Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

‘गोल्डन रेड’मध्ये विजय नवनाथने बाजी मारली
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

 

शेवटच्या सुवर्ण चढाईमध्ये एच. जी. एस. क्रीडा मंडळाच्या सचिन कसारेची सफाईदार पकड करून विशाल कदमने विजय नवनाथ क्रीडा मंडळाला ७४ व्या आर्य सेवा मंडळाच्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले. शिवसेना दक्षिण मुंबई पुरस्कृत या स्पर्धेतील स्व. मीनाताई ठाकरे स्मृती ‘ममता चषक’ आणि अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस विजय नवनाथला मिळाले. उपविजेत्या संघाने ममता चषकासह नऊ हजारांचे रोख पारितोषिक मिळविले.
ताडदेव, आर्यनगर येथील या स्पर्धेला प्रारंभापासूनच कबड्डीशौकिनांचा उत्तम प्रतिसाद लाभलाच; पण ही अंतिम लढत पाहण्यासाठी तुफान गर्दी लोटली होती. त्यांच्या डोळ्याचे पारणे या चमकदार सामन्याने फेडले. पहिली दहा मिनिटे संथ गतीने खेळला गेलेला हा सामना दोन्ही संघांच्या खेळाडूंना अचूक सूर गवसल्यावर उत्तरोत्तर रंगतच गेला.
अखंड डावात ५-५ अशा समान गुणांवर संपलेली ही लढत मग दोन्ही संघांना ५-५ चढाया देऊन निदान रेषेवर खेळविण्यात आली; पण त्या वेळीही ६-६ अशी बरोबरी झाल्याने ११-११ गुणांची ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी शेवटी गोल्डन रेडचा अवलंब करण्यात आला. त्यात विजय नवनाथचा १२-११ असा अंतिम विजय झाला. त्यांचे नीलेश कदम (चढाई) व विशाल कदम (अष्टपैलू) आणि एच. जी. एस.चा अजय कुसुम (पकड) हे या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. त्यांना रोख बक्षिसे मिळाली. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.