Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

व्यापार - उद्योग

उद्योजकता विकासाचे धडे अभ्यासक्रमात शिकविले पाहिजेत -डॉ. रघुनाथ माशेलकर
व्यापार प्रतिनिधी: आजचे युग स्पर्धात्मकतेचे आहे. त्यात महाराष्ट्र कुठे आहे? भारत कुठे आहे? भारताची अमेरिका, कोरिया, चीन, युरोप अशा देशांशी स्पर्धा आहेच; एवढेच नव्हे तर देशांतर्गतही स्पर्धा हवी. यासाठी सचोटीपणाला पर्याय नाही. अशा कसोटी व सचोटीसारख्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमातून उद्योजकता विकासाचे धडे शिकविले पाहिजेत, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बाबासाहेब डहाणूकर सभागृहात पार पडलेल्या ‘उद्योग श्री गौरव सन्मान सोहळ्या’त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

‘व्हिजन इंजिनीअरिंग’मध्ये ‘ट्रिव्हिट्रॉन’ची १० कोटींची गुंतवणूक
व्यापार प्रतिनिधी: वैद्यकीय यंत्रणा पुरविणाऱ्या ‘ट्रिव्हिट्रॉन’ कंपनीने पुण्यातील व्हिजन इंजिनिअरिंग प्रा. लि. या एक्स-रे मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर व्हिजन इंजिनिअरिंगच्या पुणे येथील दोन प्रकल्पांमधील यंत्रणांचा विस्तार करण्यासाठी १० कोटी खर्च केले जाणार आहेत. मध्य पूर्व आणि आफ्रिका येथील नवीन बाजारपेठेमध्ये ‘ट्रिव्हिट्रॉन प्राईड सीरिज’ या नावाने ही उत्पादने वितरित केली जाणार आहेत.

टाटा एआयजी लाइफची ‘इन्व्हेस्ट अ‍ॅश्युअर इन्स्टा’ योजना
व्यापार प्रतिनिधी: टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ‘इन्व्हेस्ट अ‍ॅश्युअर इन्स्टा’ ही समजण्यास सोपी अशी युनिट लिंक्ड विमा योजना बाजारात आणली आहे. या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला अधिकाधिक परतावा मिळावा याकरिता प्रयत्न करण्यात आला आहे तसेच हप्त्याची विभागणी अशा पद्धतीने केली जाते जेणेकरून विमाधारकांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल. याबरोबरच मॅच्युरिटी बोनसची हमीही देण्यात आली आहे. धोका पत्करण्याच्या क्षमतेनुसार ग्राहक पाच निधी पर्यायांमधून टॉप ५० फंड, टॉप २०० फंड, अ‍ॅग्रेसिव्ह फ्लेक्झी फंड, स्टेबल फ्लेक्झी फंड, बॉण्ड फंड यातून या योजनेत गुंतवणूक करू शकेल. ही विमा योजना ३० दिवस ते ६० वर्षे यादरम्यानच्या वयोगटातील कोणासही घेता येते. याचे कमाल मॅच्युरिटी वय ७५ वर्षे आहे. या विमा योजनेत रु. २०,०००, रु. ३०,००० रु. ४०,००० आणि रु. ५०,००० असे वार्षिक हप्त्यांचे पर्याय उपलब्ध असून ग्राहक आपल्या सोयीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याखेरीज या विमायोजनेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या हप्त्याला ८० सी अंतर्गत लाभ मिळू शकतो. कायद्याच्या १० (१० डी) कलमानुसार विमा लाभालाही करसवलत मिळू शकते.

एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सचा ‘पेन्शन प्लॅन’
व्यापार प्रतिनिधी : एगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सने ‘पेन्शन प्लॅन’ दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये पॉलिसीधारकांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळते आणि त्या माध्यमातून त्यांना उत्तर आयुष्यातील नियमित खर्च भागविता येतात. एगॉन रेलिगेअर पेन्शन प्लॅनमध्ये कित्येक अनोख्या वैशिष्टय़ांचा अंतर्भाव आहे आणि त्यामुळे ती ग्राहकाभिमुख आणि समजायला सोपी झाली आहे. पॉलिसीधारकाला त्या पॉलिसीचा प्रिमिअम पॉलिसीच्या कालपूर्तीपर्यंत भरण्याची मुभा आहे किंवा ग्राहकाला त्याच्या वाढत्या उत्पन्नाचा अंदाज घेत प्रिमियमची रक्कम पाच किंवा आठ टक्क्यांनी दरवर्षी वाढवता येते. या वैशिष्टय़ामुळे अंतिम कॉपर्समध्ये बरीच मोठी वाढ होते आणि ती प्रिमियम भरण्याचा कालावधी आणि प्रिमियमची रक्कम यावर अवलंबून असते. पॉलिसीधारकाला पाच नियमित फंड पर्यायांमधून निवडीला स्वातंत्र्य असते. या फंड पर्यायांमध्ये बदलते कर्ज असते. इक्वीटी गुणोत्तर आणि पॉलिसीधारकाला निवडीची सोय असते आणि जोखिम प्रोफाइलनुसार त्याला फंडांची अदलाबदल करता येते. या प्लॅनमध्ये ‘लाइफस्टाइल फंड’ हा अनोखा पर्याय देण्यात आला आहे. लाइफस्टाईल फंड ग्राहकांना त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांमधील इक्विटीच्या परताव्याच्या माध्यमातून कमावण्याची संधी देतो आणि जेव्हा ग्राहक निवृत्तीच्या जवळ येतो तेव्हा मिळणारा परतावा पुरेसा असेल याची काळजी घेतली जाते.

चंदन ग्लास ट्रेडर्सचे मुंबईत पदार्पण
व्यापार प्रतिनिधी: काचेच्या घाऊक विक्रीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या चंदन ग्लास ट्रेडर्स कंपनीने मुंबईतील आपल्या व्यवसायास नुकतीच सुरुवात केली. चंदन ग्लास ट्रेडर्स कंपनी पुण्यात १९५२ पासून कार्यरत आहे. व्यवसायाला ५६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचीत्य साधून कंपनीने आपल्या कामाचा विस्तार केला असून, त्याचाच भाग म्हणून मुंबईत काच विक्रेत्यांचा मेळावा घेतला होता.
मोदी गार्ड, सेंट गोबेन, गोपाल ग्लास, असाई, जयमाता या अग्रगण्य काच उत्पादन कंपन्यांचे घाऊक विक्रेते म्हणून चंदन ग्लास ट्रेडर्स कंपनी काम पाहते. काचेच्या घाऊक विक्रीत या कंपनीचा देशभरात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक आहे. खार जिमखान्यात झालेल्या या मेळाव्यास ५० विक्रेते उपस्थित होते. या वेळी कंपनीने मुंबईतून व्यवसाय सुरू केल्याची घोषणा केली. ऑल इंडिया ग्लास मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष अब्बासभाई आरसीवाला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चंदन ग्लास ट्रेडर्सचे संचालक प्रेम इदनानी आणि राजेश इदनानी यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
‘बॉम्बे डाईंग’ची ४० टक्क्यांपर्यंत सवलत
व्यापार प्रतिनिधी: बॉम्बे डाईंग या भारतातील सर्वात मोठय़ा घरगुती कपडय़ांच्या ब्रॅण्डने ३१ जानेवारी २००९ पर्यंत आपल्या ब्रॅण्डच्या उत्पादनांवर आकर्षक सवलत देण्याची घोषणा केली असून बॉम्बे डाईंगच्या बेड तसेच बाथ लिनेन उत्पादनांवर ४० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही सवलत बॉम्बे डाईंगच्या दीपक सिनेमाजवळ (वरळी), हिरानंदानी गार्डन्स (पवई), आणि लिंकिंग रोड, अ‍ॅक्सिस बँकेजवळ या मुंबईतील तीन स्टोअर्समध्ये लागू करण्यात आली आहे.