Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

प्रजासत्ताकदिनी रायगडकरांना मेजवानी पोलादी शरीरसौष्ठवाची!
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

 

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्र श्री २००९ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, महाड-पोलादपूरवासीयांना त्यामुळे पोलादी शरीरसौष्ठवाची जणू मेजवानीच मिळणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती भरतशेठ गोगावले यांच्या भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. सदर स्पर्धा महाड नगर परिषद प्राथमिक शाळा नं. २, विरेश्वर मंदिर, आझाद मैदान, महाड, जिल्हा रायगड येथे २६ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता होणार असून, सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
जवळपास दोन लाख बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील विजेत्याला आकर्षक ट्रॉफी व ५१ हजार रुपयांचे घसघशीत इनाम मिळणार आहे. प्रत्येकी गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांनाही अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ४ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात येतील. यंदाच्या ‘महाराष्ट्र श्री’ या किताबासाठी रायगड जिल्ह्य़ातील सर्वोत्तम शरीरसौष्ठव सुनील भोईर, पुण्याचे मिलिंद खर्चने व कुंदन तांबट, तसेच यंदा मुंबईतील सर्व स्पर्धा गाजविणारा दिनेश कांबळे आणि नुकताच मुंबई श्री किताबाचा मानकरी ठरलेला अमित रॉय यांच्यातील चुरशीची लढत पाहण्याचे भाग्य महाडवासीयांना लाभणार आहे. या स्पर्धेत १८ ते २० जिल्ह्य़ांतील जवळपास १२० सर्वोत्तम शरीरसौष्ठव सहभागी होणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष, व्यायाममहर्षी मधुकरराव तळवळकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त हृद्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस विकी गोरक्ष यांनी दिली.
या स्पर्धेकरिता मुंबईचा संघ -
५५ किलो वजनी गट- १) संतोष भरणकर (परब जिम) २) जगदीश कदम (मारुती जिम) ३) रोशन नाईक (शिवसेना जिम). ६० किलो वजनी गट- दिनेश कांबळी (पाठारे जिमको), अली सलेमनी (विकी जिम), अरुण पाटील (जयभवानी जिम). ६५ किलो वजनी गट- जयेंद्र मयेकर (स्लिमवेल), विजय जाधव (पाठारे जिमको), उदय सावंत (शिवगणेश जिम). ७० किलो वजनी गट- अमित रॉय (हळदणकर), मनोहर पाटील (पाठारे जिमको), संतोष सेठी (अ‍ॅडोनिस जिम). ७५ किलो वजनी गट- विलास वरक (वैयक्तिक), सुमित जाधव (स्लिमवेल), मिलिंद सालियन (हळदणकर). ७५ किलोंवरील वजनी गट- सचिन बरबोज (शिवसेना जिम), केतन करंडे (नवयुग स्पोर्ट्स क्लब), ज्यूड रॉबर्ट डिसोजा (सुयश जिम). व्यवस्थापक- बाळकृष्ण पालेकर, प्रशिक्षक- अशोक घाग.