Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

जोकोविच, यान्कोविच चौथ्या फेरीत
मेलबर्न, २३ जानेवारी/पीटीआय
गतविजेता सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. पण त्यासाठी त्याला अमेरिकेच्या अमेर देलिचचे कडवे आव्हान परतवावे लागले.
मूळचा बोस्नियाचा असलेल्या देलिचने सामन्यातील दुसरा सेट जिंकत चौथ्या सेटचा निर्णय टाय-ब्रेकपर्यंत नेला. जागतिक क्रमवारीत १२७ व्या स्थानावर असलेल्या देलिचकडून जोकोविचला मिळालेला हा अनपेक्षित धक्काच होता.

 

अखेर जोकोविचने हा सामना जिंकला. पण त्यानंतर तेथे सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या दोघांच्याही समर्थकांमध्ये वांशिकतेचा मुद्दा निर्माण होऊन हाणामारी सुरू झाली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जोकोविच म्हणाला की, मला अमेरबद्दल खूप आदर आहे. आम्ही दोघे एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून चांगले ओळखतो. आज त्याने अतिशय उत्तम खेळ केला. त्यामुळेच दुसरा सेट गमावल्यावर मला पुन्हा सुर गवसायला वेळ लागला.
अन्य एका सामन्यात क्रोएशियाच्या मारीन सिलीच याने स्पेनच्या डेव्हिड फेररचा पराभव केला. पुढच्या फेरीत सिलीचची गाठ अर्जेन्टिनाच्या आठव्या मानांकित युआन मार्टिन देल पोत्रो याच्याशी पडेल. देल पोत्रोने लक्सम्बर्गच्या गिलेस म्युलरचा ६-७ (५-७), ७-५, ६-३, ७-५ असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. येलेना यान्कोविचने जपानच्या आयुमी मोरिता हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला. दिनारा सफिनाने इस्टोनियाच्या कैया कानेफीचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता उपान्त्यपूर्व फेरीत तिची लढत अ‍ॅना इव्हानोव्हा हिच्याबरोबर होणार आहे. विजयानंतर बोलताना सफिना म्हणाली की, अखेर मला माझ्या दर्जाचा खेळ करता आला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये माझ्या मनाप्रमाणे माझा खेळ होत नव्हता.
दुहेरीत सानिया, भूपती, पेस व बोपण्णा यांची आगेकूच
भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या, तर लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी पुरुष दुहेरीच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. बिगरमानांकित भुपती - सानिया या जोडीने झेक प्रजासत्ताकाच्या सहाव्या मानांकित क्वेता पेश्के आणि पावेल विझ्नर यांचा ६-२, ६-४ असा पराभव केला. पुढील फेरीत त्यांची लढत ऑस्ट्रेलियाच्या अनास्तासिया रोदिओनोव्हा आणि स्टिफन हुस यांच्याशी होणार आहे. त्यांनी जेसिका मूर आणि कर्स्टन बॉल यांचा ७-५, ७-५ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत लिएंडर पेस आणि झेक प्रजासत्ताकाचा लुसाक द्लोही यांनी फॅबिओ फोग्निनी आणि इव्हान ल्युबसिच जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला.
गालबोट!
सर्बियाचा नोव्हाक जोकोवीच आणि येलेना यांकोविच यांनी आपापले सामने जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला; पण त्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. जोकोविचच्या विजयानंतर तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये वांशिक अस्मितेचा प्रश्न निर्माण होऊन हाणामारी झाली. दुसरीकडे रशियाच्या दिनारा सफिनाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे.
जोकोविचने मूळचा बोस्नियाचा असलेला अमेरिकेचा खेळाडूअमेर देलिचवर ६-२, ४-६, ६-३, ७-६ (७-४) असा विजय नोंदविला. त्यांनंतर रॉड लॅव्हर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या बोस्नियाच्या तसेच सर्बियाच्या समर्थकांदरम्यान वांशिक अस्मितेचा प्रश्न निर्माण होऊन त्यांनी एकमेकांकडे प्लॅस्टिकच्या खुच्र्या व इतर वस्तू फेकण्यास सुरूवात केली. त्यात एक महिला किरकोळ जखमी झाली.
दंगा करणाऱ्यांपैकी ३० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यापैकी दोघांना समन्स बजावण्यात आले आहे. एकाला तो दंगा करत होता तेथेच दंड करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. देलिचने या घटनांमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे म्हटले आहे. याआधी २००७ मधील ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सर्बियाच्या तसेच क्रोएशियाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. गेल्या वर्षी चिलीचा फर्नान्दो गोंझालेस आणि ग्रीसचा कोंस्टान्टिनोस एकोनोमिदीस यांच्या सामन्याच्या वेळी दंगा करणाऱ्यांवर पोलिसांनी मिरपुडीच्या स्प्रेचा मारा केला होता. अन्य एका कोर्टवर आणखी एकाने कोर्टवर प्रवेश केल्याची घटना घडली.