Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

प्रादेशिक

ज्ञानेश्वर मुळे मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त
मुंबई, २४ जानेवारी/प्रतिनिधी

परराष्ट्र खात्यातील ज्येष्ठ अधिकारी तसेच मराठी लेखक आणि कवी व ‘लोकसत्ता’चे स्तंभलेखक ज्ञानेश्वर मुळे यांची मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर मुळे सध्या दिल्लीतील परराष्ट्र खात्याच्या मुख्यालयात संयुक्त सचिव आहेत. मालदीवमधील विद्यमान भारतीय उच्चायुक्त ए. के. पांडे यांच्या जागी त्यांची बढतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी रशिया, जपान व सिरिया येथे भारतीय उच्चायुक्तालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. नवीन पदाची सूत्रे ते लवकरच स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

विनोद पुनमिया यांची प्रजासत्ताकदिनापासून ‘गेटवे’ ते ‘इंडिया गेट’ सायकल यात्रा
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

डेक्कन क्वीनच्या वेगाशी स्पर्धा करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू विनोद पुनमिया शांतता आणि एकात्मतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी येत्या २६ जानेवारी रोजी ‘व्हील द हील’ ही मुंबई ते दिल्ली अशी साहसी सायकल यात्रा करणार आहेत. या यात्रेअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया ते दिल्लीतील इंडिया गेटदरम्यानचे अंतर ते अवघ्या चार दिवसांत कापणार आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रजासत्ताक दिनी सकाळी त्यांच्या या यात्रेला हिरवा ध्वज दाखविणार आहेत. दिल्लीत राष्ट्रपती प्रतिभा पाटील या यात्रेचे स्वागत व तिच्यात सहभागी होणाऱ्यांचा सत्कार करणार आहेत. प्रजासत्ताकदिनाबरोबरच २६ जानेवारी रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दोन महिने होत आहेत. हेच निमित्त साधून सोमवारी सकाळी ७.३० वाजता विनोद पुनमिया यांची ही सायकल यात्रा सुरू होईल व हुतात्मादिनी म्हणजे महात्मा गांधींच्या पुण्यातिथीदिनी, ३० जानेवारी रोजी दिल्लीत या यात्रेच्या समाप्ती करण्यात येणार आहे.

‘मुंबईत एक जागा राष्ट्रवादी लढविणारच’
मुंबई, २४ जानेवारी / खास प्रतिनिधी

मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास काँग्रेसने विरोध दर्शविला असला तरी कोणत्याही परिस्थितीत एक तरी जागा काँग्रेसबरोबर जागावाटपात मिळवूच, असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिला. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांना पदावर कायम ठेवण्यात आले असले तरी शहरात पक्षाची ताकद वाढत नसल्याबद्दल पवारांनी आज तीव्र नापसंती व्यक्त केली. पवारांनी मुंबईतील नेत्यांना कानपिचक्या दिल्यावर लगेचच सर्व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले.

दोन्ही रेल्वेंवर आज मेगा ब्लॉक
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावर मशीद-चुनाभट्टी व वडाळा-माहीम, मेन मार्गावर ठाणे-कल्याण आणि पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूझ-गोरेगाव या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. मशीद-चुनाभट्टीदरम्यान केवळ डाऊन तर वडाळा-माहीमदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक केला जाणार आहे. ठाणे-कल्याणदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी पावणेअकरा ते सायंकाळी पावणेपाच या वेळेत मेगा ब्लॉक करण्यात येईल. हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसटी-अंधेरीदरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प राहील. सीएसटी-कुर्लादरम्यानची अप दिशेची वाहतूक सुरळीत सुरू राहील. मात्र डाऊन दिशेची वाहतूक सीएसटी-कुर्लादरम्यान मेन मार्गावरून चालविण्यात येईल, असे मध्य रेल्वेने नमूद केले आहे.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन या वेळेत अप व डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात या स्थानकांदरम्यानची वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

शहीद शशांक शिंदे यांची उपेक्षा; पोलीस दलातही नाराजी
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

शहीद शशांक शिंदे यांना अशोकचक्रासाठी डावलण्यात आल्याच्या वृत्तानंतर कुटुंबियांप्रमाणेच सर्वसामान्यांमध्येही सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. खुद्द पोलीस दलातही शिंदे यांना अशोकचक्र जाहीर न झाल्याबाबत नाराजी आहे. नेहमीप्रमाणे येथेही अंतर्गत राजकारणाचा फटका शिंदे यांना बसल्याचे काही पोलीस अधिकारी खाजगीत बोलत आहेत. करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे यांच्याप्रमाणे शिंदे यांचेही नाव अशोकचक्रासाठी पाठविण्यात आले होते, असा असे स्पष्टीकरण राज्य सरकारने देण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे पोलिसांकडूनही हाच दावा केला जात आहे. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. तर रेल्वे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांनीही शिंदे यांचे नाव अशोकचक्रासाठी व अन्य सहा जणांचे नाव शौर्य पदकासाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. परंतु शिंदे यांचे नाव जर अशोकचक्रासाठी पाठविण्यात आले होते तर त्यांचे शौर्य हे या पुरस्कारासाठी निश्चित केलेल्या कोणत्या निकषांवर उतरले नाही, याची विचारणा केली जात आहे. तसेच हा पुरस्कार केवळ वरिष्ठांच्या बलिदानासाठी देण्यात येतो का आणि आणखी किती दिवस पोलिसांची, अपुऱ्या शस्त्रास्त्रांच्या आधारे त्यांनी केलेल्या शौर्याची उपेक्षा केली जाणार आहे, असा सवालही केला जात आहे. शिवसेना, भाजपा यांनी याबाबत सत्ताधारी काँग्रेसवर तोफ डागली आहे. लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी शिंदे यांना अशोकचक्र मिळालेच पाहिजे अशी मागणी करीत ही बाब आपण केंद्रीय गृहमंत्री व सभागृहात उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार गोपाळ शेट्टी यांनीही शिंदे यांना अशोकचक्रासाठी डावलण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे शिंदे कुटुंबियांसोबत सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. तसेच शिंदे यांना अशोकचक्र सन्मान जाहीर करण्याची मागणी केली आहे.

उत्तर मुंबईत अडीच लाख मतदारांची दोनवेळा नोंदणी
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

लोकसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करीत असतानाच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अडीच लाख मतदारांची दोनवेळा नोंदणी झाली असल्याचे आढळून आले आहे. या मतदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून ही प्रक्रिया २८ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. लोकसभेच्या गेल्या निवडणूक निकालांचे विश्लेषण करीत असताना मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचे निदर्शनास आले आणि त्याचे कारण अनेक मतदारांची दोनवेळा झालेली नोंदणी हे असल्याचे लक्षात आले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुन्या मालाड, कांदिवली आणि बोरिवली विधानसभा क्षेत्रातच तीन लाख ५७ हजार ५२० मतदार दुबार असल्याचे बारकाईने पाहणी केली असता आढळले, असे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी सांगितले. या सर्व दुबार मतदारांची यादी एप्रिल २००८ मध्ये निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. त्यानंतर आयोगाच्या सूचनेवरून प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाईसाठी ती यादी आपण मुख्य निवडणूक अधिकारी देवाशिष चक्रवर्ती यांना दिली होती. त्यांनी केलेल्या पाहणीत दोन लाख ५७ हजार १९३ दुबार मतदार आढळले असून त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत, असे चक्रवर्ती यांनी कळविल्याचे राम नाईक म्हणाले. दुबार मतदारांच्या दिलेल्या संपूर्ण यादीची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. संगणक हा एकमेव निकष लावू नये. केवळ संगणकाद्वारे नाव शोधल्यास नावादीतल, मतदारांच्या वयाच्या नोंदीतील किरकोळ फरकांमुळे अनेक दुबार नावे लक्षात न येऊन निर्दोष मतदारयादी होऊ शकणार नाही. त्यामुळे घरोघरी जाऊनच हे काम करावे, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

मुंबईतील दोन उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुले
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होईल, असे मत राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त केले. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ठाकुर संकुल जंक्शन, कांदिवली येथील उड्डाणपुल, भोर जंक्शन कांदिवली येथील भुयारी वाहन मार्ग तसेच सांताक्रुझ येथील आंतर्देशीय विमानतळ जंक्शन येथील उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री डॉ. विमला मुंदडा, आमदार कृपाशंकर सिंह, गोपाळ शेट्टी, पी. यु. मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश गवई, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड, अतिरिक्त महानगर आयुक्त मिलिंद म्हैसकर, सह महानगर आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते. नवीन उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडी कमी होऊन इंधन व वेळेची बचत होणार आहे. पर्यायाने प्रदुषण देखील कमी होईल, मुंबई महानगर प्रदेशामध्ये विविध विकास व पायाभूत सुविधांच्या योजना राबविण्यात येत असल्याने मुंबईचे रूपांतर जागतिक दर्जाच्या शहरामध्ये होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील उड्डाणपुलांच्या कामाला प्राधिकरणाद्वारे सुरूवात करण्यात आली असून हे उड्डाणपुल येत्या वर्षांत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या उड्डाणपुलांपैकी शीव व हिंदमाता येथील उड्डाणपुल मे २००९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी जाहिर के ले. ठाकुर संकुल-कांदिवली येथील उड्डाणपुलाची लांबी ६४४ मीटर असून रूंदी २४.२० मीटर आहे. भोर येथील भुयारी वाहन मार्गाची लांबी ३५० मीटर व रूंदी २४ मीटर इतकी आहे.

तीन वर्षांच्या मुलीचा टँकरखाली येऊन मृत्यू
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

कांदिवली-चारकोप येथे इमारतीच्या खाली खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टँकरने ठोकर देऊन जागीच मृत्यू झाला. अंशुप्रसाद गौड असे या मुलीचे नाव आहे. चारकोप येथील सेक्टर-८ मध्ये पाण्याची टंचाई असल्याने दररोज सकाळी येथे पाण्याचा टँकर येतो. आजही येथे नेहमीप्रमाणे पाण्याचा टँकर आला होता. सकाळी साडे आठच्या सुमारास टँकरचा चालक तो योग्य ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करीत असताना येथील जीवन इमारतीखाली खेळत असलेल्या तीन वर्षांच्या अंशुला त्याने ठोकर दिली. त्यामुळे टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन अंशुचा जागीच मृत्यू झाला. घडल्याप्रकाराने स्थानिकांमध्ये तीव्र संताप होता.

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही
मुंबई, २४ जानेवारी / प्रतिनिधी

भिवंडी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा करीत राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कोणत्याही स्थितीत काँग्रेसला दयायचा नाही असा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणूकसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाली त्यावेळी ठाणे, कल्याण तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावे अशी जोरदार मागणी करण्यात आली. भिवंडी लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुर्वी डहाणू लोकसभा मतदारसंघात भिवंडी होते. काँग्रेसचे दामू शिंगडा या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले. त्यामुळे हा मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. भिवंडीचे माजी महापौर सुरेश टावरे यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली असून ते उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.