Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
विशेष लेख

पुस्तकामधून मिळालेली कल्पना आपल्या खास शैलीत ती प्रत्यक्षात आणणे, ही ओबामांची सवय. मानवी मनाविषयी बोलणारी, स्वत:चा शोध घेण्यास भाग पाडणारी पुस्तके त्यांना भावतात आणि इतिहासामधूनही त्यांना उमेद मिळते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये मिशिको काकुतानी यांनी लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश.
तो कॉलेजमध्ये होता, तेव्हाची ही गोष्ट. वर्णद्वेषाच्या विरोधात हा तरुण लढू लागला होता. बोलू लागला होता. त्याने एके ठिकाणी एक भाषण दिले. त्यानंतर या तरुणाने लिहिले- ‘माझी मते लोक आता ऐकू लागले आहेत. बदल घडवून आणण्याची क्षमता माझ्या शब्दांमध्ये आहे, हे आता पटू लागले आहे. खरोखरच लोकांच्या मनात बदल आहे. सारे काही बदलू शकते!.’
या तरुणाच्या- बराक ओबामांच्या वक्तृत्वाविषयी नव्याने काही सांगण्याची गरज आता उरलेली नाही. भाषणांमध्ये ते अशा पद्धतीने शब्द वापरतात की लोकांना प्रेरणा मिळते, आश्वासन मिळते. भाषा जादुगाराप्रमाणे वापरण्याची ओबामांची पद्धत आणि असामान्य वाचनप्रेम यामुळे तर त्यांनी अमेरिकेलाजिंकले आहेच; पण मुख्य म्हणजे त्यामुळेच ते स्वत:ही घडले आहेत.
‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ हे ओबामांचे पहिले पुस्तक. एखाद्या कवितेप्रमाणे आहे ते. असे आत्मचरित्र अभावानेच सापडेल. ‘पुस्तक’ हा ओबामांच्या चैतन्याचा झरा आहे. जेम्स बाल्डविन, राल्फ इलिसन, लँग्स्टन हग्ज, रिचर्ड राइट अशा अनेकांचा उल्लेख ते करतातच. त्यांनी या लेखकांची पुस्तके वाचली ती पौगंडावस्थेत. ‘मी कोण’ हा प्रश्न पडला, तेव्हा त्या पुस्तकांनीच त्यांना कितीतरी उत्तरे दिली. नित्शेसारख्या विचारवंतांनी त्यांची जडणघडण केली. या पुस्तकांनीच ओबामांना वाट दाखवली. मानवी संस्कृती त्यांच्यासमोर उलगडली. इंडोनेशियात शालेय वयातील ओबामांना अमेरिकेतल्या मानवी हक्क चळवळीची माहिती पुस्तकांमधूनच झाली. मानववंशशास्त्राची अभ्यासक असलेल्या त्यांच्या आईने ती त्यांना वाचायला दिली होती. नंतर शिकागोत ‘कम्युनिटी ऑर्गनायझर’ म्हणून काम करताना ओबामांनी ‘पार्टिग द वॉटर्स’ वाचले. डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या चरित्राने ते आकृष्ट झाले. ‘वुई श्ॉल ओव्हरकम’ हा आत्मविश्वास तर त्यांना मिळालाच; पण मुख्य म्हणजे काळा आणि गोरा या भेदांच्या पलीकडे ते गेले.
अगदी अलीकडेही ओबामांना प्रशासनाविषयी नव्या कल्पना काही पुस्तकांमधूनच मिळाल्या. ‘टीम ऑफ रायव्हल्स’ या अब्राहम लिंकन यांच्यावरील पुस्तकाने तर त्यांना नवी शिकवण मिळाली. लिंकन यांनी आपल्या पूर्वीच्या विरोधकाला मंत्रिमंडळात कसे घेतले हे वाचून ओबामांनी आपली भूमिका ठरवली. हिलरी क्लिंटन यांचे नाव परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी निश्चित केले, ते त्यानंतरच. अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या पहिल्या शंभर दिवसांवरील पुस्तकाने किंवा स्टीव्ह कोलच्या ‘घोस्ट वॉर्स’ने ओबामांना आणखी नवे काही मिळाले. वाचनातून ऊर्जा मिळवणारा हा अध्यक्ष आहे. वाचनातून नव्या कल्पना मिळवून आपल्या खास शैलीत मांडणे ही ओबामांची खासियत आहे.
बुश आणि ओबामा यांच्या वाचनात मूलभूत फरक आहे. सहजपणे उत्तरे देऊ शकणारी पुस्तके बुश वाचतात. याच्या उलट ओबामा मात्र तत्त्वचिंतक आणि धोरणात्मक स्वरूपाची पुस्तके वाचतात. मानवी स्वभावाचे पदर उकलून दाखवणारी पुस्तके त्यांना आवडतात. त्यांना त्यांच्या आईप्रमाणेच मानवी व्यवहाराचे आणि नातेसंबंधातील गुंतागुंतीचे आकर्षण आहे. कथा-कादंबऱ्या आणि कविता हेही त्यांचे प्रेम आहे. कविता न आवडणारी माणसे भावनिकदृष्टय़ा संपून जातात, असे त्यांचे मत आहे. शेक्सपिअरची नाटकेही ओबामांना प्रिय आहेत. त्यांच्या ‘फेसबुक’वर बायबलचाही उल्लेख आहे. त्याचप्रमाणे लिंकन आणि इमर्स यांचा संदर्भ आहे.
ओबामा नेहमी सांगतात, की कॉलेजात त्यांनी कविता लिहिल्या. त्या फारच वाईट होत्या, हे सांगण्यासही ते विसरत नाहीत. गोष्टी सांगण्याची त्यांची पद्धत विकसित झाली ती कॉलेजातच. त्यामुळेच त्यांचे आत्मचरित्र असे रंगतदार झाले आहे आणि त्यामुळेच तर त्यांची भाषणेही छान रंगतात. बाल्डविनने एके ठिकाणी म्हटले होते, भाषा हे राजकीय साधन आहे आणि सत्तेचा तो पुरावाही आहे. मुख्य म्हणजे ती तुमची ओळख आहे. ती तुमची व्यक्तिगत माहिती सांगते आणि एवढेच नाही फक्त; ती अनेकांशी जोडतेदेखील. त्याचप्रमाणे भाषाच तुम्हाला कित्येकांपासून तोडू शकते.
ओबामांनी आपली ओळख- आपली जीवनयात्रा अमेरिकी स्वप्नाशी जोडली, हे त्यांचे खरे यश. ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ त्यांनी लिहिले तेव्हा ते राजकारणात आलेले नव्हते. मुलांचा शोध घेणारे ते पुस्तक होते. त्यांना आवडणारी पुस्तके प्रामुख्याने मुलांचा शोध घेणारी आहेत. ‘आयडेंटिटी क्रायसिस’ विषयी बोलणारी पुस्तके ओबामांना आवडतात, असे दिसते. त्यांना आवडणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये अशाच विषयांचा समावेश प्रामुख्याने आहे. टोनी मॉरिसनचे ‘साँग ऑफ सोलोमन’ याच प्रकारचे आहे. ‘गोल्डन नोटबुक’देखील तसेच आहे. इलिसनचे ‘इनव्हिजिबल मॅन’ त्यापेक्षा वेगळे नाही. ओबामा यांच्या शपथविधी सोहळ्यात कविता सादर करणाऱ्या एलिझाबेथ अलेक्झांडर यांच्या कविता त्यांना प्रिय आहेत. डेरेक वॉलकॉटच्या कविताही ओबामांना आवडतात.
२००५ मध्ये त्यांनी एक निबंध लिहिला होता. ‘टाइम’ने तो प्रकाशित केला. त्यात त्यांनी म्हटले होते, अब्राहम लिंकन आणि त्यांच्यामध्ये बरेच साम्य आहे. लिंकन यांनी खरी अमेरिकी मूल्ये त्यांना शिकवली. अर्थात, त्यांचा तो निबंध वादग्रस्तही ठरला!
ओबामांचे व्यक्तित्त्व वेगळे आहे. शांत, धीरगंभीर आणि तणावाखालीही प्रसन्न- स्थितप्रज्ञ राहाणे हे त्यांचे वेगळेपण आहे. कारण इतिहासातून त्यांनी र्सवकषता घेतली आहे, तर बुश यांना मात्र इतिहासाने आक्रमकता आणि ‘सव्‍‌र्हायवल ऑफ द फिटेस्ट’ची थिअरी शिकवली आहे.
बराक ओबामा अनेक संदर्भात म्हणूनच वेगळे आहेत.
(अनुवाद : संजय आवटे)