Leading International Marathi News Daily                                  रविवार , २५ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाईन -राज ठाकरे
ठाणे, २४ जानेवारी/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र, मराठी अस्मिता व मराठी माणसाच्या प्रश्नांवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उत्तर भारतीय नेत्यांपुढे गुडघे टेकले आहेत. ठाण्यातील लोकसभा व विधानसभेच्या जागा वाढविण्यामागेही त्यांचेच षडयंत्र आहे. या भागातून मोठय़ा प्रमाणावर बिहारी व उत्तर भारतीयांना निवडून आणून एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेचाही ताबा मिळविण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे माझ्यावर भाषणबंदी अथवा कोणत्याही प्रकारच्या कारवाया करून कितीही वेळा अटक केली तरी महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी सुरू असलेली माझी सर्व आंदोलने यापुढेही सुरूच राहतील, असा वज्रनिर्धार व्यक्त करून आगामी निवडणुकांत मराठी माणसाने सावध राहण्याचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.
ठाण्याच्या सेंट्रल मैदानावरील प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. या सभेला जमलेल्या आलोट गर्दीने आजपर्यंतचे या मैदानावरील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. १९९२ साली या मैदानावर शिवसेनाप्रमुखांची अशीच प्रचंड जाहीर सभा झाली होती. सुमारे पाऊण लाखाचा जमाव त्या वेळी उपस्थित होता. त्या सभेची आठवण ताजी करून देणारी आजची सभा होती, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ ठाणेकराची दिली. कोणत्याही निवडणूक प्रचाराची ही सभा नव्हती. तरी ‘राज ठाकरे’ यांचा जयघोष करीत आणि मनसेचे झेंडे नाचवत प्रचंड उत्साह ओसंडून वाहणाऱ्या सभेत मुंगी शिरायलाही जागा शिल्लक नव्हती. १८ ते ३० या वयोगटांतील राज ठाकरे यांच्या करिष्म्याने बेधुंद झालेल्या तरुणाईचे दर्शन आजच्या विराट सभेतून झाले. सेंट्रल मैदानासभोवतालचे अर्धा किलोमीटर अंतरावरील सर्व रस्ते व आजूबाजूच्या इमारतींवरील गच्चींवर, इतकेच काय परिसरातील झाडांवर चढून अनेक तरुण ‘राज’ यांचे भाषण ऐकताना दिसत होते.
नेत्यांपासून ते हिंदी, इंग्रजी मीडियामधील विकृत पत्रकारितेवर कडाडून हल्ला चढवून ठाकरे यांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणात आपण मराठी अस्मितेच्या मुद्दय़ापासून तसूभरही दूर गेलो नसल्याचे यावेळी बजावले. माझे संरक्षण काढले किंवा अन्य मार्गाने दमननीती वापरली तरी आपण त्यास मुळीच भीक घालीत नाही, असा खणखणीत भाषेत इशारा त्यांनी दिला आणि मराठीसाठी कितीही वेळा जेलमध्ये जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी बजावले. २४ जानेवारीला ‘उत्तर प्रदेश दिन’ असतो हे कुणालाही ठाऊक नाही. योगायोगाने मी आज ही सभा लावली, पण मुंबईत हा दिन साजरा करणाऱ्यांना आपली ताकद दाखवायची आहे. त्याआडून राजकारण करायचे आहे. ते मी महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा देऊन ते म्हणाले, की बाबरी मशीद पाडली, जातीय दंगे भडकले तरी या देशात कुणावरही भाषणबंदी लावण्यात आली नाही. श्रीलंकेत तामिळींविरुद्ध अत्याचार झाले म्हणून करुणानिधींनी आवाज उठविला त्यांच्याविरुद्ध कारवाई नाही. लालूप्रसाद यादव यांनी तेथील ब्राह्मण, क्षत्रियांविरुद्ध पोस्टर्स छापून राज्यभर लावले त्यांच्याविरुद्ध कुणी एक शब्दही बोलत नाही आणि महाराष्ट्र व मराठीबद्दल बोललो, की मी देश तोडायला निघालो, अशी दिल्लीच्या लोकसभा व राज्यसभेत बोंबाबोंब हेच मारतात. या वेळी महाराष्ट्रातील कणा नसलेले दळभद्री खासदार मात्र मूग गिळून बसतात. हे चित्र किती काळ सहन करणार, असा खडा सवाल त्यांनी केला. मी ही सर्व आंदोलने वेड लागले म्हणून करीत नाही हे लक्षात घ्या, असे सांगून ते म्हणाले, की माझ्या हाती एक वेळा महाराष्ट्राची सत्ता देऊन बघा. या सगळ्यांना सूतासारखे सरळ करून दाखवेन. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा दिल्लीश्वरांचा एकच अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला. दुकाने व इतर आस्थापनांवरील पाटय़ा मराठीत असाव्यात यासाठी मी आंदोलन करताच मुंबईत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिसतो आहे. वसंतदादांचे ते स्वप्न होते. आपण ते पूर्ण केले. पण त्याविरुद्धही काँग्रेसवाले काव-काव करतात तेव्हा शरम वाटते, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. बेळगावचा सीमाप्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नावर सर्वच पक्ष मतलबी व ढोंगीपणाची भूमिका घेतात. क्रिकेटसाठी शरद पवार जेवढय़ांदा टी. व्ही.वर दिसतात तेवढय़ांदा ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषीमंत्री म्हणून टी. व्ही.वर का दिसत नाहीत, असा खडा सवाल करून त्यांनी बेळगावमधील मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाबाबत भाजपा नेत्यांवरही सडकून टीका केली. कर्नाटकात भाजप कानडय़ांच्या बाजूने उभी राहते मग महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मराठी माणसांबद्दल प्रेम वाटत नाही का, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. या वेळी मुंबईचे माजी महापौर सुरेश प्रभू, कामगार नेते राजन राजे, सुभाष देशमुख, आगरी युवक संघटनेचे गोविंद भगत यांनी ‘मनसे’मध्ये प्रवेश केला.

मनोहर जोशी यांचा नित्याचा सबुरीचा सल्ला..
राज ठाकरे यांनी आठ महिने थांबावे, महाराष्ट्रात मराठी माणसाचेच सरकार सत्तेवर येणार आहे, असा सबुरीचा सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी कोपरखैराणे येथे बोलताना दिला. राज्यातील मराठी माणसांचे प्रश्न संपले, तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला पक्ष बंद करू, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील सभेत केले होते. राज यांच्या या वक्तव्यावर बोलताना जोशी यांनी त्यांना हा उपरोधिक सल्ला दिला. शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त जोशी कोपरखैराणे येथे आले होते. राज्यात येत्या आठ महिन्यांत मराठी माणसाचेच सरकार सत्तेवर असेल आणि तेही मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेचे असेल, असा दावा जोशी यांनी या वेळी केला. शिवसेना सुरुवातीपासून मराठी माणसांसाठीच आहे. आता मराठी माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी काही जण पुढे येत आहेत. त्यांनी शिवसेनेला मराठीपणा शिकवू नये. भावनेच्या भरात तिकडे गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होऊन ते परत शिवसेनेत येत आहेत. मराठी माणूस, हिंदुत्व आणि सामान्य माणसांची कामे करणे यातूनच शिवसेना पुढे आल्याचे जोशी यांनी सांगितले.