Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९

भिवंडीतील गरिबांच्या घरांचे स्वप्न एका वर्षांत पूर्ण होणार!
सोपान बोंगाणे

महाराष्ट्राचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरातील गलिच्छ वस्त्यांतून राहणाऱ्या गोरगरिबांचे फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. १० अल्पसंख्याकबहुल झोपडपट्टय़ांतून राहणाऱ्या सात हजार ९०० कुटुंबांसाठी केंद्र व राज्य सरकारने ११९ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर केली आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील अजमेरनगर व वडारीनगर येथील ६८० कुटुंबांसाठी अद्ययावत सोयी-सुविधा असलेल्या ३१ इमारतींचे बांधकाम मार्च २००९ मध्ये सुरू करण्याची तयारी भिवंडी-निजामपूर महापालिकेने पूर्ण केली आहे.

फेरीवाल्यांच्या उपद्रवाचा डावखरेंना आला पुळका
डोंबिवली/प्रतिनिधी :
डोंबिवली परिसराला पडलेला फेरीवाल्यांचा विळखा आणि नागरिकांना होणारा त्रास विचारात घेऊन आज सकाळीच उपसभापती वसंत डावखरे नागरिकांना होणारा हा त्रास सोडविण्यासाठी डोंबिवलीत आले होते. त्यांच्यासोबत आयुक्त गोविंद राठोड, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, पालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘लहान मुलांचे मानसशास्त्र समजून घेण्याची गरज’
ठाणे/प्रतिनिधी :
‘बिघडलेल्या सामाजिक वातावरणात आपल्या मुलांना घडवायचे असेल तर त्यांचे मानसशास्त्र पालकांनी समजून घेतले पाहिजे, तरच आदर्श पिढी निर्माण होईल, असे मत अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कलिका महाजन यांच्या ‘मजेमजेची गाणी’ या बालकाव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ वार्ताहर शशिकांत कोठेकर, कवयित्री कलिका महाजन, प्रकाशक संतोष राणे, उन्मेश महाजन उपस्थित होते. ‘पुस्तक वाचणारे पालक घराघरांत निर्माण झाले तरच लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल, असे सांगून संपदा जोगळेकर-कुलकर्णी पुढे म्हणाल्या, मुले पुस्तक वाचत नसल्याची तक्रार अनेक पालक करतात, पण स्वत: किती वाचतात त्याचा विचार करीत नाहीत. पालकांच्याच हातात पुस्तके दिसत नाहीत, तर मुलांच्या हातात कशी दिसणार? विविध चॅनेल्सच्या गदारोळात वाचणाऱ्या पालकांची नितांत गरज आहे.’ बालकविता हा अवघड वाङमय प्रकार असल्याचे सांगून कोठेकर म्हणाले, ‘अजूनही अनेक घरांत पुस्तके विकत आणून मुलांना वाचून दाखविण्याची आवड टिकून आहे. त्यामुळे मराठी भाषेची काळजी करण्याची गरज नाही.’ कवयित्री कलिका महाजन, प्रा. संतोष राणे यांचीही यावेळी भाषणे झाली. पुस्तकातील चित्रे काढल्याबद्दल प्रिया महाजन हिचा सत्कार करण्यात आला. काव्यसंग्रहातील कविता अंतरा खटावकर हिने सादर केल्या. श्रीरंग खटावकर यांनी सूत्रसंचालन केले.

ठाणे/प्रतिनिधी : राष्ट्रपती पदक विजेती- ठाणे भूषण मनाली कुलकर्णी हिच्या ‘जिद्दी’ च्या कहाणीवर आधारित ‘तिची कहाणीच वेगळी’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वसंत संखे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला ‘जिंकी रे जिंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषी देशपांडे, श्रमिक महासंघाचे संस्थापक वायस वर्गीस हे मान्यवर उपस्थित होते. रसिक वाचकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच अल्पावधीतच पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीपर्यंत पोहोचू शकले, असे लेखिका स्मिता कुलकर्णी यांनी नमूद केले.

वर्तकनगरमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी सुरू
ठाणे/प्रतिनिधी

वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची अतिरिक्त आयुक्त एल. आर. गुप्ता यांनी आजपासून चौकशी सुरू केल्याने अजय वैद्य यांच्यासह तत्कालीन उपायुक्तांचे धाबे दणाणले आहेत. वर्तकनगर प्रभागात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्यांना लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अर्थह्णपूर्ण आशीर्वाद लाभलेला आहे. प्रभारी उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या अजय वैद्य यांच्या १९ दिवसांच्या कार्यकाळात उभ्या राहिलेल्या नऊ अनधिकृत बांधकामांबाबत सदस्यांनी सर्वसाधारण सभेत चर्चा करून त्यांना कोंडीत पकडले होते. तीन बांधकामांवर कारवाई, तर सहा इमारतींना अर्थपूर्ण चर्चेतून अभय मिळालेले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांविरोधात ‘ठाणे वृत्तान्त’मधून वाचा फोडण्यात आली, तसेच विक्रम चव्हाण यांनी लोकशाही दिनी तक्रार केली होती. याची दखल घेऊन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त गुप्ता यांना दिले. त्यानुसार गुप्ता यांनी आज चौकशीस सुरुवात केली. त्या अनधिकृत बांधकामांची छायाचित्रे काढून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

हरिभाऊ मोटे विज्ञान पारितोषिक २००९
प्रतिनिधी :
मराठीतील प्रकाशक हरिभाऊ मोटे यांच्या नावे मराठी विज्ञान परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट बालविज्ञान शिक्षण साधना पारितोषिकासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ४ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. व्यक्ती, शिक्षण संस्था, संशोधन संस्था यासाठी अर्ज करु शकतात. अर्जाबरोबर शैक्षणिक साधनाची प्रतीकृती, साधन तयार करण्यासाठी येणारा अंदाजित खर्च, उपयुक्तता यांची माहिती असणे आवश्यक आहे. संपर्क-२४० ५४७ १४.

कॅनरा बँकेत गृहकर्ज उत्सव
ठाणे/प्रतिनिधी :
कॅनरा बँक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ठाणे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर शाखा यांच्या सहकार्याने अंबरनाथ येथे गृहकर्ज उत्सव आयोजित केला होता. बँकेचे महाप्रबंधक एम. रामकुमार यांनी दीपप्रज्वलन केले. याप्रसंगी अध्यक्ष अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे, बँकेचे उपमहाप्रबंधक रामन रमेश, अंबरनाथ-बदलापूरमधील प्रतिष्ठित नागरिक, बँकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे सहाय्यक महाप्रबंधक प्रकाश शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी रामकुमार म्हणाले की, अंबरनाथ-बदलापूरमध्ये नवीन गृह प्रकल्प येत आहेत. घटलेल्या व्याजदरांचा नागरिकांनी फायदा घ्यावा. उपमहाप्रबंधक रामन रमेश म्हणाले की, आपल्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. प्रमुख अतिथी उमेश तायडे म्हणाले की, कॅनरा बँकेने सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून एस.एम.ई. इंडस्ट्रीजना मदत केलीच आहे. आता ते गृहकर्जासाठी सरसावले आहेत. तेव्हा अंबरनाथ-बदलापूरमधील नागरिकांना याचा निश्चितच फायदा घ्यावा. अंबरनाथ पूर्व शाखेचे मुख्य प्रबंधक एच. एम. गौतम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

प्रगती महाविद्यालयाच्या करिअर फेअरला प्रारंभ
डोंबिवली/प्रतिनिधी :
प्रगती महाविद्यालयातर्फे आयोजित करिअर फेअरला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली. दोन दिवसांच्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या नोकरी-व्यवसायाच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणारे ५५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. प्रगती महाविद्यालयाच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक मधुकर चक्रदेव यांच्या हस्ते आज सकाळी फेअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक महाजन, समन्वयक प्रा. कीर्ती गोहेल आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी, पालकांनी या फेअरचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सेनेच्या बँक प्रशिक्षण वर्गास उदंड प्रतिसाद
ठाणे/प्रतिनिधी :
शिवसेना ठाणे जि. शाखा व स्थानीय लोकाधिकार समिती यांच्या विद्यमाने राष्ट्रीयकृत बँकांच्या लिपिक पदाच्या पूर्व भरती लेखी परीक्षासाठी प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला मराठी तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कॅनरा बँक, देना बँक, स्टेट बँक असोसिएटस् व इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या स्पर्धा परीक्षासाठी प्रशिक्षण वर्गाचा समारोप स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या उपक्रमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे काम सेनेच्या माध्यमातून व्हावे, मराठी गुणवत्तेला वाव मिळावा, मराठी विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग याबद्दल पाटील यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेने सुरू केलेल्या उपक्रमातून बँकेत कामाला लागलेल्या रेणुका पवार, तुषार सावंत, शिल्पा चव्हाण, सायली निकम, अजय पवार आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आयोजक बाळा गवस, अक्षर पारसनीस यांचेही यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.