Leading International Marathi News Daily                                  रविवार , २५ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘शहीद शशांक शिंदे यांचे शौर्य कुठे कमी पडले?’
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

 

मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता सर्वप्रथम दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत शहीद झालेले सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशांक शिंदे यांची मरणानंतरही घोर उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. शांतताकाळात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याकरिता बहाल करण्यात येणाऱ्या अशोकचक्रासाठी त्यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांप्रमाणेच सर्वसामान्यांमध्येही सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ वरिष्ठांनी दिले तेच बलिदान आणि मग कनिष्ठांचे दिले ते काय होते? असा सवाल करून शौर्य पुरस्कारासाठीही राजकारण का केले जाते? अशी विचारणा केली जात आहे. शिंदे यांना अशोकचक्र मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी मुंबईकरांनी केली आहे.
शशांक शिंदे यांना अशोकचक्र सन्मानासाठी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर मुंबईकरांमध्ये सरकारविरोधात तीव्र संतापाची भावना उफाळून आली आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे, खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाल्याचे वृत्त वाहिन्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. अशोकचक्र जाहीर झालेल्यांमध्ये शिंदे यांचे नाव नसल्याने शिंदे यांच्या पत्नी मानसी यांनी आपल्या पतीचे शौर्य कुठे कमी पडले असा सवाल करीत त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि त्यासाठी शेवटपर्यंत लढू असा इशाराही दिला. शिंदे यांच्या पत्नीचा दावा योग्य असल्याचे सांगत सर्वसामान्य मुंबईकरांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त केला. सीएसटी स्थानकावर हल्ला झाला त्यावेळेस सामान्य माणसे त्यात बळी पडली. यावेळेस दहशतवाद्यांना सर्वप्रथम सामोरे जाणाऱ्यांमध्ये शशांक शिंदे यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळेच दहशतवाद्यांना त्यांचा आराखडा बदलणे भाग पडले. याच हल्ल्यादरम्यान दुर्दैवाने शशांक शिंदे यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्या व ते शहीद झाले. ताज आणि ओबेरायवरील हल्ल्यापेक्षा जिथे सर्वसामान्य माणसे सर्वाधिक संख्येने बळी पडण्याची शक्यता होती त्या सीएसटीवरील हल्ल्याकडे त्यावेळेसही दुर्लक्ष्यच झाले होते. किंबहुना शशांक शिंदे आणि काही शूर अधिकाऱ्यांनी दिलेल्या लढय़ामुळे सीएसटी येथे कमीत कमी लोक मृत्युमुखी पडले, अन्यथा मोठाच अनर्थ ओढवला असता. या घटनेला आणि शशांक शिंदे यांच्या बलिदानाला म्हणूनच सर्वाधिक महत्त्व आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना अशोकचक्राच्या यादीत डावलले गेल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मुंबईकरांमध्ये मूळ धरू लागली आहे. खुद्द पोलीस दलातही शिंदे यांना अशोकचक्र जाहीर न झाल्याबाबत नाराजी आहे. नेहमीप्रमाणे येथेही अंतर्गत राजकारणाचा फटका शिंदे यांना बसल्याचे काही पोलीस अधिकारी खाजगीत बोलत आहेत. शिंदे यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही सर्व बाजूंनी टीका करण्यात येत आहे. यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे यांच्याप्रमाणे शिंदे यांचेही नाव अशोकचक्रासाठी पाठविण्यात आले होते, असा असे स्पष्टीकरण राज्य सरकारने देण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे पोलिसांकडूनही हाच दावा केला जात आहे. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. तर रेल्वे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांनीही शिंदे यांचे नाव अशोकचक्रासाठी व अन्य सहा जणांचे नाव शौर्य पदकासाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले.