Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सर्वत्र तिरंगा दिसतो. शर्टाच्या खिशावर, गाडीमध्ये, बाईकवर, एवढेच नव्हे तर या दरम्यान अनेक जाहिरातींमध्येही भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांची रंगसंगती दृष्टीस पडते. आपल्याला तिरंग्याची माहिती असते, पण तिरंग्याची प्राथमिक संकल्पना मांडणाऱ्या पिंगाली वेंकय्या यांची माहिती फारच कमी भारतीयांना आहे. त्यांच्या विषयी खास ‘रविवार वृत्तान्त’च्या वाचकांसाठी..

‘लिटल चॅम्प्स’ची शहिदांना गीतांजली
प्रतिनिधी

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने शहिदांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत भारावलेल्या वातावरणात झी मराठीवरील ‘आयडीया सारेगमप लिटल चॅम्प्स’चा विशेष भाग अलीकडेच फेमस स्टुडिओत पार पडला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या भागाची कल्पना सुचविली आणि दोन दिवस स्वत: जातीने त्यांनी या मुलांकडून देशभक्तीपर गीते बसवून घेतली हे या भागाचे आणखी एक वैशिष्टय़. २६ जानेवारीनिमित्त होणाऱ्या लिटल टॅम्प्सच्या ‘शूरा मी वंदिले’ या विशेष भागात स्पर्धा घेण्यात आलेली नाही. कार्यक्रमाचा हा भाग शुरवीरांनाअर्पण करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त शहिदांना श्रद्धांजली वाहणे हा नसून आपल्या देशाला वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक लाभले, त्यांचा हा उद्घोष आहे, असे या कार्यक्रमाची संकल्पना विषद करताना हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

‘माया’ळू सिंहीण!
प्रतिनिधी

प्राणी आणि माणूस यांच्यातील नाते प्राचीन म्हणावे इतके जुने आहे. घोडा किंवा कुत्रा यांनी दाखविलेली स्वामीनिष्ठा तर आपल्याला इतिहासांच्या पानातही वाचायला मिळते. महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा तर इतिहासात अमर झाला. पण प्रेम ही काही केवळ पाळीव प्राण्यांचीच मक्तेदारी नाही तर अनेकदा िहस्र समजले गेलेले प्राणीही त्यांच्या वर्तणुकीतून जिव्हाळ्याचे वेगळे धडे देतात. माया सिंहीण हे याच संदर्भातील एक महत्त्वाचे उदाहरण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या माया सिंहिणीने तिच्या २२ वर्षांंच्या वास्तव्यात सर्वांनाच असा जिव्हाळा लावला. म्हणूनच तर तिच्या मृत्यूनंतरही तिला जपण्याचा निर्णय तिच्यावर प्रेम करणाऱ्यांनी घेतला.. तिचे प्राण गेलेले असले तरी तिचे शरीर मात्र टॅक्सीडर्मीच्या रूपाने दीर्घकाळ जतन केले जाणार आहे..

‘राज..’ उलगडले
आपण वाईट कर्म केले असेल, तर आपल्यालाच त्याचे वाईट परिणाम कधी ना कधी भोगावे लागतात, ते अपरिहार्य असते. अन्यथा सुरुवातीला जरी तुमचे भले होतेय असे वाटले तरी अंतिमत: कायमच पश्चात्तापाचे धनी व्हावे लागते, वाईट कर्माची फळे तुम्हाला भोगावीच लागतात हे सांगण्याचा चांगला प्रयत्न विशेष फिल्म्सच्या ‘राज.. दी मिस्ट्री कंटिन्यू’ या रहस्यमय चित्रपटाद्वारे दिग्दर्शक मोहीत सूरी यांनी केला आहे. रहस्यमय गोष्ट सांगताना प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याबरोबरच त्याला काही तरी चांगला ‘मेसेज’ देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असून तो त्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे चित्रपटाचे रहस्य उलगडल्यानंतरही हा ‘मेसेज’ घेऊन प्रेक्षक घरी जातो इतपत ‘राज..’ परिणामकारक झाला आहे.

‘वाटले होते काही मैल’
समृद्धीच्या अजीर्णाची परिणती

‘एका माणसाचा खून केला की काय काय नष्ट होतं? आयुष्यात एक खून केला की कंटाळ्याची, द्वेषाची उबळ थांबते का कायमची?’ .. ‘वाटले होते काही मैल’मधल्या सुजयला पडलेला हा प्रश्न! म्हटलं तर समृद्धीचं अजीर्ण झालेल्या प्रत्येकालाच हा प्रश्न कधी ना कधी पडत असतोच. सर्व काही असूनही काहीच नाहीए, या विषादानं काजळलेल्या आजच्या मन:स्थितीचं पोस्टमार्टेम करणाऱ्या या नाटकात अ‍ॅब्सर्ड शैलीत वर्तमान वास्तव मांडलेलं आहे. पोलिसी यंत्रणेच्या सजगतेची कसोटी घेण्यासाठी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करून ती स्थिती पोलीस यंत्रणा कशी हाताळते, हे जमावण्याकरिता योजलेल्या एका ‘नाटका’त सहभागी झालेल्या सुजयनं नियोजनानुसार अरुणा या तरुणीला पळवून ओलीस धरलं आहे आणि त्यानंतर मात्र त्याला तिचा खून करून खुन्याची खून करतानाची मानसिकता नेमकी काय असते, हे जाणून घ्यावंसं वाटू लागतं. माणूस खुनासारखं टोकाचं कृत्य करण्यास का उद्युक्त होतो, त्यावेळी त्याची मन:स्थिती काय असते, हे त्याला प्रत्यक्ष अनुभवायचं आहे.

मास्टरस्ट्रोक्स
निमित्त ठरले ते २००२ हे जहांगीर कलादालनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. जहांगीर कलादालनाच्या विश्वस्तांपैकी एक असलेल्या विख्यात चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर व प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी त्या निमित्ताने एक कल्पना मांडली आणि त्याला मूर्तरूपही दिले. आज विस्मरणात गेलेले आणि कलाजगताला अज्ञात असणारे असे अनेक कलावंत आहेत. या कलावंतांच्या कलाकृती या त्या त्या काळातील गाजलेल्या कलाकृती आहेत. कलेतिहासात या कलाकृतींना आणि कलावंतांना महत्त्वाचे स्थान आहे. या कलाकृतींचा शोध घेऊन त्यांची माहिती जगासमोर आणण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आला आणि जहांगीरच्या मदतीने मास्टरस्ट्रोक्स या प्रदर्शनाला सुरुवात झाली. यंदाचे सातवे मास्टरस्ट्रोक्स जहांगीरमध्ये २७ जानेवारीपासून सुरू होत आहे. आठवडाभर चालणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात पाहाता येईल. यात आबालाल रहिमान, दत्तोबा दळवी आणि चंद्रेश सक्सेना यांच्या कलाकृती पाहाता येतील. या कलाकृती १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील आहेत.
प्रतिनिधी