Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

क्रीडा

सेरेनाची गाठ अझारेन्काशी
नदाल, मरे यांची आगेकूच
मेलबर्न, २४ जानेवारी / एएफपी

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत तीनदा जेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला चौथ्या फेरीत व्हिक्टोरिया अझारेन्काच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पुरुष विभागात १२व्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने आगेकूच कायम राखताना आज स्पेनच्या निकोलस अलमॅग्रोचा ६-४, ६-३, ७-५ गुणांनी पराभव केला. अव्वल मानांकित राफेल नदाल व अन्डी मरे यांनी अनुक्रमे टॉमी हास व जुर्गन मेल्झर यांचा पराभव करत पुरुष एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. नदालने जर्मनीच्या टॉमी हासचा ६-४, ६-२, ६-२ गुणांनी पराभव केला. नदालला चौथ्या फेरीत १३व्या मानांकित फर्नान्डो गोन्डालेझच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत गोन्झालेझने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटची झुंज मोडून काढली. अॅन्डी मरेने जुर्गन मेल्झरचा ७-५, ६-०, ६-३ गुणांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागात जेतेपदासाठी पसंती देण्यात येत असलेल्या सेरेनाने आज तिसऱ्या फेरीत चीनच्या पेंग शुईचा ६-१, ६-४ गुणांनी धुव्वा उडवला. सेरेनाची चौथ्या फेरीत बेलारूसच्या अझारेन्कासोबत लढत होणार आहे. अझारेन्काने आज एमेली मोरेस्मोचा पराभव केला.

कमांडोज हेच देशाचे खरे आदर्श - सचिन तेंडुलकर
नवी दिल्ली, २४ जानेवारी / पीटीआय

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोजनी जे अतुलनीय शौर्याचे व त्यागाचे दर्शन घडविले त्याला सलाम करण्यासाठी भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर व हरभजन सिंग यांनी मनेसर येथील एन. एस. जी.च्या मुख्यालयात भेट दिली.या वेळी सचिन व भज्जीने कमांडोजच्या प्रशिक्षण शिबिरातील २६ खडतर टप्प्यांना भेट दिली आणि उंचावरून उडय़ा मारणे, उंचावर चढून जाणे, दीर्घ पल्ल्याचा धावण्याचा सराव आदी प्रकारात प्रत्यक्ष भागही घेतला.

पाकिस्तानचा ७५ धावांत खुर्दा; श्रीलंकेचा मालिका विजय
लाहोर, २४ जानेवारी / पीटीआय

दिलशान तिलकरत्नेने (१३७) कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना झळकावलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने आज झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या लढतीत पाकिस्तानचा २३५ धावांनी धुव्वा उडवला आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी सरशी साधली. यापूर्वी, २०००मध्ये शारजात खेळल्या गेलेल्या लढतीत श्रीलंकेने भारताचा डाव ५४ धावात गुंडाळत दणदणीत विजय मिळवला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३०९ धावांची मजल मारली आणि पाकिस्तानचा २२.५ षटकात ७५ धावात खुर्दा उडवला. तिलकरत्ने दिलशान (१३७ धावा, १३७ चेंडू, १० चौकार) श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सनथ जयसूर्या (४५), कुमार संगकारा (५०) आणि थिलिना कंदम्बी (३२) यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विंडीजचा संघ जाहीर
ब्रिजटाऊन, २४ जानेवारी / वृत्तसंस्था

पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघ आज जाहीर करण्यात आला. बार्बाडोसचा ३२ वर्षीय आघाडीचा फलंदाज डेल रिचर्ड्स हा संघातील एकमेव नवा चेहरा आहे. जमेका येथे पहिली कसोटी होणार आहे. या कसोटीत डेल रिचर्ड्स किंना ड्वेन स्मिथ या दोघांपैकी एकजण कर्णधार ख्रिस गेल याच्या साथीने सलामीच्या जोडीत खेळेल.न्यूझीलंड दौऱ्यात खेळलेला डावखुरा शिवनारायण चतरगावला संघातून वगळण्यात आले आहे. डेल रिचर्ड्स याने ३४ प्रथम श्रेणी सामन्यात ४० च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. देशांतर्गत स्पर्धामध्ये त्रिनिदाद, टोबॅगो या संघांविरुद्ध त्याने या हंगामात शतके काढली आहेत. स्थानिक स्पर्धामधील कामगिरीमुळेच त्याची निवड करण्यात आली आहे. संघात पुनरागमन केलेल्या ड्वेन स्मिथ याने या हंगामात स्थानिक स्पर्धात चमकदार कामगिरी करून निवड समितीला आपल्या नावाचा विचार करायला भाग पाडले.
वेस्ट इंडिजचा संघ असा- ख्रिस गेल (कर्णधार), डेल रिचर्ड्स, ड्वेन स्मिथ, झेवियर मार्शल, रामनरेश सरवान, ब्रेन्डन नॅश, शिवनारायण चंद्रपॉल, दिनेश रामदिन, जेरेमी टेलर, सुलेमान बेन, फिडेल एडवर्ड्स, डेरेन पॉवेल, एल. बाकर, ए. जगरनॅट.

आसिफच्या अपिलावरील निकाल राखून ठेवला
मुंबई, २४ जानेवारी / क्री. प्र.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद आसिफ याच्यावरील उत्तेजक सेवनाच्या आरोपांबाबतची सुनावणी आज पूर्ण झाली. मात्र इंडियन प्रीमियर लीगच्या लवादाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. गतवर्षी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या स्पर्धेत मोहंमद आसिफ याने उत्तेजक द्रव्यांचे सेवन केल्याचे चाचणीत सिद्ध झाले. त्याविरुद्ध आसिफ याने अपील केले होते. या अपिलाची सुनावणी इंडियन प्रीमयर लीगने नियुक्त केलेल्या लवाद मंडळापुढे झाली. या लवाद मंडळात सुनील गावसकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रवी बापट आणि नामवंत विधिज्ञ शिरीष गुप्ते यांचा समावेश होता. या मंडळापुढे काही साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. आसिफतर्फे त्याचे वकील शाहिद करीम यांनी बाजू मांडली. लवाद मंडळाने आज निकाल जाहीर केला नाही. अंतिम निकाल देण्यासाठी लवाद मंडळाची लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

अर्जुन रणतुंगाची न्यायालयात धाव
कोलंबो, २४ जानेवारी / वृत्तसंस्था

श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला अर्जुन रणतुंगा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रणतुंगा यांना श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले. आपल्याला अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय रद्द ठरविण्यात यावा तसेच अध्यक्षपदावरून काढल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेची जी हानी झाली त्याबद्दल दीड कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रणतुंगा यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जात केली आहे. जानेवारी २००८ मध्ये रणतुंगा यांची श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या तात्पुरत्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. २३ डिसेंबर २००८ रोजी त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले. क्रीडामंत्री लोकुगे यांनी क्रिकेट मंडळाच्या कामात हस्तक्षेप केल्याचे रणतुंगा यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

जय पांडेची प्रभावी गोलंदाजी; केडन्सने बडोदा संघाला ११६ धावांत गुंडाळले
मुंबई, २४ जानेवारी / क्री. प्र.

१४ वर्षांखालील खेळाडूंच्या एल. आय. सी. चषक क्रिकेट स्पर्धेत जय पांडेचा प्रभावी ऑफस्पिन गोलंदाजीसमोर बडोदा क्रिकेट संघ ११६ धावांतच गारद झाला. नंतर पहिल्या दिवसाअखेर पुण्याच्या केडन्स अॅकेडमीने ५ बाद १४६ धावांची मजल मारली. ओव्हल मैदानातील एल्फ- वेंगसरकर अॅकेडमीवरील लढती वेंगसरकर संघाने तेंडुलकर संघाला २३४ धावांत गुंडाळले आणि पहिल्या दिवसअखेर बिनबाद ३५ धावा केल्या आहेत. माहुल येथील लढतीत केडन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या बडोदा संघाला ११६ धावांतच गुंडाळले. जिग्नेश सोलंकी (३०) व प्रभव ठाकर (१८) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली ३८ धावांची भागीदारीच त्यांच्या डावात सर्वोच्च ठरली. केडन्सच्या जय पांडे (२७/५), करण अंकोला (३३/२) व साग्निक मुखर्जी (१५/२) यांनी ही करामत केली. नंतर करण जाधव (५०) व निखिल नाईक (५६) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागी रचून केडन्सला आघाडी मिळवून दिली. ओव्हल येथील दुसऱ्या लढतीत जय बिश्ता (५५), प्रणव मेनन (२८), करण वसोडिया (३६) व वैभव जावकर (६६) यांच्या दमदार फलंदाजीनंतरही तेंडुलकर संघ २३४ धावांतच गुंडाळला गेला. डावखुरा फिरकी गोलंदाज आकाश लुथरा याने ६५ धावांत ५ बळी मिळविले. संक्षिप्त धावफलक- बडोदा क्रिकेट असो. ११६ (जिग्नेश सोलंकी ३०, जय पांडे २७/५, करण अंकोला ३३/२, सागरिक मुखर्जी १५/२) वि. केडन्स अॅकेडमी ५ बाद १४२ (करण जाधव ५०, निखिल नाईक ५६, जिग्नेश सोलंकी १५/२). तेंडुलकर संघ- २३४ (जय बिश्ता ५५, प्रणव मेनन २८, करण वसोडिया ३६, वैभव जावकर ६६, आकाश लुथ्रा ६५/५, ध्रुमिल मटकर ३४/२) वि. वेंगसरकर संघ- बिनबाद ३५ (प्रसाद पवार खेळत आहे १६, वैदिक मुरकर खेळत आहे १४).

भूपती दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत; बोपण्णा पराभूत
महेश भूपती आणि त्याचा सहकारी मार्क नोव्हेल्स यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत तिसऱ्या फेरीत धडक मारली. रोहन बोपण्णा आणि त्याचा सहकारी जार्को निमिनेन यांना मात्र दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या मानांकित भूपती-नोव्हेल्स यांनी बिगरमानांकित रशियन जोडी इगोर कुनिस्टिन आणि दिमित्री टुरस्नोव्ह याची झुंज ७-५, ७-५ गुणांनी मोडून काढली. भूपती-नोव्हेल्स जोडीची पुढील फेरीत निकोलस लापेन्टी-टॉमी रोब्रेडो यांच्याशी लढत होईल. लोपेन्टी-रोब्रेडो जोडीने बोपण्णा-निमिनेन यांचा ६-४, ६-४ गुणांनी पराभव केला. चौथ्या मानांकित लिएंडर पेस व लुकास ड्लोही जोडीने तिसऱ्या फेरीत धडक मारताना बिगरमानांकित जोडी फॅबिओ फोगिनी-इव्हान ज्युबकिक याचा ६-३, ६-४ गुणांनी पराभव केला. सानिया मिर्झा व महेश भूपती यांनी मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

बालवीर कबड्डी : चेंबूर क्रीडा व विजयदुर्ग अंतिम विजयी
मुंबई, २४ जानेवारी / क्री. प्र.

घाटले गाव, चेंबूरस्थित ‘बालवीर स्पोर्ट्स क्लब’ने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत चेंबूर क्रीडा केंद्र व विजयदुर्ग क्रीडा मंडळाने विजेतेपद पटकावले.
प्रथमश्रेणी ‘अ’ गटामध्ये नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ, बोरिवलीविरुद्ध चेंबूर क्रीडा केंद्र, चेंबूर या उपनगरातील दोन बलाढय़ संघामध्ये चुरशीचा सामना झाला. ४० मिनिटांच्या अखंड डावामध्ये दोन्ही संघांना चढाईच्या जादा ५-५ वेळा देण्यात आल्या. या चुरशीच्या सामन्यामध्ये चेंबूर क्रीडा हा संघ अंतिम विजयी झाला. ‘ब’ गटाचा अंतिम सामना विजयदुर्ग क्रीडा मंडळ, चेंबूरविरुद्ध अभिनव क्रीडा मंडळ, विक्रोळी या दोन मातब्बर संघांमध्ये खेळविण्यात आला. त्यामध्ये विजयदुर्ग क्रीडा मंडळ, चेंबूर हा संघ अंतिम फेरीत विजयी झाला.