Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

गेले रोहित कुणीकडे!
मधुकर ठाकूर

हिवाळ्यात ऑक्टोबर हिटनंतर कच्छचे रण व इतर स्थलांतरित ठिकाणाहून हजारो मैलांचे स्थलांतर करून उरण परिसरात रोहित पक्ष्यांचे हजारोंचे थवे येऊन वास्तव्य करतात. थव्या-थव्याने येणाऱ्या आकर्षक पक्ष्यांनी येथील परिसर अगदी फुलून जायचा. मात्र मागील काही वर्षांपासून स्थलांतरित रोहित पक्ष्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. यामुळे पक्षीप्रेमी व निरीक्षकांना रोहित पक्षी गेले तरी कुठे? असा प्रश्न पडला आहे. ऑक्टोबरनंतर हिवाळ्यात उरण परिसरात अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. विविध जातीचे अनेक रंगाचे आकर्षक जलचर पक्षी येथील विस्तीर्ण जलाशय, डोह, खाडय़ात येऊन वास्तव्य करतात. या आकर्षक पक्ष्यांमध्ये पोलिकन, करकोचा, दर्बीमुखी, तिरंदाज, वंचक, डॅबचिक, छोटा मराल, हंस, माळठोक, शराटी, तुतवार, ब्राँझ पंखी, जलकपोत, जांभळी पाणकोंबडी, तसेच इतर विविध प्रकारांतील स्थानिक पक्ष्यांच्या आगमनामुळे येथील खाडी परिसर रंगीबेरंगी आकर्षक जलचर पक्ष्यांनी फुलून येतो. यामध्ये रोहित पक्ष्यांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश असतो.

रायगडात जेव्हा बंड होते..
अनिरुद्ध भातखंडे

पनवेलमध्ये नुकत्याच संपन्ना झालेल्या मल्हार महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अलिबागचे आमदार मधुकर ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या मनोगतात त्यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हौतात्म्यावर शंका उपस्थित करणाऱ्या (आपल्याच पक्षाच्या) खासदार व केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्यावर नाव न घेता टीका केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या बलिदानावर जाहीर चर्चा होण्याचा प्रकार दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हणताच व्यासपीठावरील समस्त अंतुले विरोधकांनी परस्परांना टाळ्या दिल्या.

भीती सायबर विश्वातील
Dear friend,

Sorry I didn't inform you about my traveling to UK for a program. I am currently stranded in London because I lost my wallet on my way to the hotel where my money, and other valuable things were kept. I need you to help me. Please assist me with a soft loan urgently with the sum of 1,200 GB Pounds to sort out my hotel bills and get myself back home. I will appreciate whatever you can afford. I'll pay you back as soon as I return. Please send the money to me through Western Union money transfer by the details below. Patrick Collingwood Address, 199 Marylebone High Street, London W1U 4RY After making the payment kindly get back to me with payment receipt details needed to collect the money here.
Regards, Varun आपल्या मित्राचा असा ई-मेल आपल्या मेल बॉक्समध्ये येतो आणि मित्राला मदत व्हावी म्हणून क्षणाचाही विलंब न लावता त्याने दिलेल्या पत्त्यावर पैसे पाठविण्याची सोय करतो.

अंत्यविधी सेवेचा निस्पृह कार्यकर्ता माधवराव गोरे
प्रतिनिधी

डोंबिवली गावचे पहिले सरपंच कै.आनंदराव गोरे यांचे चिरंजीव राष्ट्र सेवा दलाचे निष्ठावान कार्यकर्ते, ज्येष्ठ समाजसेवक माधवराव गोरे यांचे नुकतेच निधन झाले. माधवराव यांचा जन्म डोंबिवलीत १९२४ रोजी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ते सेवाव्रती होते. राष्ट्र सेवा दलाचे ते प्रमुख संघटक होते. डोंबिवली परिसरातील कोणत्याही घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर माधवराव ती व्यक्ती कोण, तो कोणत्या जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा याचा विचार न करता अंत्यविधीच्या ठिकाणी जाऊन सेवाकार्य करीत असत. शेवटपर्यंत त्यांचे हे काम सुरू होते. आतापर्यंत सुमारे सात हजाराहून अधिक अंत्यविधी कार्यात ते सहभागी झाले होते. डोंबिवलीतील त्यांचे हे कार्य विशेष दखल घेण्याजोगे होते.
अंत्यविधीच्या वेळी एखाद्या गरीब-दुबळ्या माणसाजवळ पैसे नसत, तो आर्थिक भारही माधवराव स्वत:वर घेत असत. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रचार कार्यातही ते अग्रेसर होते. स्वातंत्र्य चळवळीतील गुप्त प्रचारपत्रिका, व्यंगचित्र केंद्रावरून आणण्याचे अवघड काम माधवराव स्वत: करत असत. या पत्रिका, पोस्टर लावण्याचे काम त्यांचे कनिष्ठ बंधू स्वातंत्र्यसैनिक वसंतराव गोरे, मधुकर तायशेटे करत असत. हे काम करत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. कल्याण पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आली. माधवराव गोरे यांनी राष्ट्र सेवा दलाचे कलापथक, शुश्रूषा पथक, अंत्यविधी पथक आदी सेवा पथके निर्माण केली. या माध्यमातून अनेक गोरगरिबांची सेवा करणे हा त्यामागील उद्देश होता. ग्रामीण भागात रस्ते, विहिरी, ग्रामस्वच्छता होण्यासाठी, विकास कामे मार्गी लागण्यासाठी माधवरावांनी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने श्रमदान शिबिरे घेतली. यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग घेऊन त्यांना ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. म्हणजे जे काम शासन अलिकडच्या काळात करीत आहे ते काम माधवराव सुमारे साठ वर्षांंपूर्वीपासूनच करत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे त्यांचे श्रद्धास्थान होते. हरिजन मंदिर प्रवेश, म. गांधी यांच्या हत्येनंतर डोंबिवलीतील श्रद्धांजली सभेचे नियोजन त्यांनी समर्थपणे केले होते. डॉ. सबनीस, प्रा. मोहनराव प्रधान, माधवराव हे जुन्या पिढीतील अग्रगण्य नेते होते. सामाजिक कार्यात तळमळीने काम करूनही माधवरावांनी कोणत्याही संस्थेत मानाचे पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, की त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला नाही. नि:स्पृहपणा, प्रामाणिकपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांच्या निधनाने एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे.
माधवरावांच्या पश्चात पुतणे प्रमोद, प्रदीप, संदीप गोरे असा परिवार आहे.

‘सेकंड लाइफ’वर भारतातील पहिलावहिला ‘व्हच्र्युअल टॅलेन्ट हंट शो’
प्रतिनिधी

कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी कलादालनाचे रग्गड भाडे भरावे लागते. त्याचप्रमाणे आपल्याला हव्या त्या तारखेला कलादालन उपलब्ध होईलच असे नाही. काही वेळा केवळ हौस म्हणून काढलेले छायाचित्र अप्रतिम कलाकृती बनते. पण ती दाखविणार कुठे आणि कशी हा प्रश्न अनेकांना पडत असतो. आता मात्र काळजी करण्याचे कारण नाही. कारण ‘सेकंड लाइफ’ या आभासी दुनियेत (व्हच्र्युअल वर्ल्ड) अशा प्रकारचे कलादालन तयार करण्यात आले आहे. हे प्रदर्शनासाठी प्रदर्शन नसून हा ‘टॅलेन्ट हन्ट शो’ आहे. यासाठी प्रेक्षकांकडून मतेही मागविण्यात येणार असून त्यासाठी एसएमएस वगैरे करण्याची गरज नाही. ‘सेकंड लाइफ’मधील कलादालनाला भेट देऊन त्यानंतर आवडती कलाकृती पाहून मते द्यायची आहेत. ‘पन्नास हजार भारतीय जगत आहेत सेकंड लाइफ’ या मथळ्याखाली १५ सप्टेंबर २००८ रोजी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये ‘सेकंड लाइफ’ या अभासी दुनियेविषयी विस्तृत माहिती देण्यात आली होती. बहुतेक कंपन्या या व्यासपीठाचा वापर उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी करण्यास उत्सुक आहेत, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. कोका कोला, आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांनी ‘सेकंड लाइफ’मध्ये अस्तित्व तयार केले आहे. या यादीत आता भारतातील टाटा इंडिकॉम या कंपनीचाही समावेश झाला आहे. टाटा इंडिकॉमने यात स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करून ‘टॅलेन्ट हन्ट शो’चे आयोजन केले आहे. क्रिकेटपटू इरफान आणि युसूफ खान या दोघांनी या ‘टॅलेन्ट शो’चे उद्घाटन केले, तेही आपल्या ‘व्हच्र्युअल अवताराने’च. या संदर्भात अधिक माहिती देताना ‘टाटा इंडिकॉम’च्या मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांनी सांगितले की, उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी ही वेगळी वाट ‘टाटा इंडिकॉम’तर्फे मळण्यात आली आहे. हा ‘टॅलेन्ट हन्ट शो’ सुमारे ४५ दिवस सुरू राहणार असून १० मार्चच्या सुमारास या स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात येणार आहे. चित्र, छायाचित्र आणि संगीत या तीन विभागांत ही स्पर्धा होणार आहे. www.tataindicomsl.com या संकेतस्थळावरून या स्पर्धेत भाग घेता येऊ शकतो. या स्पर्धेत समाविष्ट झालेली चित्रे, छायाचित्रे आणि संगीताचे तुकडे ऐकण्यासाठी मात्र ‘सेकंड लाइफ’मधील कलादालनाला भेट देणे आवश्यक आहे. मुंबईतील ‘इंडसगीक्स’ या कंपनीतर्फे ‘टाटा इंडिकॉम’चे हे कलादालन तयार करण्यात आले आहे. व्यावसायिक कंपन्यांप्रमाणेच अनेक शैक्षणिक संस्था दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी ‘सेकंड लाइफ’चा वापर करण्यास उत्सुक आहेत, असे ‘इंडसगीक्स’चे संस्थापक सिद्धार्थ बॅनर्जी यांनी सांगितले.