Leading International Marathi News Daily                                  रविवार , २५ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर बायपास सर्जरी यशस्वी
नवी दिल्ली, २४ जानेवारी/खास प्रतिनिधी

 

साऱ्या देशवासियांचे लक्ष वेधून घेणारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी जगातील ११ मातब्बर ह्रदयशल्य चिकित्सकांच्या देखरेखीखाली आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) यशस्वीपणे पार पडली. तब्बल सात तास चाललेल्या या सर्जरीनंतर मनमोहन सिंग यांना कार्डियाक केअर युनिटमध्ये हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसात वाजता त्यांना कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटर पाचमध्ये नेण्यात आले. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे नावाजलेले ह्रदयशल्य चिकित्सक रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पंतप्रधानांच्या धडधडत्या ह्रदयावर बायपास सर्जरी पार पाडली. ही शस्त्रक्रिया लांबलचक असली तरी त्यात फारशी जोखीम नसते. विशेषत विविध आजार असलेल्या वृद्ध व्यक्तींवर दुसऱ्यांदा बायपास सर्जरी करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते, असे ह्रदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नेहमीच्या बायपास सर्जरीमध्ये ह्रदयाची धडधड थांबवून हार्ट-लंग मशीनचा वापर केला जातो. पण पंतप्रधानांना मधुमेह असल्यामुळे जोखीम नसलेलीच शस्त्रक्रियेची प्रक्रिया अवलंबिण्यात आली. बीटींग हार्ट बायपास सर्जरीत ह्रदयाची धडधड न थांबविताच शस्त्रक्रिया केली जाते. ह्रदयाच्या ज्या भागात शस्त्रक्रिया करायची असते तो भाग विशेष उपकरणांच्या साह्याने स्थिर ठेवला जातो. पंतप्रधानांवरील पहिली बायपास सर्जरी १९९० साली ब्रिटनमध्ये झाली होती. त्यावेळी ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही आजच्या सर्जरीदरम्यान उपस्थित होते. मनमोहन सिंग यांची २००४ साली एंजिओप्लास्टी झाली होती. २००७ साली त्यांच्या प्रोस्ट्रेट ग्रंथीचे ऑपरेशन करण्यात आले होते, तर गेल्या वर्षी त्यांच्या डोळ्यातून काचिबदू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सकाळी सव्वा आठ वाजता सुरु झालेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान मनमोहन सिंग यांच्या ह्रदयाकडे जाणाऱ्या अवरुद्ध अवस्थेतील तीन
रक्तवाहिन्या बदलण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया दुपारी सव्वा तीन वाजता पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांना आयसीसीयुमध्ये हलविण्यात आले. तिथे त्यांना पुढचे चोवीस तास कृत्रिम श्वसनक्रियेवर ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांची सर्व महत्त्वाची अवयवे पूर्ववत कार्यरत झाल्यानंतर त्यांना आयसीसीयुमधून बाहेर काढण्यात येईल. पंतप्रधानांना किमान चार दिवस आयसीसीयुमध्ये राहावे लागेल आणि त्यानंतर आठवडाभर त्यांना इस्पितळातच विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर इस्पितळातून सुटी मिळाल्यावर घरी किमान दोन आठवडे त्यांना अतिरिक्त विश्रांती करावी लागेल. त्यामुळे किमान महिनाभर म्हणजे संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत पंतप्रधानांना सक्रिय होता येणार नाही, हे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे. आज शस्त्रक्रियेदरम्यान मनमोहन सिंग यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर, त्यांची कन्या तसेच अन्य आप्तस्वकीय उपस्थित होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती वेगाने बरी होण्यासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधानांच्या जबाबदाऱ्यांची सामूहिक विभागणी दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत केंद्रातील क्रमांक दोनचे मंत्री व लोकसभेचे नेते प्रणव मुखर्जी हेच ‘कार्यकारी पंतप्रधान’ असतील, ही धारणा आज मोडीत निघाली. मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यांची विभागणी करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान मनमोहन सिंग भाग घेऊ शकणार नसल्यामुळे आज केंद्र सरकारच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील शिष्टाचारात बदल जाहीर करण्यात आले. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वतीने संरक्षण मंत्री प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भाग घेणार असून इंडिया गेटपाशी अमर जवान ज्योतीपाशी पुष्पचक्र अर्पण करतील, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधानांच्या वतीने छोटय़ा शूरवीरांना बहाल केले जाणारे शौर्य पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी करणार आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी होतील. पण या बैठकींमधील निर्णयही राजकीय कामकामविषयक कॅबिनेट समितीत घेतले जाणार आहेत. या समितीत मुखर्जी यांच्या व्यतिरिक्त पी. चिदंबरम, लालूप्रसाद यादव, शरद पवार, टी. आर. बालू आणि सुशीलकुमार िशदे यांचा समावेश आहे.