Leading International Marathi News Daily                                 शनिवार, २४ जानेवारी २००९
विविध

गोपाळ बोधे यांच्या ‘गॉडेस महालक्ष्मी अ‍ॅट कोल्हापूर : शक्तीपीठ’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी दिल्ली, २३ जानेवारी/खास प्रतिनिधी

प्रसिद्ध हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या ‘गॉडेस महालक्ष्मी अ‍ॅट कोल्हापूर : शक्तीपीठ’ हे सचित्र पुस्तक आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात अर्पण करण्यात आले.कोल्हापूरच्या प्राचीन महालक्ष्मी मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, तेथील चालीरिती, दागदागिने, मंदिराचा प्राचीन इतिहास आणि वैभवाची या पुस्तकात छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. गोपाळ बोधे यांची मुंबई, गोवा तसेच महाराष्ट्रच्या प्राचीन व समृद्ध वैभवाचे दर्शन घडविणारी पुस्तके प्रसिद्ध आहेत. बोधे यांनी ही पुस्तकेही राष्ट्रपतींना अर्पण केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब सरनाईक, महालक्ष्मी देवस्थान समितीचे प्रमोद पाटील, दिगंबर नीळकंठ, पद्मजा आवळे, व्ही. डी. जरंग, पी. एम. पवार उपस्थित होते. या पुस्तकासाठी दिनेश मर्चंट यांचे सहकार्य लाभले आहे.

‘दंडकारण्य : द स्टोरी ऑफ अ ग्रीन मुव्हमेंट’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी दिल्ली, २३ जानेवारी/खास प्रतिनिधी

स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या ‘दंडकारण्य’ या वृक्ष चळवळीवरील ‘दंडकारण्य : द स्टोरी ऑफ अ ग्रीन मुव्हमेंट’ हे पुस्तक आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना अर्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील पडीक जमिनीवर तीन वर्षांपूर्वी दंडकारण्य नावाची वृक्ष चळवळ सुरु केली. या चळवळींतर्गत २८ हजार एकर जमिनीवर त्यांनी आतापर्यंत साडेचार कोटी वृक्ष बीजे रोवली. दरवर्षी महिनाभर ते बीजारोपणाचे काम करीत असतात. त्यांच्या या चळवळीत ५० हजार नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहभागी झाले असून संगमनेर तालुका आणि परिसरात ही चळवळ अतिशय लोकप्रिय झाली आहे. कमी दिवसात अधिकाधिक वृक्षनिर्मिती करणाऱ्या त्यांच्या या चळवळीची संयुक्त राष्ट्रसंघानेही दखल घेतली आहे. या चळवळीवर आधारित ‘दंडकारण्य’ हे पुस्तक अरुणा अंतरकर यांनी शब्दबद्ध केले असून या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद नंदू डांगे यांनी केला आहे. या पुस्तकाची पहिली प्रत आज भाऊसाहेब थोरात यांचे पुत्र कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रपती पाटील यांना अर्पण केली. यावेळी पुस्तकाच्या लेखिका अरुणा अंतरकर, प्रकाशक उल्हास लाटकर, अमेय लाटकर, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

‘देशद्रोही’च्या प्रदर्शनास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली, २३ जानेवारी/पी.टी.आय.

महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या उत्तर भारतीयविरोधी आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींवर बेतलेल्या ‘देशद्रोही’ या हिंदी चित्रपटाचे राज्यात प्रदर्शन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. परिणामी आजपासूनच हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला. देशद्रोही चित्रपट राज्यात दाखविला गेल्यास त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा आक्षेप राज्य सरकारतर्फेच घेण्यात आला होता. या संदर्भात सॉलिसिटर जनरल गुलाम वहानवटी यांनी राज्य सरकारची बाजू आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. परंतु सरकारच्या या आक्षेपात काहीही तथ्य नाही, असे मत न्या. एस. बी. सिन्हा आणि न्या. एम. के. शर्मा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही देशद्रोहीच्या प्रदर्शनास परवानगी दिली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास महाराष्ट्रीय आणि अन्य प्रांतीय यांच्यात हिंसाचाराच्या घटना घडू शकतील, अशी शक्यताही राज्य सरकारतर्फे वर्तविण्यात आली होती. आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने तातडीने ऐकून घ्यावे, अशी विनंती सरकारने केली होती. त्यानुसार आज न्यायालयाने राज्याचे म्हणणे ऐकून घेतले.

सत्यमला दिलेल्या कंत्राटांचा संयुक्त राष्ट्रे फेरआढावा घेणार
न्यूयॉर्क, २३ जानेवारी / पीटीआय

आर्थिक गैरव्यवहाराने गाजत असलेल्या सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेसला संयुक्त राष्ट्रांनी दिलेली सर्व कंत्राटे स्थगित करण्यात आली असून सत्यमला दिलेल्या सर्व कंत्राटांचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. सत्यमचे संस्थापक रामलिंगा राजू यांनीच कंपनीत ७ हजार ८०० कोटींचा घोटाळा असल्याचे कबूल केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या या निर्णयाबद्दल कोणतेही कारण दिलेले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्तया मिचेल मोंटास यांनी सत्यमला दिलेल्या कंत्राटांचा फेरआढावा घेणार असल्याच्या निर्णयाची आपणाला कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांनी सत्यमला साधारण ६० लाख डॉलरच्या कामाची कंत्राटे दिलेली आहेत

होलब्रुक विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन, २३ जानेवारी /पीटीआय

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान या तणावग्रस्त भागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून कुशल मुत्सद्दी रिचर्ड होलब्रुक यांची नियुक्ती केली आहे.