Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

उज्ज्वल इतिहास राखल्याबद्दल मुंबईच्या विविध संघांचे पुरस्कारांसह कौतुक
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

मुंबईच्या क्रिकेटला उज्ज्वल इतिहास आहे. मुंबईचे भारतीय क्रिकेटवर वर्चस्व आहे. मुंबईच्या रणजी,

 

१९ वर्षांखालील मुलांनी आणि मुंबई विद्यापीठाच्या मुलांनी व मुलींनी एकाच वर्षी विजेतीपदे पटकावून हा इतिहास कायम राखला आहे, असे प्रतिपादन आयसीसीचे उपाध्यक्ष व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले ते मुंबईच्या विजेत्या रणजी व अन्य संघांच्या खेळाडूंच्या सत्कार समारंभात बोलत होते.
मुंबईच्या क्रिकेटपटूंनी मुंबईच्या क्रिकेट प्रशिक्षण सुविधांचा चांगला लाभ घेतला आहे. महिला क्रिकेट संघानेही या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले. मुंबई विद्यापीठाच्या मुलांचे व मुलींचे आंतरविद्यापीठ स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
मुंबईच्या क्रिकेट प्रशिक्षण योजनेचे प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढे जायचे असल्यास आणखी कठोर व्हा, असे सांगितले. रणजी विजेत्या संघाचे कौतुक करताना वेंगसरकर यांनी सचिन तेंडुलकरची उपस्थिती संघाला प्रोत्साहन देणारी ठरल्याचे सांगितले. कर्णधार वासिम जाफर आणि प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी घेतलेली मेहनत अखेर फळाला आली, असे त्यांनी सांगितले.
धवल कुलकर्णी आणि अजिंक्य रहाणे यांची कामगिरी उत्तमच झाली. त्या सर्वोत्तम कामगिरीची राष्ट्रीय निवड समितीने नोंद घ्यावी, असे त्यांनी या वेळी सांगितले. झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेचे प्रमुख पीटर चिंगोका यांनी या प्रसंगी बोलताना म्हटले, ‘‘एकाच राज्याचे एवढे संघ जिंकू सकतात हा आमच्या संघासाठी धडा ठरू शकेल. मुंबईकडून आम्ही क्रिकेटमध्ये बरेच शिकण्यासारखे आहे.’’ मुंबईच्या वासिम जाफरला यंदाच्या रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजीचे क्रिकेट बोर्डाचे एक लाख रुपये व माधवराव शिंदे करंडक, असे पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम गोलंदाजीचा पुरस्कार माधवराव शिंदे ट्रॉफी व एक लाख रुपये मुंबईच्याच धवल कुलकर्णीला मिळाले.
आंतरविद्यापीठ स्पर्धेतही मुंबई विद्यापीठाच्या ब्रविश शेट्टी याला सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले होते.
मुंबईच्या रणजी संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांचा प्रत्येकी ३-३ लाख आणि ट्रॉफी देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.
मुंबईच्या अन्य विजेत्या संघांचे कूचबिहार करंडक विजेत्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या संघाचे प्रत्येकी ५० हजार रुपये व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या मुलांच्या व मुलींच्या संघातील प्रत्येक खेळाडूलाही ५० हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.