Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

अर्जेटिनाची भारतावर मात; मालिकेत बरोबरी
मार डेल प्लाटा, २३ जानेवारी / पीटीआय

अर्जेटिनाने आज भारताचा ४-२ गोलने पराभव करत चार कसोटी सामन्यांची हॉकी मालिका २-२ अशी

 

बरोबरीत सोडवली.
या लढतीत मध्यंतरापर्यंत २-१ अशी आघाडी मिळवणाऱ्या भारताला त्यानंतर लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंच्या अपयशामुळे मध्यंतरानंतर प्रतिस्पर्धी अर्जेटिना संघाने तीन गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले. भरत चिकाराने सातव्या मिनिटाला गोल नोंदवत भारताचे खाते उघडले. त्यानंतर कर्णधार संदीप सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २-०ची आघाडी मिळवून दिली. अर्जेटिनातर्फे मध्यंतरापूर्वी मॅटिस व्हिलाने (३१ वा मिनिट) गोल करत पिछाडी भरून काढली. जुआन गिलार्डी, फॅकुन्डो कॅलिओनी आणि मॅटिस पराडेस यांनी अनुक्रमे ३७, ३९ आणि ५८व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करत अर्जेटिनाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पहिल्या दोन लढतीत भारताने अनुक्रमे २-० आणि ३-२ गोलने विजय मिळवत मालिकेत
२-०ची आघाडी मिळवली होती. त्यानंतर अर्जेटिनाने तिसरी व चौथी लढतजिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. भारतीय संघ आता चंदीगड येथे होणाऱ्या चार देशांच्या पंजाब सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह जर्मनी, हॉलंड आणि न्यूझीलंड संघ सहभागी होत आहे.