Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा

जोकोविच, यान्कोविच चौथ्या फेरीत
मेलबर्न, २३ जानेवारी/पीटीआय
गतविजेता सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. पण त्यासाठी त्याला अमेरिकेच्या अमेर देलिचचे कडवे आव्हान परतवावे लागले.
मूळचा बोस्नियाचा असलेल्या देलिचने सामन्यातील दुसरा सेट जिंकत चौथ्या सेटचा निर्णय टाय-ब्रेकपर्यंत नेला. जागतिक क्रमवारीत १२७ व्या स्थानावर असलेल्या देलिचकडून जोकोविचला मिळालेला हा अनपेक्षित धक्काच होता.

दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर मात
डेव्हिड वॉर्नरची झंझावाती खेळी व्यर्थ

सिडनी, २३ जानेवारी / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या एकदिवसीय लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन गडी राखून विजय साजरा केला आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची झंझावाती खेळी व्यर्थ ठरली. उभय संघादरम्यान मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना सोमवारी अ‍ॅ डलेड येथे होणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्धची मालिका बांगलादेशने जिंकली
ढाका, २३ जानेवारी / एपी

बांगलादेशने आज झालेल्या तिसऱ्या व अंतिम एकदिवसीय लढतीत झिम्बाब्वेचा सहा विकेटस्नी लीलया पराभव केला आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. सकाळच्या सत्रातील दाट धुक्यांमुळे प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आलेल्या आजच्या सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित करून ९ बाद ११९ धावांवर रोखले आणि विजयास आवश्यक १२० धावा २७ चेंडू व ६ फलंदाज शिल्लक राखून पूर्ण केल्या.अष्टपैलू शाकिब अल हसन (नाबाद ३३) आणि मुशफिकर रहीम (नाबाद २०) यांनी पाचव्या गडय़ासाठी नाबाद भागीदारी करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन बळी मिळवणारा मशर्रफ मोर्ताझा सामनावीराचा तर चमकदार अष्टपैलू कामगिरी करणारा शाकिब अल हसन मालिकावीराचा मानकरी ठरला. मोर्ताझाने (३-२९) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विसू सिबान्दाला पायचित केल्यानंतर झिम्बाब्वेची ५ बाद ६९ अशी दयनीय अवस्था झाली होती. हॅमिल्टन मसाकाद्झा व स्टुअर्ट मॅत्सिकेनयेरी हे सुद्धा मोर्ताझाचेच बळी ठरले. सीन विल्यम्सने झिम्बाब्वेतर्फे सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या बांगलादेशने मेहराब हुसेन व कर्णधार मोहम्मद अश्रफूलला सहज गमावले पण, तमीम इक्बालने ३८ धावांची खेळी करत बांगलादेशला विजयाचा मार्ग प्रशस्त करून दिला. मात्र, एकवेळ ४ बाद ८९ अशी अवस्था झालेल्या बांगलादेशला अखेर हसन व रहीमने मालिका विजय साजरा करून दिला.

उज्ज्वल इतिहास राखल्याबद्दल मुंबईच्या विविध संघांचे पुरस्कारांसह कौतुक
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

मुंबईच्या क्रिकेटला उज्ज्वल इतिहास आहे. मुंबईचे भारतीय क्रिकेटवर वर्चस्व आहे. मुंबईच्या रणजी, १९ वर्षांखालील मुलांनी आणि मुंबई विद्यापीठाच्या मुलांनी व मुलींनी एकाच वर्षी विजेतीपदे पटकावून हा इतिहास कायम राखला आहे, असे प्रतिपादन आयसीसीचे उपाध्यक्ष व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले ते मुंबईच्या विजेत्या रणजी व अन्य संघांच्या खेळाडूंच्या सत्कार समारंभात बोलत होते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी मुंबईच्या क्रिकेट प्रशिक्षण सुविधांचा चांगला लाभ घेतला आहे.

‘गोल्डन रेड’मध्ये विजय नवनाथने बाजी मारली
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

शेवटच्या सुवर्ण चढाईमध्ये एच. जी. एस. क्रीडा मंडळाच्या सचिन कसारेची सफाईदार पकड करून विशाल कदमने विजय नवनाथ क्रीडा मंडळाला ७४ व्या आर्य सेवा मंडळाच्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले. शिवसेना दक्षिण मुंबई पुरस्कृत या स्पर्धेतील स्व. मीनाताई ठाकरे स्मृती ‘ममता चषक’ आणि अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस विजय नवनाथला मिळाले. उपविजेत्या संघाने ममता चषकासह नऊ हजारांचे रोख पारितोषिक मिळविले.

प्रजासत्ताकदिनी रायगडकरांना मेजवानी पोलादी शरीरसौष्ठवाची!
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्र श्री २००९ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, महाड-पोलादपूरवासीयांना त्यामुळे पोलादी शरीरसौष्ठवाची जणू मेजवानीच मिळणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती भरतशेठ गोगावले यांच्या भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. सदर स्पर्धा महाड नगर परिषद प्राथमिक शाळा नं. २, विरेश्वर मंदिर, आझाद मैदान, महाड, जिल्हा रायगड येथे २६ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता होणार असून, सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

सतीश पाताडे ठरला ‘स्ट्राँग मॅन’
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

ग्रेटर बॉम्बे पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि मुंबई गिरणी कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या मुंबई जिल्हा बेंच प्रेस अजिंक्यपद स्पर्धेत सचिवालय जिमखान्याच्या सतीश पाताडेने ‘स्ट्राँग मॅन’ किताबाचा बहुमान मिळविला. परळच्या सोशल सव्‍‌र्हिस लीगच्या सांघिक विजेतेपद मिळाले.

अर्जेटिनाची भारतावर मात; मालिकेत बरोबरी
मार डेल प्लाटा, २३ जानेवारी / पीटीआय

अर्जेटिनाने आज भारताचा ४-२ गोलने पराभव करत चार कसोटी सामन्यांची हॉकी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या लढतीत मध्यंतरापर्यंत २-१ अशी आघाडी मिळवणाऱ्या भारताला त्यानंतर लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंच्या अपयशामुळे मध्यंतरानंतर प्रतिस्पर्धी अर्जेटिना संघाने तीन गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

ऑलिम्पिक पदकविजेता घडविण्याचेच ध्येय -गोपीचंद
पुणे, २३ जानेवारी/प्रतिनिधी

बीजिंग ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचे पदक थोडक्यात हुकले. लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही दूरगामी योजना अमलात आणणार आहोत, असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पेट्रोलियम क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्पर्धेनिमित्त गोपीचंद हे पुण्यात आले होते. बीजिंग येथे सायना नेहवालचे पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तिचा प्रथमच सहभाग होता. अजूनही ती कुमार गटाचीच स्पर्धक आहे. अधिकाधिक स्पर्धाचा अनुभव मिळाल्यावर तिच्या खेळात परिपक्वता येईल.

आयपीएल पर्व दुसरे
खेळाडूंचा लिलाव ६ फेब्रुवारीला गोव्यात

मुंबई, २३ जानेवारी/पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव ६ फेब्रुवारीला गोव्यात होणार आहे, असे आयपीएलचे अध्यक्ष आणि आयुक्त ललित मोदी यांनी आज जाहीर केले. प्रत्येक फ्रेन्चायझी आपला संघ गतहंगामापेक्षा बलाढय़ करण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील खेळाडूंच्या लिलावात काही अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली.

कैफ-ओझाच्या शतकी भागीदारीने मध्य विभागाला तारले
बंगळुरू, २३ जानेवारी / पीटीआय
कर्णधार महम्मद कैफ (७३) आणि यष्टीरक्षक- फलंदाज नमन ओझा (८५) यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या १२७ धावांच्या भागीदारीने मध्य विभागाचा डाव सावरला. दुलिप करंडकच्या या लढतीत दक्षिण विभागाच्या ३२९ धावांना उत्तर देताना मध्य विभाग संघ सकाळच्या सत्रात ४ बाद ७८ असा अडचणीत सापडला होता. मात्र कैफ-ओझाच्या भागीदारीने त्यांचा कोसळता डोलारा सावरला व दुसऱ्या दिवसाअखेर त्यांनी ९ बाद ३२६ धावांची मजल मारली आहे. पहिल्या डावातील आघाडीसाठी मध्य विभागाला अजून चार धावांची गरज असून, मुरली कार्तिक (खेळत आहे २३) व उमेश यादव या शेवटच्या जोडीवर त्यांची सारी मदार असेल. कालच्या बिनबाद ३० धावांवरून पुढे खेळणाऱ्या मध्य विभागाला कामचलाऊ गोलंदाज उथप्पाने तन्मय श्रीवास्तवला बाद करून पहिला धक्का दिला. श्रीशांतने शिवकांत शुक्लाचा (२६) अडसर दूर केला आणि नंतर येरे गौड (४) व परविंदर सिंग (५) झटपट तंबूत परतल्याने उपाहाराला त्यांची ४ बाद ७८ अशी अवस्था झाली होती. हा कोसळता डोलारा सावरताना कैफने ११८ चेंडूंत ११ चौकार व एक षटकाराच्या सहाय्याने ७३ धावा केल्या तर ओझाने १६८ चेंडूंचा सामना करताना सात चौकार आणि दोन षटकारांसह ८५ धावा केल्या. शेवटच्या सत्रात चावलाने ३५ धावा केल्या.