Leading International Marathi News Daily                                रविवार , २५ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

क्रीडा

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाईन -राज ठाकरे
ठाणे, २४ जानेवारी/प्रतिनिधी
महाराष्ट्र, मराठी अस्मिता व मराठी माणसाच्या प्रश्नांवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उत्तर भारतीय नेत्यांपुढे गुडघे टेकले आहेत. ठाण्यातील लोकसभा व विधानसभेच्या जागा वाढविण्यामागेही त्यांचेच षडयंत्र आहे. या भागातून मोठय़ा प्रमाणावर बिहारी व उत्तर भारतीयांना निवडून आणून एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेचाही ताबा मिळविण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे माझ्यावर भाषणबंदी अथवा कोणत्याही प्रकारच्या कारवाया करून कितीही वेळा अटक केली तरी महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी सुरू असलेली माझी सर्व आंदोलने यापुढेही सुरूच राहतील, असा वज्रनिर्धार व्यक्त करून आगामी निवडणुकांत मराठी माणसाने सावध राहण्याचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.ठाण्याच्या सेंट्रल मैदानावरील प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. या सभेला जमलेल्या आलोट गर्दीने आजपर्यंतचे या मैदानावरील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर बायपास सर्जरी यशस्वी
नवी दिल्ली, २४ जानेवारी/खास प्रतिनिधी
साऱ्या देशवासियांचे लक्ष वेधून घेणारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी जगातील ११ मातब्बर ह्रदयशल्य चिकित्सकांच्या देखरेखीखाली आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) यशस्वीपणे पार पडली. तब्बल सात तास चाललेल्या या सर्जरीनंतर मनमोहन सिंग यांना कार्डियाक केअर युनिटमध्ये हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसात वाजता त्यांना कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटर पाचमध्ये नेण्यात आले. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे नावाजलेले ह्रदयशल्य चिकित्सक रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पंतप्रधानांच्या धडधडत्या ह्रदयावर बायपास सर्जरी पार पाडली. ही शस्त्रक्रिया लांबलचक असली तरी त्यात फारशी जोखीम नसते. विशेषत विविध आजार असलेल्या वृद्ध व्यक्तींवर दुसऱ्यांदा बायपास सर्जरी करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते, असे ह्रदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘शहीद शशांक शिंदे यांचे शौर्य कुठे कमी पडले?’
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता सर्वप्रथम दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत शहीद झालेले सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशांक शिंदे यांची मरणानंतरही घोर उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. शांतताकाळात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याकरिता बहाल करण्यात येणाऱ्या अशोकचक्रासाठी त्यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांप्रमाणेच सर्वसामान्यांमध्येही सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ वरिष्ठांनी दिले तेच बलिदान आणि मग कनिष्ठांचे दिले ते काय होते? असा सवाल करून शौर्य पुरस्कारासाठीही राजकारण का केले जाते? अशी विचारणा केली जात आहे. शिंदे यांना अशोकचक्र मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी मुंबईकरांनी केली आहे.

मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील खारतळे या लहानशा गावातून संगीताच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याच्या इर्षेने मुंबईत आलेल्या वैशाली माडेने १८ लाख ९६ हजार २६० मते मिळवत झी टीव्हीच्या ‘सारेगमप चॅलेंज २००९’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. वैशाली म्हणाली की, हा पुरस्कार मी जगभरातील संगीतरसिकांना अर्पण करत आहे. मराठी ‘सारेगमप’ची महागायिका ठरलेल्या वैशालीला ‘सारेगमप चॅलेंज’मध्ये थेट प्रवेश मिळाला होता. या संधीचे सोने करत मराठी भाषिकांप्रमाणेच जगभरातील संगीतरसिकांना तिने आपल्या आवाजाने भुरळ घातली आणि सारेगमप स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीतील उपविजेती ठरलेल्या याशिता शर्माला १७ लाख ३३ हजार ५९५ तर तिसऱ्या क्रमांकावरील सोमेन नंदीला १६ लाख ४९५ मते मिळाली. ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात आज रंगलेल्या झी टीव्हीच्या ‘सा रे ग म प चॅलेंज २००९’च्या अंतिम फेरीच्या सुरुवात शंकर महादेवनने गायलेल्या ‘सब से आगे होंगे हिंदुस्तानी’ या गाण्याने झाली. आदेश श्रीवास्तवनेही ‘कर चले हम फिदा’ गाणे गात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. थोडय़ा थोडय़ा वेळाने एकेका विभागातून आलेली मते जाहीर करण्यात येत होती. आंतरराष्ट्रीय फोन लाईन्सनुसार वैशाली तिसऱ्या क्रमांकावर होती, सोमेन दुसऱ्या क्रमांकावर तर याशिता शर्मा पहिल्या क्रमांकावर होती. उत्तर विभागाने याशिताला पसंती दिली होती, पूर्व विभागातून आलेल्या निकालानुसार सोमेनला सर्वात जास्त मते मिळाली होती तर पश्चिम आणि दक्षिण विभागातून मात्र वैशालीच्या नावाला पसंती देण्यात आली होती. त्यामुळे विजेतेपद कोण पटकाविणार याबद्दल सर्व उपस्थितांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर तो क्षण आला आणि अक्षयकुमारने वैशाली माडेचे नाव जाहीर केले. झी मराठीवरील सारेगमप स्पर्धेसाठी पहिल्यांदा ऑडिशन दिले होते. त्यावेळी तिची निवड न झाल्यामुळे तिची उमेद खचली. पण वैशालीचे पती अनंत माडे यांनी तिला धीर दिला. दुसऱ्या प्रयत्नात मात्र तिला यश मिळाले. झी मराठीवरील ‘सारेगपम’ या स्पर्धेची अंतिम फेरीच नव्हे तर महागायिकेची माळही वैशालीच्याच गळ्यात पडली आणि आता हिंदी सारेगमपचे विजेतेपद पटकाविल्यामुळे आता जगभरातील संगीतरसिकांच्या कौतुकाची धनी झाली आहे.

पूल कोसळून ७ मजूर ठार, ८ जखमी
पुलगाव, २४ जानेवारी/वार्ताहर

उध्र्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात ७ मजूर मलब्याखाली दबून ठार तर ८ पेक्षा अधिक जबर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. उध्र्व प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम सुरू असून या कालव्यावर चार ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. येथून ११ किलोमीटरवर इंझाळ्यापुढे याच कालव्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत यवतमाळ येथील कंत्राटदार अवधारीया कंस्ट्रक्शन कंपनी मार्फत पुलाचे काम सुरू आहे. पुलावर स्लॅब टाकण्यासाठी नवीन पद्धतीने आधार नसलेल्या शटरिंगवर लोखंड बांधण्याचे काम सुरू होते. याच कामावर आज स्लॅब टाकण्यासाठी पडेगाव येथे सुरू असलेल्या कामावरून १५ ते १६ मजूर आणण्यात आले होते. हे सर्व मजूर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील सुरपूर येथील आहेत.

पाटसजवळील अपघातात मुंबईतील सहा ठार
पाटस, २४ जानेवारी/वार्ताहर

दौंड तालुक्यातील चौफुल्यापासून चार कि.मी. अंतरावर चौफुला-सुपा रस्त्यावर मालट्रक व तवेरा गाडीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तवेरा गाडीतील सहा ठार, तर सात व्यक्ती जखमी झाल्या. मृतांमध्ये तीन महिला व लहान बालिका आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून मृत व जखमी करीरोड मुंबईचे रहिवासी आहेत. हा अपघात आज सकाळी ९.१५ च्या सुमारास घडला.
अपघातातील तवेरा गाडीतील निर्मला बरमू पाटील (वय ३८), सचिन शंकर कोल्हे (वय ३०), साखरूबाई बरमू पाटील (वय ७०), शंकर आण्णा कोल्हे (वय ५६), लिला शंकर कोल्हे (वय ५०) असे पाचजण जागीच ठार झाले तर भूमी सचिन कोल्हे ही ८ महिन्यांची मुलगी दवाखान्यात नेताना मरण पावली. वैभव शंकर कोल्हे (वय २५) व रेखा सचिन कोल्हे (वय २४) या जबर दोन जखमींना ग्लोबल हॉस्पीटल, हडपसर पुणे येथे नेण्यात आले आहे. सर्वजण राहणार राजगड बिल्डिंग, महादेव पालवमार्ग, करीरोड मुंबई येथील आहेत. मुंबईचे कोल्हे-पाटील कुटुंबीय चौफुल्यावरून मोरगावकडे गणपती दर्शनासाठी तवेरा गाडीतून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक बसून हा दुर्दैवी भीषण अपघात झाला.

‘सन्मान डावलणे हा शिंदे यांच्या बलिदानाचा आणि आमचा अपमानच!’
केंद्र सरकारच्या विशेष समितीने अशोकचक्रासाठी शिंदे यांचे नाव डावलले असले तरी राज्य सरकारने शिंदे यांना हा सन्मान मिळण्याकरिता सतत पाठपुरावा करणे गरजेचे होते. पण आम्ही शिंदे यांचे नाव अशोकचक्रासाठी पाठवले होते असे सांगून राज्य सरकार स्वत:चा बचाव करण्याचा आटापीटा करीत आहे. त्यांच्या या कृतीने माझ्या पतीच्या बलिदानाचा आणि आमचा अपमान झाला आहे, असा आरोप शशांक शिंदे यांच्या पत्नी मानसी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. शशांक यांनी ज्या धैर्याने, शौर्याने सीएसटी येथे दहशतवाद्यांचा सामना केला व देशासाठी बलिदान दिले हे सर्वाना माहीत आहेच व त्यांनी त्याची सीसीटीव्हीमधील दृश्येही वृत्तवाहिन्यांवर पाहिलेली आहेत. त्यांच्या या बलिदानाचा सन्मान झालाच पाहिजे, असे सांगून माझ्या पतीला हा सन्मान मिळवून देण्यासाठी मी मरेपर्यंत लढेन, असेही मानसी यांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८