवामंडळ या संस्थेने शहापूर तालुक्यातील दहागाव येथे एच. आर. मुकणे नावाची आदिवासी आश्रमशाळा सन २००२ पासून सुरू केली आहे.

वृक्षसंवर्धनाअभावी कोल्हापुरात रस्ता रुंदीकरण रखडले
कोल्हापूर, २३ जानेवारी / विशेष प्रतिनिधी

रस्ते विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवताना महानगरपालिकेने रस्तारुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनाविषयीचे प्रकरण गांभीर्याने न हाताळल्याने शहरातील २२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वृक्षसंवर्धनासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याखेरीज कोणत्याही वृक्षाला हात लावू दिला जाणार नाही, अशी भूमिका पर्यावरणवादी संघटना व जागरूक नागरिकांनी घेतली असून, दबावतंत्राने वृक्षतोड सुरू केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यामुळे रस्ते विकासाच्या शुभारंभापोटी हे प्रकरण चांगलेच गाजण्याच्या तयारीत आहे.

वाघिणीपासून दुरावलेल्या तीन बछडय़ांना वाचवले
चंद्रपूर, २३ जानेवारी / प्रतिनिधी

रामप्रहरी फिरायला जाणे हा तिचा आवडता छंद.. ठरल्याप्रमाणे आज पहाटे ती आपल्या तिन्ही बछडय़ांना घेऊन तलावाकाठी फिरायला आली. थोडी चुकामूक झाली आणि तेथवर सोबत असलेली माय-लेकरे क्षणभरातच परस्परांपासून दुरावली. मातेच्या शोधात वणवण भटकणारे हे तीन बछडे माणसाच्या नजरेस पडले आणि नागरवस्तीत एकच गोंधळ उडाला. आता वनखात्याच्या ताब्यात असलेले हे बछडय़ांचे त्रिकूट महाराजबागेत स्थिरावले आहे तर अवघ्या दीड महिन्याची ओली बाळंतीण असलेली वाघिण जुनोनाच्या जंगलात बछडय़ांच्या शोधात वणवण भटकत आहे.

संजय गांधी निराधार योजना समितीविरोधात मनसेचे आंदोलन
प्रतिनिधी / नाशिक

संजय गांधी निराधार योजना समितीला बरखास्त करावे, कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करावी आणि खऱ्या लाभधारकांना वेळेवर व दरमहा अनुदान मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.

उमरेडजवळ ट्रकची मोटारसायकलला धडक, तीन ठार
नागपूर, २३ जानेवारी / प्रतिनिधी

वेगात असलेल्या ट्रकची धडक मोटारसायकलला लागल्याने तिघे घटनास्थळीच ठार झाले. अपघात आज सकाळी उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ठाणा गावाजवळ घडली. मृतकांमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीचा समावेश आहे. सिद्धार्थ रामचंद्र रामटेके (२५, रा. उमरेड) सुधीर धर्मदास गजभिये (३५, रा. चिकणा), पूजा कालिदास बनकर (१५, रा. उमरेड) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. भिवापूर येथे राणादेवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी हे तिघेही आज सकाळी १०.३० वाजता मोटारसायकलने उमरेडकडून भिवापूरकडे जात असता ठाणा फाटय़ावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची धडक लागली. यात तिघेही गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले.

शासकीय रुग्णालयाच्या प्रश्नांना वाचा फोडून सेनाप्रमुखांचा वाढदिवस साजरा
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

गोरगरीब रुग्णांसाठी आधार समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने हे रुग्णालयच आजारी असल्याचा प्रतिकात्मक देखावा सादर करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रुग्णालयातील बंद असलेली सिटी स्कॅन मशीन, लिथोस्ट्रेप्सी मशीन तसेच अन्य यंत्रसामग्री त्वरित सुरू करावी. याशिवाय एम.आर.आय., कलर डॉप्लर, डायलेसिस विभाग आदी नवीन सुविधा निर्माण कराव्यात. रुग्णालयातील ढिसाळ सुरक्षा यंत्रणा, सार्वजनिक अस्वच्छता, अपुरे मनुष्यबळ इत्यादी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक देखावा तयार करून डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्या प्रशासनावर विद्यार्थी सेनेने सवाल उपस्थित केला. येत्या महिनाभरात सर्व सोयी रुग्णांना उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या अभिनव आंदोलनात विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हा संघटक लहू गायकवाड, उपजिल्हा संघटक आशुतोष बरडे, शहर संघटक संजय कणके, अमित अंजिखाने, विशाल चव्हाण, उज्ज्वल दीक्षित, आदी सहभागी झाले होते.

भारतमातेच्या शोभायात्रेला प्रतिसाद
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

देशाच्या ऐक्याला व अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाचा बीमोड करण्याची शपथ घेत प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात सद्भावना वंदे मातरम् मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भारतमातेच्या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने देशभक्तीचे आणि तिरंगामय वातावरण निर्माण होऊन नागरिक भारावून गेले होते. मुरारजी पेठेतील सद्भावना बंगल्यापासून निघालेल्या भारतमातेच्या शोभायात्रेचा प्रारंभ सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. के. पवार व जिल्हा कारागृह अधीक्षक एस. ए. सोनार यांच्या हस्ते झाला. या शोभायात्रेत विविध शाळा व महाविद्यालयांतील १४०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. ‘भारतीय गणतंत्रदिन, राष्ट्रीय त्योहार जैसे मनाओ’ असा संदेश आणि दहशतवादाच्या विरोधात घोषणा देत निघालेल्या या शोभायात्रेचे रस्त्यावर असंख्य नागरिकांनी स्वागत केले. रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधी पुतळय़ाजवळ देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली. सद्भावना वंदे मातरम् मंडळाचे प्रमुख समाजसेवक दिव्यकांत गांधी यांच्यासह कुंडलिक शिंदे, रमेश बिराजदार, प्रकाश लोढा, नारायण छाब्रिया, प्रीतेश गांधी, सुनील पेंटर, संगीता महिंद्रकर आदींनी या वैशिष्टय़पूर्ण शोभायात्रेचे यशस्वी नियोजन केले होते.

विशाळगडवर महिला ठार
कोल्हापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड येथे देवदर्शनासाठी आलेली एक महिला आज दुपारी पाय घसरून दरीत कोसळून ठार झाली. शाहूवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, महिलेचा मृतदेह काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. उगार, ता.अथणी, जिल्हा बेळगाव येथील रेखा परसू बैजू (वय ३२) ही महिला आपल्या नातेवाइकांसह विशाळगड येथे देवदर्शनासाठी बुधवारी आली होती. आज दुपारी नरसोबा मंदिरानजीकच्या कडय़ावर ती गेली असता तेथून तिचा पाय घसरून सुमारे ४०० फूट खोल दरीत ती कोसळली.

यंत्रमागधारकांच्या ‘बंद’ ला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

यंत्रमाग कामगारांना माथाडीसदृश कायदा लागू करण्याच्या विरोधात सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाने पुकारलेल्या ‘यंत्रमाग बंद’ आंदोलनास भरघोस प्रतिसाद मिळाला. मात्र या बंदला आक्षेप घेऊन कामगार संघटनांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कामगारांना सदर कायदा लागू झाल्यास यंत्रमाग कारखानदारांवर १५ ते १६ टक्के जादा बोजा पडणार असून तो न परवडणारा आहे म्हणून या कायद्याच्या विरोधात गुरुवारी यंत्रमाग बंद आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघाचे सभापती पेंटप्पा गड्डम यांनी केला.

७७ लाखांचे काळे ऑईल जप्त
वडगाव-मावळ, २३ जानेवारी/वार्ताहर

सात टँकरसह सुमारे ७७ लाख रुपये किमतीचे काळे ऑईल राज्याच्या पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आले. ही कारवाई लोणावळ्याजवळील पुणे-मुंबई महामार्गावरील फांगणे फाटा परिसरात काल रात्री करण्यात आली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तीन टँकरचालकांना वडगाव न्यायालयापुढे आज हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुणे-मुंबई महामार्गावर अवैध काळे तेल विक्रीचा व्यवसाय चालतो, अशी खबर मिळाल्यानंतर हा छापा घालण्यात आला.