Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

काँग्रेसच्या विजयाची परंपरा कायम राहणार
लोकसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर पश्चिम असलेला मतदारसंघ नव्या रचनेनुसार उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघ झाला आहे. पूर्वीच्या रचनेतही या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होते तर नव्या रचनेतही सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस तर एका मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. चित्रपट अभिनेते व काँग्रेसचे खासदार सुनिल दत्त यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने पूर्वीच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत प्रिया दत्त या प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या.

१९५९ रोजी ईशान्य हिमालयीन सरहद्दीवर ‘हॉट-स्पिं्रग्ज’ या ठिकाणी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत १० केंद्रीय पोलीस धारातीर्थी पडले होते. आणि तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस भारतातील सर्व पोलीस दलात ‘स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. अशाच एका स्मृतिदिनाला महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधी म्हणून हेमंत करकरे उपस्थित होते. त्या कार्यक्रमाच्या आठवणी त्यांनी खास लोकसत्तासाठी लिहिल्या होत्या. उद्याच्या प्रजासत्ताक दिनी आता हेमंत करकरे यांनाच मरणोत्तर अशोकचक्र देण्यात येत आहे. त्या निमित्ताने..
माथ्यावर अत्यंत तेजस्वी, लखलखणाऱ्या निळाईचा आकाश घुमट, दाडी दिशा व्यापूनही उरलेल्या अतिभव्य, बर्फाच्छादीत, शुभ पर्वतराजी. अद्याप पुर्णपणे न वितळलेल्या भुरभुरत्या बर्फ कणांचे फेनधवल वस्त्र ल्यालेली धरती आणि अशा या १७,००० फूट उंचीवर असलेल्या दुर्गम, निर्जन, निवांत प्रदेशात उभारलेले एक साधेसे स्मारक.

२६जानेवारी २००९! भारताचा साठावा प्रजासत्ताक दिन! बरोबर दोन महिन्यांपूर्वी आर्थिक राजधानीमध्ये म्हणजे दक्षिण मुंबईतल्या मानाच्या, महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणांवरती दहशतवादी हल्ले झाले. त्यातून मुंबईकर शरीरानं लगेचच सावरून आपापल्या कामांना लागले. मात्र मनावर खोलवर उमटलेले चरे, ओरखडे व जखमा अजूनही तशाच आहेत. हल्ल्यानंतर एका आठवडय़ाने गेटवे ऑफ इंडियापाशी जनसागर उसळला- कुणीही न बोलावता, अगदी मनापासून- ताजमहाल हॉटेलसमोर मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता. दूरदर्शनवर या उत्स्फूर्त जमावाची दृश्ये व त्यांच्या प्रतिक्रिया दिल्लीमध्ये खळबळ माजवून गेल्या. काही दिवसांतच राजीनामे घेण्यात आले व सत्तापदांवरची माणसं बदलली गेली. ही ताकद संघटित नागरिकांच्या अनपेक्षित एकात्मतेची होती.

अमेरिकेतील आर्थिक मंदीचा हाहाकार आणि सत्यमचे ‘श्री-४२०’ - अशा बाबींमुळे भांडवलवादी विचारसरणीच आचके देऊ लागली आहे काय? असा प्रश्न बरेच जण विचारू लागले होते. सोविएत युनियनच्या विघटनामुळे समाजवादी विचारसरणीच पराभूत झाली असे बोलले जात होते. प्रत्यक्षात या घटना म्हणजे भांडवलवादाचा उद्गाता अ‍ॅडॅम स्मिथचा पराभव नाही आणि कार्ल मार्क्‍सच्या विचारांचाही नाही. मग काय आहे?.. जयराज साळगावकर यांचे विवेचन-The budget should be balanced, the Treasury should be refilled, public debt should be reduced, the arrogance of officialdom should be tempered and controlled, and the assistance to foreign lands should be curtailed least Rome become bankrupt. people must again learn to work, instead of living on public assistance.'' - Cicero- 55 BC

आणखी सुमारे वर्षभरानंतर भारतीय प्रजासत्ताकाची षष्टय़ब्दीपूर्ती आपण साजरी करू. भल्या भल्यांची अटकळबाजी खोटी ठरवीत आपण लोकतांत्रिक राज्यपद्धती रुजवली आणि पाहता पाहता उणीपुरी साठ वर्षे लोकशाही राबविली सुद्धा! पण आपल्या या यशामुळे प्रभावित झालेले जगभरातले राज्यशास्त्रज्ञ भारतीय लोकशाहीबद्दल खूप कुतूहल बाळगून असले तरी आपली लोकशाही त्यांच्या लेखी तितकीशी दर्जेदार मात्र ठरू शकलेली नाही.
भारतीय प्रजासत्ताकातही लोकशाही किती अव्वल आहे किंवा अस्सल आहे त्याबद्दलचा असा संदेह टिकून राहण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लोकशाहीची गुणवत्ता आणि परिणामकारकता! खऱ्या आणि निर्विवाद लोकहितासाठी राबविली गेली आणि लोकांच्या रोजचा जीवनसंघर्ष थोडा जरी कमी करू शकली तरच ती लोकशाही लोकमानसात रुजते. प्रभावी, कर्तबगार आणि नेतृत्वक्षम लोकप्रतिनिधीच लोकशाहीबद्दलचा लोकविश्वास बळकट करू शकतात. लोकांना लोकांच्याच पात्रतेचे लोकप्रतिनिधी मिळत असतात हे खरेच पण शेवटी ‘लोकप्रतिनिधी कालस्य कारणम्..’ हेही नाकारता येत नाही. आपल्याकडच्या लोकशाहीत निवडणुकींना आणि निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना इतके अवाजवी महत्त्व प्राप्त झाले आहे की आपला देश प्रजासत्ताक आहे की प्रतिनिधी-सत्ताक असा प्रश्न पडावा.