Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएल पर्व दुसरे
खेळाडूंचा लिलाव ६ फेब्रुवारीला गोव्यात
मुंबई, २३ जानेवारी/पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव ६ फेब्रुवारीला गोव्यात होणार आहे, असे

 

आयपीएलचे अध्यक्ष आणि आयुक्त ललित मोदी यांनी आज जाहीर केले.
प्रत्येक फ्रेन्चायझी आपला संघ गतहंगामापेक्षा बलाढय़ करण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील खेळाडूंच्या लिलावात काही अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली.
गोव्यातील लिलावाच्या पाश्र्वभूमीवर मला आता विश्वास वाटतो की, डीएलएफ आयपीएल क्रिकेट स्पध्रेत जगातील बहुतांशी अव्वल क्रिकेटपटू खेळताना दिसतील. परंतु फ्रेन्चायझींची आर्थिक गुंतवणूक आणि अव्वल युवा क्रिकेटपटूंचा भरणा याकडे माझा कल असेल, असे मोदी म्हणाले.
संघातील परदेशी क्रिकेटपटूंच्या जागा भरण्याची संधी गोव्यातील लिलावात फ्रेन्चायझींना मिळणार आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात वॉर्नर, मॅकडोनल्ड, नेहरा
ऑस्ट्रेलियाचा सध्या फॉर्मात असलेला तडाखेबंद फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि उदयोन्मुख तारा अ‍ॅण्ड्रय़ू मॅकडोनल्ड दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी करारबद्ध झाले आहेत. गतहंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा दिल्लीचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरासुद्धा डेअरडेव्हिल्स संघात सामील झाल्याचे समजते.
वॉर्नरला करारबद्ध केल्यामुळे आमचा संघ आता बलवान झाला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात आमचा संघ आता अधिक ताकदवान झाला आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत माथुर यांनी व्यक्त केली. तथापि, डेक्कन चार्जर्स संघाने ऑस्ट्रेलियाच्या रियान हॅरिसला करारबद्ध केले आहे. आगामी हंगामासाठी प्रत्येक संघात परदेशी खेळाडूंची संख्या दहा करण्यात आली आहे.
मागील एक महिना सुरू असलेली खेळाडूंची सौदेबाजी काल संपली. या काळात एकंदर सात क्रिकेटपटूंचे सौदे झाले. गतवर्षी या स्पर्धेत बंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्सतर्फे खेळणाऱ्या झहीर खानला यंदा मुंबई इंडियन्सने रॉबिन उथप्पाऐवजी करारबद्ध केले आहे.