Leading International Marathi News Daily                                  रविवार , २५ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पूल कोसळून ७ मजूर ठार, ८ जखमी
पुलगाव, २४ जानेवारी/वार्ताहर

 

उध्र्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात ७ मजूर मलब्याखाली दबून ठार तर ८ पेक्षा अधिक जबर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
उध्र्व प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम सुरू असून या कालव्यावर चार ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. येथून ११ किलोमीटरवर इंझाळ्यापुढे याच कालव्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत यवतमाळ येथील कंत्राटदार अवधारीया कंस्ट्रक्शन कंपनी मार्फत पुलाचे काम सुरू आहे. पुलावर स्लॅब टाकण्यासाठी नवीन पद्धतीने आधार नसलेल्या शटरिंगवर लोखंड बांधण्याचे काम सुरू होते. याच कामावर आज स्लॅब टाकण्यासाठी पडेगाव येथे सुरू असलेल्या कामावरून १५ ते १६ मजूर आणण्यात आले होते. हे सर्व मजूर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील सुरपूर येथील आहेत.
काही मजूर शटरिंग तपासण्याचे व लोखंड बांधण्याचे काम करीत होते. शटरिंगच्या आधाराचा नट तुटल्याने शटरिंगसह दोन टन वजनाच्या लोखंडी सळ्या ६० फूट खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळल्या. या वजनाखाली दबून ५ मजूर जागीच ठार झाले. ठार झालेल्या मजुरात प्रकाश रॉय (२५), त्रिनाथ रॉय (२०), समीर बैरागी (२०), राजू तेलंग (३०), यांच्यासह सातजणांचा समावेश आहे.
दरम्यान, मलब्याखाली आणखी मृतदेह असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आसपासच्या गावातील लोकांना घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह काढण्यास मदत केली. ग्रामीण रुग्णालयात आणलेल्या मृतदेहांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मृतांचे नातेवाईक हतबल होऊन घडलेल्या घटनेकडे पहात होते. हे विदारक दृश्य पाहून अनेकांना भोवळ आली.
जखमींमध्ये कंत्राटदार अवधारीया यांचा मुलगा सारंग अवधारीया यांचाही समावेश असून त्याला यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.