Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ऑलिम्पिक पदकविजेता घडविण्याचेच ध्येय -गोपीचंद
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

 

बीजिंग ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचे पदक थोडक्यात हुकले. लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही दूरगामी योजना अमलात आणणार आहोत, असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पेट्रोलियम क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्पर्धेनिमित्त गोपीचंद हे पुण्यात आले होते. बीजिंग येथे सायना नेहवालचे पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तिचा प्रथमच सहभाग होता. अजूनही ती कुमार गटाचीच स्पर्धक आहे. अधिकाधिक स्पर्धाचा अनुभव मिळाल्यावर तिच्या खेळात परिपक्वता येईल. सायनाने गतवर्षी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा व कुमारांची जागतिक स्पर्धा या दोन्ही स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले आहे. बीजिंगवरून परतल्यानंतर तिने हे यश संपादन केले होते. तिच्याकडे ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता आहे, असे गोपीचंद म्हणाले.
लंडन येथे २०१२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी कशी तयारी केली जाणार आहे, असे विचारले असता गोपीचंद म्हणाले, सायनाप्रमाणेच बी. चेतन आनंद, अनुप श्रीधर, आदित्य प्रकाश, साई गुरुदत्त, ज्वाला गट्टा यांच्याकडेही चांगले नैपुण्य आहे. सध्या २०१० मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी आम्ही तयारी करीत आहोत. आगामी तीन वर्षांमध्ये या खेळाडूंना दीर्घकाळ सरावावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र या खेळाडूंची दमछाक होणार नाही व ‘होमसिक’ होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाणार आहे.
बॅडमिंटनच्या विकासाकरिता शासनाचे पुरेसे सहकार्य मिळत आहे काय, असे विचारले असता गोपीचंद म्हणाले, या खेळाचा प्रसार अधिकाधिक स्तरावर होण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. बॅडमिंटनसाठी चांगल्या क्रीडासुविधा व संकुल असेल तर अनेक चांगले खेळाडू तयार होतात हा अनुभव लक्षात घेऊन ज्या ठिकाणी बॅडमिंटनसाठी चांगले नैपुण्य आहे, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक आहे, अशा सुविधांमुळे ऑलिम्पिक पदक विजेते घडू शकतील.