Leading International Marathi News Daily
सोमवार , २६ जानेवारी २००९ .

व्व्यवस्थेचेच वस्त्रहरण..
कैक वर्षे ‘टॅक्स हॉलिडेज्’चे सुख उपभोगत असलेल्या आय.टी. कंपन्यांची करमुक्तता हे जर नफा फुगवून दाखविण्यास प्रोत्साहन ठरत असेल, तर ही करमुक्तता काढून टाकली जाईल. एकुणात, व्यवस्थेवरच गंडांतर येऊ घातले असेल, तर सरकार आज कितीही नाही म्हणत असले तरी, हजारो कर्मचारी आणि लाखो भागधारकांच्या हितरक्षणाचे कारण पुढे करीत सत्यमला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजही जाहीर करेल.
हर्षद मेहता, यूटीआय घोटाळा, सीआरबी, केतन पारिख, जीटीबी वगैरेनंतर आता वित्तीय दगलबाजीचा अभूतपूर्व महानमुना असलेला सत्यम घोटाळा पुढे आला आहे. सत्यमपूर्वीच्या प्रत्येक मोठय़ा घोटाळ्यांना शेअर बाजाराने घेतलेल्या उधाणाची पाश्र्वभूमी होती. सत्यम घोटाळ्याचा कॅनव्हास आणि त्याने व्यापलेला कालावधी पाहता त्यालाही तशी ती आहेच. या प्रदीर्घ चाललेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश होण्याला मात्र जागतिक वित्तीय घडामोडींची परिणती म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि त्या परिणामी गेले वर्षभर सेन्सेक्सचा ओसरत चाललेला जोर मुख्यत: कारणीभूत ठरला, असे म्हणावे लागेल.

 

सर्व प्रकारच्या लबाडय़ा, कपट, भ्रष्ट कारस्थाने तेजीच्या आड दडली जातात अथवा दुर्लक्षिली तरी जातात. पण जेव्हा दुर्भिक्ष्य सुरू होते तेव्हा मात्र ती सारी कृष्णकत्ये त्यावर साचलेली धूळ, जळमटे दूर सारून लख्ख समोर येऊ लागतात. सत्यम प्रकरणातून याचीच सुरुवात झाली आहे. गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचे एक प्रसिद्ध वाक्य सत्यम घोटाळ्यासंदर्भात नसले तरी सद्यस्थितीला नेमके लागू पडते. बफे म्हणाले होते- ‘उधाण आलेल्या समुद्रात पोहणाऱ्यांचे सोवळे रूप हे बेगडीच म्हणायला हवे, लाटा ओसरू लागल्यावर कोण किती वस्त्रहीन आहे हे आपोआपच कळून चुकते.’ मंदीमुळे दुष्ट माणसातले इमान जागे होते असे नाही. तर मंदीचा फेरा अगदी उद्दाम माणसालाही हतबल करतो असाच जगभरचा अनुभव सुचवितो. विशेषत: राजूसारख्या पैशाचे रोलिंग करणाऱ्या माणसाची पुरती कोंडी सद्यस्थितीने केल्याचे दिसते. तरीही राजू यांनी स्वत:हून शरणागती पत्करली असे म्हणता येणार नाही. तर १६ डिसेंबर २००८ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत, आपल्याच मालकीच्या दोन ‘मेटास’ कंपन्या सत्यमच्या गंगाजळीतून खरेदी करण्याचा राजू यांचा ‘बनाव’ जर बिनबोभाट मार्गी लागला असता, राजू यांची शरणागती व घोटाळ्याचा पर्दाफाश इतक्यात झालाही नसता. पण हा प्रयत्न दलाल स्ट्रीटकडून (किंबहुना वॉल स्ट्रीटकडून) मिळालेल्या चपराकीने हाणून पाडला गेला. म्हणजे हा घोटाळा पटलावर आणण्याची जबाबदारी जागरूक गुंतवणूकदारांनीच निभावली, असे म्हणता येईल.
‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ थाटाच्या पिढीजात मारवाडी-बनिया उद्यमशीलतेचा जमाना खूप मागे राहिला; धंदा करण्यासाठी कायदेकानूंची मोडतोड करावीच लागते; किंबहुना कायदेभंग हाच यशस्वी उद्योजकतेचा नियम बनेल, अशी दांडगाईही इतिहासजमा झाली; आता विदेशातून उच्च-शिक्षण घेऊन आलेल्या, बुद्धीमत्ता हेच भांडवल बनलेल्या ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेचे पाईक मानल्या जाणाऱ्या पहिल्या पिढीतील आय.टी. उद्योजकांचा जमाना आला आहे. पूर्वापार चालत आलेल्या ‘ला-ला, ले-ले’ प्रवृत्तीला उत्तर म्हणून, उद्योजकता, संपत्ती निर्माण, व्यावसायिक नेतृत्त्व, मालक-कामगार संबंध अशा प्रत्येक पैलूत आय.टी. उद्योगाकडून नवे आदर्श पायंडेही पाडले गेले. गेल्या दशक-दोन दशकांत या आय.टी. क्षेत्रातील नवउद्योजकांनी भारताला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले आणि देशाला जागतिक ज्ञान-महासत्ता बनविण्याचे स्वप्नही दाखविले. पण दुर्दैवाने या साऱ्या कर्तबगारीवर आय.टी. क्षेत्रातील नावाजलेल्या सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडचे संस्थापक रामलिंग राजू यांनी पाणी फेरले. ‘दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए’ हा उद्दामपणा त्यांच्यातही पूर्वीच्या लाला-शेठजींइतकाच कसून भरला असल्याचे सिद्ध झाले.
राजू यांनी ७ जानेवारी २००९ ला ‘सेबी’ला धाडलेल्या पाच पानी कबुलीजबाबाचा मतितार्थ इतकाच की, शेअर बाजारात सत्यमच्या समभागाचा भाव वधारता राहावा हे त्यांच्यासाठी अपरिहार्य बनले होते आणि त्यासाठी संपूर्ण नियमन व्यवस्थेचाच फजितवडा होईल अशी आकडय़ांचा गोलमाल करणे त्यांना भाग होते. गेल्या सात-आठ वर्षांतील नफ्याचे आकडे, नफ्याच्या मार्जिन्स, हाती राहणारी शिल्लक, राखीव गंगाजळी इतकेच काय जगभरातील ग्राहक कंपन्या आणि एकंदर सेवारत कर्मचाऱ्यांचे प्रमाण या साऱ्यांबाबत सादर केले जाणारे आकडे ही धूळफेकच होती. दर तिमाहीला बिझनेस न्यूज चॅनेल्सवर येऊन रामलिंग राजू, रामा राजू, वदलमणी श्रीनिवास हे सत्यमचे कलंकित त्रिकूट कंपनीच्या निकालाचे जे आकडे लोकांसमोर फेकत होते, ते सारे झूठ होते. टीव्हीसमोर बसून हे सारे भक्तिभावाने ऐकणाऱ्या सत्यमच्या सामान्य भागधारकांसाठी याहून मोठा धक्का आणखी काय असेल?
‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ अर्थात वास्तविकतेचे भासमान चित्र ही संगणक-विज्ञानाची एक खास किमया आहे. राजू यांचे मतीगुंग करणारे असत्यकथन म्हणजे यशस्वी उद्यमशीलतेची भ्रामक गाथाच होती. किंबहुना जगाला दिलेली ती ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ची भूल होती, असे आता स्पष्ट होत आहे. त्यांच्या या सर्वार्थसाधक वित्तीय सार्थकतेतून आणखी कोणकोणत्या लबाडय़ा व कुलंगडय़ा सध्या सुरू असलेल्या तपासातून पुढे येतील, हे तेच जाणोत. (त्या उघड झाल्या तरी जगाला सांगितल्या जाण्याच्या शक्यतेवरही प्रश्नचिन्हच आहे!) पण संपूर्ण रहस्यावरील पडदा उलगडला जाण्यापूर्वीच या खुशखुशीत पण अर्धकच्च्या रहस्यकथेची दिल्लीच्या एका कंपनीकडून प्रत्येकी ४९९ डॉलरला विक्रीही सुरू झाली आहे.
सत्यमच्या शेअर्सला खोटा भाव मिळवून दिल्याने त्याच्या विक्रीतून मिळणारा नफा हा सोन्याची किंमत आलेल्या जमीनखरेदीत गुंतविण्याचा सपाटाच राजूबंधूंकडून सुरू झाला. प्रॉफिट्समधून सुपर प्रॉफिट कमावण्याच्या या नव्या धंद्यात आंध्र प्रदेश सरकारच्या अतिरिक्त मेहरबानीतून राजू कुटुंबियांनी आपल्या तीन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी तब्बल साडेसतरा हजार एकरचे भूखंड हैदराबाद, विशाखापट्टणम, रंगा रेड्डी व आसपासच्या परिसरात अगदी मामुली मोबदल्यात मिळविले. २००१ ते ताज्या प्रकरणाचा पर्दाफाश होईपर्यंत- डिसेंबर २००८ पर्यंतच्या आठ वर्षांत प्रवर्तक राजू कुटुंबियांच्या सत्यममधील भांडवली ह्श्श्यिांत २५.६ टक्क्यांवरून ८.६१ टक्क्यांवर (जो सुद्धा वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवून फुकून टाकल्याने जवळपास शून्यवत झाला आहे.) झालेली घसरण याचा प्रत्यय देते.
सत्यमचे प्रवर्तक राजू कुटुंबियांनी गेल्या आठ वर्षांत या कंपनीच्या माध्यमातून २००० कोटींची माया गोळा केली. शेअर बाजारातील नोंदी तपासून पाहिल्या तर लक्षात येते की, जून २००१ तिमाहीपासून राजू कुटुंबियांचा सत्यममधील भांडवली हिस्साच घटत आलेला नाही, तर हाती असलेल्या शेअर्सचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटत गेले आहे. प्रवर्तकांनी दर तिमाहीला सरासरी चार-पाच लाख समभागांची शेअर बाजारात विक्री करून वार्षिक किमान १०० कोटी रुपये आपल्या अन्य धंद्यांकडे वळते केले. गेले सात-आठ वर्षे सत्यमच्या संस्थापक-प्रवर्तकांकडूनच कंपनीतील भागीदारी घटत चालली आहे. सत्यमची अवस्था भाकड गायीसारखी करण्यात प्रवर्तकांचाच पुढाकार आहे, ही बाब सेबीसह तमाम विश्लेषक, ब्रोकरेज हाऊसेस, बिझनेस चॅनेल्सच्या कथित चाणाक्ष समालोचकांना संशयास्पद वाटू नये, याचेच आता नवल वाटते.
एका बाजूला अडचणीचे ठरतील असे प्रश्नच उपस्थित न करणारी टीव्ही माध्यमे, तर दुसऱ्या बाजूला मानाची ठरतील अशी बक्षिसे, पुरस्कार मॅनेज्ड करणारा एक संघच रामलिंग राजू यांच्या दिमतीला होता. महिना- दोन महिन्यांपूर्वीपर्यंतत सत्यम कॉम्प्युटर आणि रामलिंग राजू यांचे कथित असामान्य यश भल्याभल्यांना भूरळ घालत होते. ज्यातून सत्यमच्या समभागांचा भाव केवळ वधारत नव्हता, तर राजू कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तुंबडय़ाही भरत चालल्या होत्या. उद्योजकीय निपुणतेचे शूचिर्भूत शिखर समजले जाणारा गोल्डन पीकॉक- कॉर्पोरेट गव्हर्नन्स पुरस्कार २००२ आणि पुन्हा सप्टेंबर २००८ असा एकदा नव्हे दोनदा पटकावण्याचा बहुमान सत्यम कॉम्प्युटरलाच मिळाला आहे. आता वर्ल्ड कौन्सिल फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स या ब्रिटनस्थित पुरस्कार समितीला उपरती सुचली आणि सत्यमला घाईघाईने पुरस्कारच्युत केले गेले. अलीकडच्या म्हणजे सत्यममध्ये राजूप्रणीत घोटाळा सुप्तपणे सुरू होता त्या काळात प्रतिष्ठा-पुरस्कारांना बहरच आला होता. इन्व्हेस्टर रिलेशन्स ग्लोबल रॅकिंग्ज (आयआरजीआर) या जागतिक संघटनेनेही सत्यमला सर्वोत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतींच्या अवलंबासाठी २००६ आणि २००७ असे सलग दोन वर्षे प्रतिष्ठित मानांकन बहाल केले आहे. २००७ साली अर्न्‍स्ट अँण्ड यंगकडून ‘आंत्रप्रीन्यूअर ऑफ द इयर’ पुरस्कार, टीव्ही चॅनेल्ससह संपूर्ण बिझनेस मीडियाने राजू यांच्यावर आजवर ‘मॅन ऑफ द इयर’, ‘बिझनेस आयकॉन’, ‘रोल मॉडेल फॉर यंग इंडिया’ वगैरे बहुमानांची खैरात केलेलीच आहे. सीआयआय, अ‍ॅसोचॅम, फिक्की या वाणिज्य क्षेत्राच्या शिखर संघटनांमध्ये राजू व सत्यमच्या अन्य कलंकित प्रतिनिधींनी वेळोवेळी मानाची पदे भूषविली आहेत.
सत्यमची कथा जशी रंगविली जात आहे तशी एका व्यक्तीच्या सर्वार्थसाधक महत्त्वाकांक्षेपुरती सीमित नाही तर वेगवेगळ्या संस्था-संघटना व प्रभावशाली व्यक्तीकडून प्रोत्साहन-पाठराखण झाल्याने प्रस्थापित व्यवस्थेच्या चिंधडय़ा उडविणारा तो महागफला आहे. म्हणूनच उमद्या फळांच्या करंडीतील एखादे नासके फळ असा युक्तिवाद करीत या घोटाळ्याच्या गांभीर्याची बोळवण करण्याचा भांडवली जगताचा प्रयत्न केविलवाणाच भासतो. अनेकांचा या महाघोठाळ्याशी असलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पाहता त्यांचा हा युक्तिवाद खोटाच ठरतो. सत्यमशी निगडित सध्या सुरू असलेल्या उच्चस्तरीय तपासात या घोटाळ्याशी संलग्न सर्व दागेधोरे प्रकाशात येतीलच. सत्यममधील मोठे भागीदार असलेल्या (साडेतीन टक्क्यांचा भांडवली हिस्सा) एलआयसीने उशिराने का होईना, सत्यमचा महाघोटाळा म्हणजे मुंबईवर अकल्पितपणे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा असल्याची कबुली दिली आहे. अर्थात राजूसारख्या महाठगांचे कृत्य हे दहशतवाद्यांइतकेच भीषण असल्याचे एलआयसीने सुचविले आहे. पण एलआयसीसारखे प्रामाणिक मतप्रदर्शन अन्य कोणाकडून झालेले फारसे ऐकिवात नाही.
सत्यम घोटाळा हा अपवादात्मक नासक्या फळाचाच प्रताप असल्याचे सिद्ध होणे प्रचलित व्यवस्थेच्या पाठीराख्यांसाठी आवश्यक बनले आहे. संपूर्ण फळाची करंडीच नासकी आहे, अशा गंभीर निष्कर्षांला हे प्रकरण जाऊच नये असे प्रयत्न होतील. ग्लोबल ट्रस्ट बँक घोटाळ्यातील सहभागामुळेही प्रतिमा मलीन झालेल्या प्राइस वॉटरहाऊस कूपर्ससारख्या ऑडिटर्सवर कारवाई होईल. प्रवर्तक कुटुंबीय व अन्य बडय़ा भागीदारांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र संचालकांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला प्रश्न पाहता, स्वतंत्र संचालकांसाठी कठोर अधिकार बहाल करणारा नियमातील फेरबदल केला जाईल. गेले कैक वर्षे ‘टॅक्स हॉलिडेज्’चे सुख उपभोगत असलेल्या आय.टी. कंपन्यांची करमुक्तता हे जर नफा फुगवून दाखविण्यास प्रोत्साहन ठरत असेल, तर ही करमुक्तताही काढून टाकली जाईल. एकुणात, व्यवस्थेवरच गंडांतर येऊ घातले असेल, तर सरकार आज कितीही नाही म्हणत असले तरी, हजारो कर्मचारी आणि लाखो भागधारकांच्या हितरक्षणाचे कारण पुढे करीत सत्यमला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजही जाहीर करेल. पण यापूर्वीच्या अन्य अनेक घोटाळ्यांप्रमाणे आर्थिक क्लृप्त्या-कुलंगडय़ा करून गोळा केल्या गेलेल्या मायेचे पुढे काय होते, हे यावेळी तरी निदान गुलदस्त्यातच राहू नये. गमावलेला विश्वास पुन्हा संपादण्यासाठी ते आवश्यकतच ठरेल.
सचिन रोहेकर
sachinrohekar@gmail.com