Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

राज्य

चार लाख रुपये किंमतीची वाघाची कातडी हस्तगत
ठाणे, २४ जानेवारी/प्रतिनिधी

बिबटय़ा वाघांच्या कातडीची चोरटी तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून भिवंडी येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार लाख रुपये किंमतीची दोन वाघांची कातडी व नऊ हजार रुपये किंमतीची १८ वाघनखे हस्तगत केली. ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याप्रकरणी विक्रमगड येथे राहणारे अनंता मेढा (१९) व शिवराम मेढा (२६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. भिवंडी येथील टेंपो स्टँडजवळ आरोपी वाघांची कातडी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह अटक केली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच राजू वंजारी, सुनील घोसाळकर, प्रकाश सावंत, माणिक आहेर, अशोक पाटील, लक्ष्मण जाधव, सोपान डोके व राजेंद्र जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

पूररेषेतही नाशिकच्या कारभाऱ्यांचा ‘हम साथ साथ है’ चा आग्रह
जयप्रकाश पवार, नाशिक, २४ जानेवारी

१८, १९ व २० सप्टेंबर २००८ असा तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकलेल्या गोदावरीच्या महापूराने समस्त नाशिकची झोप उडवून दिली. महापूराचा वेढा दिवसाढवळ्या पडला म्हणून थोडक्यात निभावले, अन्यथा तो रात्रीच पडला असता तर कोण आफत ओढवली असती या विचाराने आजही नाशिककरांना ऐन थंडीतही दरदरून घाम फुटतो. थोडक्यात काय तर ‘रामभरोसे’ जगणारे नाशिककर नशिबानेच बचावले. नाशिकचा हा घात झाला तो पूररेषेची तमा न बाळगल्याने अन् हाच प्रश्न आता कुठे मार्गी लागणार असे संकेत मिळू लागताच त्या कामात ‘हम भी साथ साथ है!’ असा सूर आळवायला महापालिकेच्या मंडळींकरवी सुरुवात झाल्यामुळे नद्यांची पूरनियंत्रण रेषा नव्याने करण्याचे काम तत्परतेने होण्याऐवजी ते लांबणीवर पाडण्याचीच व्यूहरचना केली जात आहे.

लेनचा निषेध, ज्ञातीतच विवाहाचे आवाहन, लक्ष्य दिल्ली..
पुणे, २४ जानेवारी/प्रतिनिधी

जेम्स लेनच्या लिखाणाचा निषेध, ब्राह्मण समाजाच्या हिताला प्राधान्य देणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करण्याचे, तसेच प्राधान्याने ज्ञातीतच विवाह करण्याचे आवाहन, असे ठराव ‘पाचव्या बहुभाषीय ब्राह्मण महाअधिवेशना’च्या उद्घाटन सत्रात आज संमत करण्यात आले. हे ठराव आणि व्यासपीठावरील ‘आता लक्ष्य दिल्लीकडे’ हे घोषवाक्य या साऱ्या गोष्टींची चर्चा अधिवेशनात राजकीय अंगाने सुरू होती. पुण्याजवळील भूगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘चाणक्यनगरी’त आज या महाअधिवेशनाचा प्रारंभ झाला. कांची कामकोटीचे शंकराचार्य जयेंद्रसरस्वती, पेजावर पीठाचे विश्वेशतीर्थ स्वामीमहाराज, योगमहर्षी रामदेवबाबा, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, खासदार सुरेश कलमाडी, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, गुरुदेव मुंगळेमहाराज, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आमदार गिरीश बापट, मोहन जोशी, सुधाकर परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील आणि अधिवेशनाचे अध्यक्ष वेदाचार्य मोरेश्वरशास्त्री घैसास गुरुजी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पुढील ५० वर्षे जग दहशतवादाच्या सावटाखाली -कुमार केतकर
डोंबिवली, २४ जानेवारी / प्रतिनिधी

जागतिक दहशतवादाचा धोका किमान पुढील ५० वर्षे तरी कमी होणार नाही. दहशतवादी आता अधिक प्रगत म्हणून ओळखली जाणारी ‘हाय टेक’ साधने वापरू लागले आहेत. त्यांचे सूत्रसंचालनही आधुनिक व्यवस्थापन तंत्राने होते. पैसे आणि विध्वंसक शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे विपुल प्रमाणात आहेत. तामीळ दहशतवाद्यांकडे तर स्वत:चे वायुदलही आहे. जोपर्यंत इस्राएल-पॅलेस्टिनचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही आणि जोपर्यंत अमेरिका-इस्राएल यांची आघाडी मध्यपूर्व आशियातील देशांना वेठीस धरून ठेवते आहे, तोपर्यंत दहशतवाद नाहीसा होणार नाही, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी काल येथे केले.

तांत्रिक बिघाडामुळे जेटचे विमान खोळंबले
नागपूर, २४ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबईला जाणाऱ्या जेटच्या विमानात शनिवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणाच्या तयारीतील विमानाला जागेवरच थांबावे लागले. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दुपारी पाठवण्यात येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर करताच प्रवाशांनी गोंधळ घातला. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही काळ तणाव निर्माण झाला. जेटचे सकाळी साडेआठ वाजता आलेले नियमित विमान ९ वाजून ५ मिनिटांनी उड्डाणासाठी सज्ज झाले. मुंबईला जाणारे सर्व १२० प्रवाशी सुरक्षा तपासणीनंतर विमानात बसले. उड्डाणाची प्रतीक्षा सुरू झाली. सुरक्षा पट्टे बांधल्यावर उड्डाणासाठी वैमानिकाच्या घोषणेकडे सर्वाचे कान लागले.

दोन वर्षांत महाराष्ट्र भारनियमन मुक्त करू - मुंडे
यवतमाळ, २४ जानेवारी / वार्ताहर

‘राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन दोन वर्षांत महाराष्ट्र भारनियमन मुक्त करू’ असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी महागाव येथे शेतकरी संघर्ष अभियानाच्या जाहीर सभेत केला. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार मदन येरावार होते. यावेळी मुंडे यांनी आघाडी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या १० वर्षांच्या आपल्या सत्ता काळात शेतकऱ्यांचीच माती करण्याची धोरणे राबविल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. राज्यात सध्या कापूस खरेदी, अखंड वीजपुरवठा व कर्जबाजारी शेतकरी हे तीन प्रमुख प्रश्न आवासून उभे आहेत; परंतु शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

तंत्रज्ञानामुळे नियतकालिकांना बहर -सतीश काळसेकर
राष्ट्रीय मराठी चर्चासत्राचे उद्घाटन

नेरपरसोपंत, २४ जानेवारी / वार्ताहर

नियतकालिकेचे १८१३ मध्ये झालेले तेव्हाचे मुद्रण आणि आधुनिक काळातील तंत्रज्ञानामुळे आज होणारे मुद्रण यामध्ये लक्षणीय फरक आहे. यामुळेच मराठीभाषेतील दिवाळी अंकांना जेवढी दिवाळी आली आहे एवढी इतर कोणत्याही भारतीय भाषेतल्या नियतकालिकांना आलेली नाही. दिवाळी अंकात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचे योगदान नाकारता येत नाही, असे ठाम प्रतिपादन एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी सतीश काळसेकर यांनी केले. या चर्चासत्राचा विषय ‘मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचे साहित्य प्रकाराला योगदान’ हा होता.

धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत टाळेबंदी; कामगार संतप्त!
बदलापूर, २४ जानेवारी/वार्ताहर

सुमारे ८० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या अंबरनाथ येथील धरमसी मोरारजी केमिकल कंपनीच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी मध्यरात्री अचानक टाळेबंदी जाहीर केल्यामुळे ३२५ कामगारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे, यामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून डीएमसी कंपनी डबघाईला आली असून, कंपनीतील एकेक प्रकल्प हळूहळू बंद केले आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना पगार वेळेवर मिळत नव्हता, तरीदेखील कामगार कामावर येत होते. सप्टेंबर २००८ चा पगार कामगारांना अद्यापही मिळालेला नाही, असे कामगारांनी सांगितले.

जातीभेदांच्या भावनांना मूठमाती देण्याची गरज - सुदर्शन
धुळे, २४ जानेवरी / वार्ताहर

संहारक प्रवृत्ती हिंदू समाजाच्या विरोधात काम करीत असल्याची जाणीव करून देत उच्च आणि नीच जातींसंबंधीच्या भावनांना मूठमाती देण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी व्यक्त केली. पाश्चात्य भोगवादी संस्कृती अध्यात्म संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा धोकाही त्यांनी लक्षात आणून दिला. येथील संत डोंगरे महाराज नगरात आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांची षष्टय़ब्दीपूर्ती आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रकाशोत्सव सोहळा सुरू आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुदर्शन यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य राजेंद्र सरस्वती महाराज, आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, स्वामी हंसदासजी (हरिद्वार), स्वामी अखिलेश्वरानंदजी महाराज (जबलपूर), डॉ. मुकुंद महाराज, जगद्गुरू रामानुजायचार्य, झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामाचार्य महाराज, महेश महाराज (हरिकार), महापौर मोहन नवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात सुदर्शन म्हणाले, की भाषा हे माणसे जोडण्याचे माध्यम आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:चे रेल्वे प्रवासातील एक उदाहरण दिले. केवळ दहा मिनिटात भाषेच्या माध्यमातून आपण परप्रांतीयांशी कसे एकरूप होवू शकतो, हे त्यांनी या उदाहरणातून सांगितले. परंतु दुर्दैवाने अशा कुठल्याही कारणावरून भांडणे लावण्याची कामे केली जातात. यामुळे लोकांनी स्वत:च हुशार व्हायला हवे असे सांगताना उच्च, नीच हा भेद ठेवण्याचे कारणच नाही असे स्पष्ट केले. जातीपातीच्या नावावर एकगठ्ठा मतांची पद्धत मतदारांनी मोडीत काढायला हवी असे आवाहनही त्यांनी केले. सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष चंद्रकांत लेले यांनी यांनी माान्यावरांचे स्वागत केले. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ, पूर्णाहूती सोहळा व अन्य कार्यक्रमांच्या पाश्र्वभूमीवर देशभरातून धुळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. यामुळे शहरात चैतन्य निर्माण झाले आहे.

राष्ट्रसंतांच्या विचारांमधून मनुष्याला प्रेरणा व आत्मबळ प्राप्त होते -डॉ. यु. म. पठाण
अमरावती, २४ जानेवारी / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. त्यांनी वैज्ञानिक दृष्टी ठेवून समाज जागृतीचे काम केले. राष्ट्रसंतांच्या कार्याचा विचार केल्यास त्यांनी एवढय़ा ज्ञानशाखांचा अभ्यास कसा केला असेल, असा विचार मनात येतो. त्यांनी त्यांचे जीवनशील्प स्वत:च कोरले आहे, म्हणूनच त्यांच्या विचारांमधून मनुष्याला प्रेरणा व आत्मबळ प्राप्त होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांनी येथे केले. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठात रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘समाज प्रबोधनकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. कमल सिंह होत्या. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब आवारे, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दनपंत बोथे, कुलसचिव डॉ. कैलाश खामरे उपस्थित होते.तुकडोजी महाराज व गाडगे महाराजांची विचारसरणी सारखीच होती. या दोन्ही संतांनी समाजाला जागे करण्याचे प्रयत्न केले. राष्ट्रसंतांनी जगाचा अभ्यास करून समाज जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन ग्रामगीतेतून घडवले, त्यांच्यात दिव्यदृष्टी होती. भक्तीचे विविध प्रकार आहेत. भक्तीतून वेगळ्या प्रकारची अनुभूती मिळत असते. आपल्या कर्माची जाणीव आपल्याला होणे महत्त्वाचे आहे. सर्वानी आपले काम प्रामाणिकपणे करावे असा उपदेश संतांनी दिला आहे, असे डॉ. यु. म. पठाण यांनी सांगितले.